Monday, 1 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ एप्रिल २०१९ दुपारी .०० वा.

****



 मतदान पडताळणी पावती यंत्र - व्ही व्ही पॅट संदर्भात निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या शपथपत्रा बाबत, येत्या आठवडाभरात आपलं उत्तर द्यावं, असं सर्वोच्च न्यायालयानं, २१ राजकीय पक्षांना सांगितलं आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात या २१ पक्षांच्या नेत्यांनी, किमान पन्नास टक्के व्ही व्ही पॅट यंत्रांमधल्या मतदान पावत्यांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी, याचिकाकर्त्यांच्या वकिलांना, येत्या सोमवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान पावत्या पडताळणी करण्याची सध्याची पद्धत अधिक सुसंगत असून, या प्रक्रियेत बदल करण्यासाठी, याचिकाकर्त्या पक्षांनी ठोस कारण दिलेलं नाही, असं आयोगानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

****



 दिल्ली पोलिसांच्या एका विषेश पथकांनं आज जम्मू काश्मीरची राजधानी, श्रीनगर मधून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी फैयाज अहमद याला अटक केली. फैयाजला पकडण्यासाठी दोन लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. पीटीआयच्या वृतानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाने फैयाजच्या विरोधात अजामीनपात्र वाँरंट बजावलं होतं, २०१५ पासून तो अटकेपासून बचावासाठी फरार होता.

****



 ॲमीसॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या शास्त्रज्ञांचं देशभरातून अभिनंदन होत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आपल्या संदेशात, इस्रोनं विज्ञान आणि तंत्रज्ञानात साध्य केलेल्या यशामुळे संपूर्ण देशाचा आत्मविश्वास दुणावल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात, ही इस्रोची ऐतिहासिक झेप असल्याचं म्हटलं आहे. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा इथून, महाराष्ट्रातल्या प्रचार मोहिमेला प्रारंभ केला. घराणेशाही, भ्रष्टाचार, हिंदू दहशतवाद, आदी मुद्यांवरूनही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. गरीबांच्या नावाखाली योजना आणून, आपल्या तिजोऱ्या भरण्याचं काम या पक्षांनी केल्याचं मोदी म्हणाले.



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात, त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मोदी म्हणाले. पवार यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोदी यांनी केला.



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातले शिवसेना भाजपचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. सरकारनं गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामकाजाचा आढावा मोदी यांनी यावेळी घेतला.



 दरम्यान पुढच्या आठवड्यात मोदी यांची गोव्यात प्रचार सभा होणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदार संघातून, भारतीय कम्युनिस्ट पक्ष माघार घेणार नसल्याचं, भाकपचे महासचिव एस सुधाकर रेड्डी यांनी म्हटलं आहे. वायनाड मतदार संघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर रेड्डी बोलत होते. भाकपनं पी पी सुनीर यांना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे, सुनीर हे पूर्ण ताकदीनं, ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करतील, असं रेड्डी यांनी सांगितलं. उत्तरप्रदेशातल्या अमेठी इथून पराभवाची भीती असल्यामुळेच, राहुल गांधी केरळमधल्या वायनाड इथूनही निवडणूक लढवत असल्याचं, भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे.

****



 राज्यातल्या तरूणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 'आदित्य संवाद' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. युवासेनेचे पदाधिकारी विहंग सरनाईक यांनी ही माहिती दिली. हा कार्यक्रम अराजकीय असून उद्या दोन एप्रिलला संध्याकाळी, औरंगाबाद इथून या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. सात एप्रिलला नाशिक, १३ एप्रिल कोल्हपूर, २१ एप्रिल मुंबई तर २४ एप्रिलला पिंपरी चिंचवड इथं आदित्य संवाद कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हासाठी मुबलक पर्याय उपलब्ध असणार आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांची निवडणूक चिन्हं निश्चित झाली असून अपक्षांसाठी १९८ चिन्हं उपलब्ध आहेत. 2014 च्या निवडणुकीत अपक्षांसाठी फक्त ८७ चिन्हं उपलब्ध होती. दैनंदिन वापरातल्या वस्तू, फळं, भाज्या, शेतीची अवजारं, तसंच खेळांशी संबंधित वस्तूंचा या निवडणूक चिन्हांमधे समावेश आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...