आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ ऑक्टोबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज आपला चौऱ्याहत्तरावा
वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसा निमित्त दीर्घायू
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा देताना त्यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. राष्ट्रपती
कोविंद यांचा जन्म १९४५ मध्ये उत्तरप्रदेश मधील कानपूर इथं झाला आहे.
****
बिहार राज्यात आलेल्या पुराचा आतापर्यंत अठरा जिल्ह्यांतल्या
सोळा लाख लोकांना फटका बसला आहे. पाटणा बक्सर, भागलपूर, पूर्णिया, अररिया या जिल्ह्यांसह
अनेक भागात मदत आणि बचावकार्य जोरात सुरू आहे. पूरग्रस्त बिहारला केंद्राकडून सर्वोतोपरी
मदत दिली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल बिहारचा दौरा
केल्यानंतर दिली. या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं बिहार चे मुख्यमंत्री
नितीश कुमार यांच्या बरोबर बोलणं झालं आहे, अशीही माहिती प्रसाद यांनी दिली.
****
सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीचा
तिढा अद्याप कायम असताना भाजपचे स्थानिक नेतेही ही जागा अद्याप शिवसेनेला सुटलेली नसल्याचं
सांगत आहेत.
दरम्यान,
शहर मध्यची शिवसेनेची उमेदवारी दिलीप माने यांना मिळणार की महेश कोठे यांना, हे शिवसेनाप्रमुख
आज दुपारी बारा वाजता जाहीर करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
निर्भय आणि मुक्तपणे मतदान करण्यासाठी नागरिकांना
प्रोत्साहित करावं, असं आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश
जयवंशी यांनी केलं आहे. ते काल हिंगोली इथं, जिल्हा स्वीप समितीच्या मतदार जागृती बाबत
कार्यशाळेत बोलत होते. सुमारे बाराशे शिक्षक तसंच प्राचार्य या कार्यशाळेत सहभागी झाले
होते.
****
अमरावतीच्या गुरुदेव सेवाश्रम या संस्थेचा सुदाम
सावरकर राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत
यांना प्रदान करण्यात आला आहे. ‘भारतरत्न डॉ. अटल बिहारी वाजपेयी’ या चरित्र ग्रंथासाठी
सावंत यांची या पुरस्काराकरता निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
*****
***
No comments:
Post a Comment