Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 22 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्यातल्या शेतक-यांना दिलासा देत राज्य सरकारनं महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३०सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी काल विधीमंडळात केली. ही योजना एक मार्चपासून लागू होईल तर एक जूनपासून कर्जाचं पुनर्गठन केलं जाईल. सिंचनाचे बळीराजा जलसंजीवनी योजनेतील बावन्न रखडलेले प्रकल्प जून २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्यानं प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात सांगितलं. गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा विदर्भातील चार जिल्ह्यांत भातशेती वाढविण्यासाठी आणि ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी भातशेती मिशन राबवण्यात येईल. यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यापूर्वी शासनातर्फे प्रति क्विंटल पाचशे रुपयांचं अनुदान दिलं जात होते आता त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि सुधारणांसाठी चालू असलेल्या विशेष योजनेसाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधीचे नवीन स्त्रोत निर्माण करून रस्त्यांच्या सुधारणेला गतीशील चालना दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जुनं, पारंपरिक तंत्रज्ञान वापरण्याऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर रस्त्यांचा दर्जा उंचावेल आणि रस्ते अधिक काळापर्यंत टिकतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात व्यक्त केला.
****
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शन शांततेत व्हावीत, असं आवाहन
एआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. हैदराबाद इथं पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीवेळी त्यांनी हे आवाहन केलं. इतर देशांमधून विस्थापित झालेल्यांना नागरिकत्व देण्याला नव्हे तर धर्माच्या आधारे भारताचं नागरिकत्व देण्याला आपला विरोध असल्याचं ओवैसी यांनी यावेळी नमुद केलं.
****
नागरीकत्व सुधारणा विधेयकाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकडून समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या मजकुराची तपासणी करायला सांगण्यात आलं नसल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशाप्रकारचे कुठल्याही प्रकारचे निर्देश दिले गेले नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
भाजप तसंच विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लोकाधिकार मंच या संस्थांतर्फे आज नागपूर इथं नागरिकत्व सुधारणा कायदा -सीएएच्या समर्थनार्थ फेरी काढण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात सहभाग घेतला. काही राजकीय पक्ष जाणूनबुजून लोकांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल अफवा पसरवत आहेत आणि देशात अशांतता निर्माण करत आहेत, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद इथं `औरंगाबाद फर्स्ट` या संस्थेच्या वतीनं ‘झाडांना वेदनामुक्त करुया’ अभियानाचा प्रारंभ आज उद्योजक मानसिंग पवार यांच्या हस्ते झाला. झाडावर ठोकलेले खिळे काढून त्यांनी या अभियानाची सुरूवात केली. शहरातल्या दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली. औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी, मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, प्रयास ग्रुपचे प्रतिनिधी या मोहीमेत सहभागी झाले.
****
No comments:
Post a Comment