Wednesday, 25 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी मराठवाड्यात जागा उपलब्ध करून देणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात या संस्थेची त्रेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. याबाबतचा निर्णय तातडीने घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री तसंच संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यशासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही योजना आणणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात आजही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. अहमदनगर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं संदेश फेरी काढण्यात आली. या संदेश फेरीत खासदार सुजय विखे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे, यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले.



 गोंदिया इथंही अनेक सामाजिक संस्थांनी या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य पदयात्रा काढली.



 हिंगोली इथं काल नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची परवानगी नसताना तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला असताना हा मोर्चा काढण्यात आला होता, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 देशातून दहशतवाद संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी नागरिकता सुधारणा कायद्यासारखे निर्णय घेतले जात असल्याचं माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी म्हंटलं आहे. आज यवतमाळ इथं, या कायद्याच्या समर्थनात राष्ट्रीय विचारमंचने काढलेल्या मोर्चाच्या समारोपात ते बोलत होते. 

****



 माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जंयती निमित्त आज उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीच्या वतीनं लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. औरंगाबादचे मोफत अन्नदान करणारे राजकुमार खिंवसरा, सेवानिवृत्तीनंतर समाज सेवा करणारे रघुवीर आणि सुशील ओक, तसंच उस्मानाबाद शहरात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत सेवा देणाऱ्या अन्नपूर्णा समुहाला लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

****



 कर्नाटकलगतच्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात मार्गशीर्ष अमावस्या वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते. आज हा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे लातूरचे वार्ताहर

 खरीब पेरणी नंतर जी सातवी अमवस्या येते तिला विअमवस्या म्हणून साजरी केली जाते. रब्बीचं पिक बहरात आलेलं असत. आणि त्यावेळेला सगळे शेतकरी आपापल्या शेतामध्ये पाडंवाची पूजा करून वन भोजनाचा आनंद घेतात. अरूण समुद्रे, आकाशवाणी, लातूर.

****



 भारतीय वाङमयाचा क्रमिक अभ्यासक्रमात समावेश होणं आवश्यक असल्याचं मत प्राध्यापक डॉ. नंदकुमार नाईक यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या, ज्येष्ठांच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर झालेल्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवींनी स्त्री व्यथा, शेतकरी समस्या, निसर्ग अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांच्या उपस्थितीत आजच्या काळात कुटुंबाच्या दोन पिढीतील अंतर : एक चिंतेचा विषय, यावर परिसंवाद झाला. उद्या या संमेलनाचा समारोप होणार आहे.

****



 माजलगाव-परभणी या महामार्गावर गंगामसला इथं काल रात्री खासगी प्रवासी बस आणि कारच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये परभणीच्या शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य विनायक जावळे, त्यांची कन्या आणि कारचालक यांचा समावेश आहे. 

****



 नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथं ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादन केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन भरवण्यात आलं. या यात्रेत जिल्ह्यातल्या महिला बचत गटांचे विक्री प्रदर्शन आणि खाद्यपदार्थांचे १०० स्टॉल लावण्यात आले आहेत.

*****

***

No comments: