आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ डिसेंबर २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
या वर्षातलं अखेरचं सूर्यग्रहण आज झालं. सकाळी आठवाजेपासून सुरू झालेलं हे ग्रहण पुढचे सुमारे तीन तास म्हणजे जवळपास अकरा वाजेपर्यंत पाहता आलं. अनेक भागात मात्र दाट धुकं आणि ढगाळ हवामानामुळे ही खगोलीय घटना पाहता आली नाही, त्यामुळे खगोलप्रेमींचा हिरमोड झाला.
नाशिक इथं सूर्यग्रहण पाहण्यात ढगाळ आणि धुक्यामुळे अडथळा निर्माण झाला. मात्र अशा स्थितीतही अधून मधून सूर्यग्रहण अनुभवता आल्याचं खगोलप्रेमींनी सांगितलं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रामकुंड परिसरात सौर चष्म्यातून ग्रहण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
****
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान काही भागात पावसाने हजेरी लावली तर सकाळी साडेसात ते आठ या वेळेत जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासूनच अनेक भागात पावसाची भूरभूर सूरू आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातला हरभरा, करडई, गहू या पिकांवर विपरित परिणाम होईल अशी शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा आणि तूर पिकांवर आळीचा प्रदुर्भाव झाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चा निराधार असल्याचं, राज्याचे ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबर रोजी होणार असून, त्याचदिवशी मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. सरकारनं जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment