आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ मे
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इंडोनेशिया, मलेशिया आणि
सिंगापुर या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या दौऱ्यात पंतप्रधान
परस्पर हितसंबंधां संदर्भात या देशांच्या प्रमुख नेत्यांशी बातचीत करतील.
****
देशभरातल्या सर्व
सरकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी उद्यापासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.
पगारवाढी संदर्भात गेल्या १६ मे पासून या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहेत.
दरम्यान, राज्यातल्या जवळपास ५५०० सरकारी बँकांचे ३२ हजाराहून अधिक कर्मचारी आणि ८०००
अधिकारी या संपात सहभागी होत आहेत.
****
राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत
आणण्यास, सहमत असल्याचं, निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आयोगानं यासंदर्भात
तीन जून २०१३ रोजी जारी केलेल्या निर्णयाशी आपण सहमत असून, राजकीय पक्षांना मिळणारी
वर्गणी आणि त्यांचे वार्षिक लेखा परीक्षण अहवाल, माहिती अधिकाराच्या कक्षेत आणले जाणार
असल्याचं, निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
कापडी पिशव्यांच्या वापरावर प्रत्येकानं भर द्यावा,
असं आवाहन, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, आणि जिल्हा
पर्यावरण समितीचे अध्यक्ष उदय चौधरी यांनी केलं आहे. जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत
ते काल बोलत होते. समितीनं वर्षातून दोन ऐवजी चारवेळेस बैठक घ्यावी, तसंच समितीच्या
मान्यतेनं औरंगाबाद शहरात हवा प्रदूषणाची गुणवत्ता दर्शवणारा फलक तत्काळ लावण्याचे
निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
झिंकच्या कमतरतेनं होणाऱ्या अतिसाराला
नियंत्रित करण्यासाठी पाच वर्षाखालील बालकांना ९ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवाड्यांतर्गत
ओआरएसच्या पाकिटांचं वाटप करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं पुढाकार
घेऊन पंधरवडा यशस्वी करावा, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल
केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अतिसार नियंत्रण पंधरवडा बैठकीत
ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment