Monday, 18 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाला आज गोंधळातच सुरूवात झाली. राज्यसभेत दिवंगत सदस्य ला गणेशन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचं १५ ऑगस्ट रोजी वयाच्या ८० व्या वर्षी निधन झालं. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी बिहार मतदार यादीच्या मुद्यावर घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ सुरूच राहिल्यामुळे सभापती हरीवंश यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले.

लोकसभेतही सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी मतदार यादी पडताळणीच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करत गोंधळ सुरू केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सदस्यांना वारंवार आवाहन करूनही गोंधळ सुरूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

****

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार कसलाही निष्काळजीपणा सहन करणार नाही, असं शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि शाळा मंडळांना वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातात, असं त्यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. नुकतंच केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिल्याचं ते म्हणाले.

****

बनावट कीटकनाशके, खत आणि बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांनी मध्य प्रदेश दौऱ्यात बनावट रसायनांच्या फवारणीमुळे सोयाबीन पिकांना झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते.

बाईट - कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

****

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील यशस्वी मोहीम पूर्ण करणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ प्रवासावर विशेष चर्चा करून त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी अंतराळ कार्यक्रमावरही महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.

****

चीनचे परराष्ट्र मंत्री आणि कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिट ब्युरो सदस्य वांग यी आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि विशेष प्रतिनिधी अजित डोवाल यांच्यासोबत ते भारत - चीन सीमा प्रश्नावर चर्चा करणार आहेत.

****

बांगलादेश सरकारनं भारतातून कांद्याच्या आयातीला परवानगी दिली आहे. कांद्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी साडेपाच महिन्यांनंतर ही परवानगी देण्यात आली आहे. काल भारतातून ८०० टन कांद्याची निर्यात बांगलादेशात पोहोचली. स्थानिक कांद्याच्या किमतीत घसरण आणि भारतीय कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे, ही आयात थांबवण्यात आली होती.

****

परभणी जिल्ह्यातल्या निम्न दूधना धरणाचे दोन दरवाजे आज घडण्यात आले असून दूधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर, हिंगोली जिल्ह्यात सिद्धेश्वर धरणाचे १२ आणि इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पैनगंगा आणि पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

मुंबईत अतिवृष्टीमुळे शाळा, महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं असून, सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

****

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् आज सकाळी दिल्लीकडे रवाना झाले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी, एनडीएचे उमेदवार म्हणून राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राधाकृष्णन यांना शुभेच्छांसह निरोप दिला.

उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असून ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपती जनदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

****

महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची आणि संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान मूळ कागदपत्रांची आणि प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.

****

No comments: