Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** शेतकऱ्यांना
संपूर्ण कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुनरूच्चार; विधायक विकास
कामांना स्थगिती न देण्याची ग्वाही
** मराठा
आरक्षण याचिकेच्या सुनावणीमधले राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलले नसल्याचं सरकारचं
स्पष्टीकरण
** नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलनं,
काही राज्यात हिंसाचाराच्या घटना
** औरंगाबाद
शहरातली पाणीपट्टी एक एप्रिल २०२० पासून अठराशे रुपये करण्याची महापौर नंदकुमार घोडेले
यांची घोषणा
आणि
** ज्येष्ठ
अभिनेते नटसम्राट श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
****
शेतकऱ्यांना
संपूर्ण कर्जमाफी देण्याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, विधायक विकास
कामांना कधीही स्थगिती न देण्याची ग्वाही काल विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या
धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा
भूभाग राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आपली भूमिका त्यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट
केली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना
दिला होता, त्याचसोबत भाजपची पालखी कायम वाहणार नाही, असाही शब्द दिला असल्यामुळे,
गेले पंचवीस वर्ष वाहत असलेलं ओझं उतरवून ठेवलं, असं ठाकरे यांनी सांगितलं.
अभिभाषणाच्या
उत्तरात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या आपल्या
आश्वासनाबाबत काहीही उल्लेख केला नाही, असा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
यांनी मांडला, या मुद्द्यावरून विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
या गदारोळातच
अध्यक्ष नाना पटोले यांनी, अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर मतदान घेऊन, प्रस्ताव
संमत झाल्याचं जाहीर केलं.
****
महाराष्ट्र
नगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं. एका वॉर्डातून एकच सदस्य
निवडून येईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं
महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती, ती आता रद्द झाली आहे.
****
महाविकास
आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात, सर्वोच्च न्यायालयात मांडलेल्या भूमिकेवरूनही
विधान परिषदेत गदारोळ झाला. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा आरक्षणावर परिणाम होईल,
अशी चिंता सदस्य विनायक मेटे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात सरकारनं निवेदन करावं,
असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च
न्यायालयात दाखल याचिकांमध्ये राज्य शासनाची बाजू मांडणारे वकील बदलले नसल्याचं सभागृह
नेते सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. संविधानातल्या तरतुदींचं पालन करून तीन पक्षांचं
एकत्र सरकार समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करेल आणि महाराष्ट्राला सुखी करण्याचा प्राणपणाने
प्रयत्न करेल असं सांगत त्यांनी, विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. देसाई यांच्या
उत्तरानं समाधान नं झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला.
****
नागरिकत्व
सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी राज्यासह देशभरात काल विविध ठिकाणी आंदोलनं
करण्यात आली. उत्तरप्रदेशाच्या काही भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. मुंबईच्या ऑगस्ट
क्रांती मैदानात अनेक विद्यार्थी आणि युवक संघटनांनी मोर्चा काढला. हजारो निदर्शक यावेळी
जमले होते. का कायदा नष्ट करण्याची मागणी करणारे अनेक फलक यावेळी झळकावण्यात आले. काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस तसंच डाव्या पक्षांनी आझाद मैदानावर निदर्शनं केली.
नागपूर
इथं मुस्लिम परिषद आणि जमाते हिंद संघटनेनं विधान भवनावर मोर्चा नेला. नागरिकत्व सुधारणा
कायदा रद्द करण्याच्या मागणीसह राज्यात मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाची मागणी
आंदोलकांनी केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी झाले होते.
उस्मानाबाद
इथं पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
काढत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना सहभागी
झाल्या.
नांदेड
इथं विद्यार्थी कृती समिती आणि विविध १२ विद्यार्थी संघटनांच्या वतीनं डॉ. बाबासाहेब
आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयवर विराट विद्यार्थी मोर्चा काढण्यात आला होता.
पुणे, सांगली, अमरावती, नाशिक, सोलापूर, सातारा, अहमदनगरसह विविध जिल्ह्यातही काल आंदोलन
करण्यात आलं.
दरम्यान,
औरंगाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या कायद्याच्या समर्थनार्थ काल डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला होता. मात्र, एमआयएम विद्यार्थी संघटना
आणि आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाला विरोध करत निदर्शनं केली. यावेळी
पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं
हा मोर्चा विनापरवानगी काढल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
देशात
महिला अत्याचाराच्या घटनांसंदर्भात आणि निर्भया सारख्या प्रकरणी अजून शिक्षा होत नसल्यानं
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धी इथं मौन व्रत धारण करणार आहेत. त्यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे
ही माहिती दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनं काल दोन हजार ७५० कोटी पाच लाख रुपये जमेचा, दोन
हजार ७४५ कोटी पाच लाख रुपये खर्चाचा आणि पाच लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिकेच्या
सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्याचबरोबर एक एप्रिल २०२० पासून पाणीपट्टी चार हजार पाचशे
रुपयांवरुन कमी करुन अठराशे रुपये करण्याची घोषणाही महापौर नंदकुमार घोडेले यांनी सभेत
केली. महापौरांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात करवसुलीच्या उपाययोजना करण्याचे सर्व
अधिकार आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना बहाल करण्यात आले.
दरम्यान,
उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ३१ डिसेंबरला होणार आहे. भाजपचे उपमहापौर विजय औताडे
यांचा राजीनामा महापौर घोडेले यांनी स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर
यांनी निवडणुकीसाठी ही तारीख निश्चित केली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या येरमाळा इथं काल २८२ किलो बनावट खवा पकडण्यात आला.
सांगली इथून येणारा बनावट खवा येरमाळा इथल्या खवा वितरण केंद्रातून राज्यासह बाहेर
पाठवला जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाल्यानंतर छापा टाकून हा खवा
जप्त करण्यात आला.
****
औरंगाबादच्या
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा शुभारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसंच संस्थेचा ३७वा वर्धापदन दिनही आज साजरा
होत आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांचा शरद पवार यांच्या हस्ते अमृतमहोत्सवी
गौरव यावेळी करण्यात येणार आहे.
****
निराधार
बालकांचं दत्तकाद्वारे पुनर्वसन करणाऱ्या साकार या संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा आज
औरंगाबाद इथं होणार आहे. भानुदास चव्हाण सभागृहात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या
सोहळ्यात, प्रसिद्ध सिने कलावंत चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांची प्रकट मुलाखत
होणार आहे.
****
ज्येष्ठ
अभिनेते नटसम्राट श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
होणार आहेत. लागू यांचं मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्यानच निधन झालं, ते ९२ वर्षांचे
होते.
****
पुण्याच्या
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं साखर उद्योगात उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी
पुरस्कार दिले जातात. यंदा लातूर जिल्ह्यातल्या रेणा साखर कारखान्याला उत्तर-पूर्व
विभागातून तांत्रिक कार्य क्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष
आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार
समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात, अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र
संशोधन प्रकल्पाअंतर्गत, ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेला २०१८ सालचा देशातले सर्वोत्कृष्ट
केंद्र म्हणून गौरवण्यात आलं. ग्वाल्हेर इथं राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठात
आयोजित १३ व्या वार्षिक राष्ट्रीय आढावा बैठकीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
जालना
जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या देऊळझरी गावात विकास कामं प्राधान्यानं पूर्ण
करण्याचे निर्देश खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिले आहेत. काल जालना जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात
आलेल्या देऊळझरी गावातल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. शासनानं उपलब्ध
करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून गावात आरोग्य, वीज, पाणीपुरवठा तसंच शैक्षणिक सुविधा
आदी कामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात जीप आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात एक जण ठार तर अन्य पाच जण गंभीर जखमी
झाले. उमरगा तालुक्यात जकेकुर गावाजवळ काल दुपारी ही दुर्घटना घडली. उमरगा मार्गे बसवकल्याणकडे
जाणारी जीप आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रॅक्टरची आप–आपसात जोरदार धडक होऊन हा अपघात
झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली
जिल्ह्यातही दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यात जिंतूर टी पाईंट
नजीक परिवहन महामंडळाची बस आणि मोटारसायकमध्ये झालेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार
झाला. तर गंभीर जखमी दुसऱ्या तरुणाचा उपचारासाठी नांदेड इथं नेताना मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment