Wednesday, 25 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. शेतीत पिकांसाठी गरजेपुरतेच पाणी वापरण्याची, कमी पाण्यात येणारी पिकं घेण्याची तसंच ठिबकसिंचन आणि तुषारसिंचनाद्वारे ऊसाची शेती करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली. गुजरातमध्ये ऊसासाठी तुषारसिंचन पद्धत बंधनकारक केल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढलं, शिवाय साखरेचा उताराही वाढल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सर्व गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा, असं आवाहन करतानाच, जी ग्रामपंचायत पाण्याचं योग्य नियोजन करेल, त्या ग्रामपंचायतीला प्रोत्साहनपर वाढीव निधी दिला जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात, जलजीवन मिशनसाठीचे दिशानिर्देशही पंतप्रधानांनी जारी केले. लद्दाख मधलं लेह आणि हिमाचल प्रदेशातल्या मनालीला जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याचं अटल बिहारी वाजपेयी बोगदा असं नामकरण आज करण्यात आलं. आठ किलोमीटर आठशे मीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधलं अंतर शेहेचाळीस किलोमीटरने कमी होणार आहे.



या कार्यक्रमात पंतप्रधानांनी, अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत, देशवासियांना नाताळ सणाच्याही शुभेच्छा दिल्या.

****

दरम्यान, उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ इथं सचिवालयात उभारण्यात आलेल्या वाजपेयी यांच्या २५ फूट उंच पुतळ्याचं अनावरण आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. लखनऊ इथं, अटल बिहारी वैद्यकीय विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे.



राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली "सदैव अटल" या अटलजींच्या समाधीस्थळी जान त्यांना आदरांजली वाहिली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, इतर केंद्रीय मंत्री यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी अटलजींच्या समाधीला पुष्पांजली अर्पण केली.

****

सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांच्या घरकुल बांधकामांसाठी राज्य सरकारने सत्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांना ऑगस्ट मध्ये आलेल्या महापुराचा १०४ गावांना फटका बसला होता. पुरामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी पंच्याण्णव हजार रुपये, तर अंशतः पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. सदरचा निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला असून त्याच्या वाटपाचं नियोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी ही माहिती दिली.

****

मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली मार्गावर ठाकुर्ली इथं पादचारी पुलाच्या कामासाठी आज सकाळपासून रेल्वे वाहतुक बंद ठेवली आहे, त्यामुळे कल्याण बसस्थानक तसंच डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. या कामामुळे जालना दादर जालना जनशताब्दी रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत हा वाहतुक खंड असेल, त्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत होणार आहे.

****

नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ औरंगाबाद इथं राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी या  मोर्चात सहभागी झाले. हा कायदा कोणत्याही नागरिकाच्या विरोधात नाही, मात्र, गैरसमजातून काही लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं. तर तनवाणी यांनी या कायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनाच्या घोषणा लिहिलेले फलक हाती घेऊन, मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले.

****

औरंगाबाद-जालना मार्गावर करमाड जवळ आज सकाळी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला. शेकटा गावाजवळ एक कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या या अपघातात एक प्रवासी जखमी झाला.

****

नांदेड जिल्ह्यात माळेगाव इथल्या यात्रेत आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये कुस्त्यांची दंगल, महिला बालकल्याण कक्षात पाककृती स्पर्धा,  आदी उपक्रमांचा समावेश आहे.  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं असून, शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

****

नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. या निमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी चर्चमधून नाताळनिमित्त पारंपरिक कॅरोल गायन तसंच विशेष प्रार्थनासभा घेण्यात आल्या.

****


No comments: