Thursday, 18 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेसचं आघाडी सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाईल. भाजप प्रणित विरोधी पक्षानं देखील अविश्वास दर्शक ठराव आणण्याचा प्रयत्न केला पण विधानसभा अध्यक्षांनी त्या ठरावाला अनुमती दिली नाही. बंडखोर आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याची सक्ती करु नये, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर 13 महिन्यांच्या या आघाडी सरकारवर अल्पमतात जाण्याची नामुष्की ओढवली आहे.
****

 आसाममधल्या 29 जिल्ह्यांमधे झालेल्या पुरामुळे जवळपास 57 लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. नद्यांची पाणी पातळी काहीशी कमी झाल्यानं परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या 24 तासांत 10 जणांचा बळी गेला आहे. पूर आणि दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. जलसंपदा मंत्री केशब मंहता आज या भागाला भेट देणार आहेत.   
****

विधान सभेसाठीच्या मतदानासाठी मतदार याद्याच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम सुरु झाला असून एकोणीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत तसंच निवडणूक उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मतदारांना त्यांचं नाव, मतदान केंद्र या विषयीच्या शंकांचं निरसन करण्यासाठी २०, २१ आणि २७,२८ जुलै हे चार दिवस विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं, जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितलं.
****

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम आणि लोकोपयोगी उपक्रम आयोजित केले जाणार असून यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी काल ही माहिती दिली. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****

 मुबंईहून गोरखपुरला जाणारी अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्सप्रेसचं एक चाक आज पहाटे इगतपुरी कासारा घाटात रुळावरून घसरलं, चालकानं यावेळी प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दूर्घटना टळली. पहाटे साडे तीन वाजता ही दूर्घटना घडली. यामुळं या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****  
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...