Saturday, 28 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 राज्य सरकारनं आज महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शासन निर्णय जारी केल्यानंतर अनेकांनी या योजनेतल्या अटीवरून नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः मुद्दल आणि व्याजासह दोन लाख रूपये थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट अपात्र ठरवण्याच्या अटीवरून अधिक नाराजी असल्याचं दिसून येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घाईगडबडीत हा निर्णय घेतल्याचं म्हटलं असून यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नव्या कर्जमाफी योजनेनुसार, मागील वर्षी जो शेतकरी थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर यंदा ज्यांनी कर्ज काढलं ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे.



 भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनीही ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्याचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारनं प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची सरसकट फसवणूकच केल्याचा त्यांनी आरोप केला.



 कर्जमाफीसाठी घातलेल्या अटी पाहता राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे. निवडणुकीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते पाळलं गेलं नाही, असं ते म्हणाले.



 दरम्यान, दोन लाख रूपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत सरकार वेगळा विचार करत असल्याचं राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या कर्जदार शेतकऱ्यांनाही मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. यासाठी अशा शेतकऱ्यांची संख्या, त्यांनी घेतलेलं एकूण कर्ज आणि त्यावरील व्याजाची माहिती सरकार सध्या संकलित करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीदेखील सरकार एक योजना आखत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

****



 ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये ५१ किलो वजनी गटात मुष्टीयुद्धा मेरी कोम हिनं आज निखत झरीन हिचा पराभव केला. पुढच्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दिल्लीमध्ये पात्रता फेरीसाठीचे सराव सामने सध्या सुरु आहेत. ५७ किलो वजनी गटाच्या सामन्यात साक्षी चौधरीनं दोन वेळची रौप्य पदक विजेती सोनिया लाथेरला हरवलं. ६० किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेती सिम्रनजीत कौरनं विश्व विजेती सरिता देवीला पराभूत केलं.

****



 ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमीतल्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार आशिष शेलार, यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सबनीस यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं. सबनीस यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं होतं.

****



 नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातही या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जमियत उलेमा संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  निवेदन सादर केलं.

****



 जालना जिल्ह्यात मंठा तालुका पशुचिकित्सालयातल्या पशुसंवर्धन सहायक आयुक्त बाळासाहेब राजूरकर याच्या विरुध्द पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज गुन्हा दाखल केला आहे. राजूरकर यानं तक्रारदार शेतकऱ्याच्या गायीवर उपचार करण्यासाठी ही लाच मागितली होती.  लाचलुचपत विभागानं केलेल्या पडताळणीत लाच मागिल्याचं निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान, राजूरकर सेवानिवृत्त झाला आहे.

****



 अहमदनगर- कर्जत मार्गावर आंबिलवाडी इथं  राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मोटार गाडीचा अपघात होऊन तीन जण ठार झाले, आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये कारचा चालक अरुण फुसौंदकर, याच्यासह बारा वर्षीय अर्जुन भगत या मुलाचा आणि ताराबाई भगत या महिलेचा समावेश आहे. हे सर्व अहमदनगरचे रहिवासी होते. जखमींमध्ये बस चालकासह अन्य काही जणांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 आठव्या  अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला आजपासून कोल्हापूर इथं प्रारंभ झाला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. शालेय शिक्षणात संत वाड्:मयाचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती  देसाई यांनी यावेळी बोलतांना दिली. वारकरी परिषदेच्यावतीनं हे संमेलन घेण्यात येत आहे.

*****

***

No comments: