Monday, 16 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 16.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा मांडण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, स्थगन प्रस्ताव दिला, यासंदर्भात निवेदन करताना, फडणवीस यांनी सावरकरांबाबत केलेला उल्लेख कामकाजात न घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली, त्यावरून विरोधी पक्षानं जोरदार घोषणाबाजी करून निषेध दर्शवला. त्यापूर्वी सदनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपच्या वतीनं याच मुद्यावरून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोनवेळा स्थगित करण्यात आलं.

या प्रकरणी सदनाबाहेर पत्रकारांशी बोलताना, फडणवीस यांनी, सावरकरांबाबतचे उद्गार कामकाजातून काढण्याचे आदेश दिले जात असताना, मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल निषेध व्यक्त केला.



विधीमंडळानं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज संमत केला

विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. सदनानं हा अभिनंदनाचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर केला.



विधान परिषदेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मान्यवर सदस्यांनी सरन्यायाधीशांचं अभिनंदन करणारी भाषणं करून, हा प्रस्ताव एकमुखानं संमत केला.



विधानसभेत दिवंगत सदस्य माणिकराव सबाणे, अशोक तापकीर, यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अजित पवार, बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक सदनांनी या दोन्ही नेत्यांच्या कार्याला उजाळा देत, अभिवादन केलं.

****

सोळा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत मांडण्यात आल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी साडे सातशे कोटी रुपयांच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदतीचं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

****

कोट्यवधी रुपयांच्या विदर्भ सिंचन घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय कडून चौकशी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे, या याचिकेवर न्यायालयानं राज्य सरकारला येत्या पंधरा जानेवारीपर्यंत शपथपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळातल्या या सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा तसंच प्रकल्पांचे आकडे फुगवल्यानं हा घोटाळा सत्तर हजार कोटीरुपयांपर्यंत पोहोचल्याचं, या बातमीत म्हटलं आहे.

****

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला आव्हान देणारी एक याचिका कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय परवा बुधवारी सुनावणी करणार आहे.

****



झारखंड इथल्या एका निवडणूक प्रचारसभेत कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला अत्याचाराबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं झारखंडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या तक्रारीवरून आयोगानं हा अहवाल मागवला आहे. राहुल गांधी यांच्या विरूद्ध कारवाईची मागणी या प्रतिनिधी मंडळानं केली आहे.

****

अर्थव्यवस्थेच्या दरात घट होण्याची शक्यता या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच भारतीय रिजर्व्ह बँकेच्या लक्षात आली होती असं बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत एका संमेलनात बोलत होते. हा अंदाज आल्यामुळेच बँकेने वेळेआधीच व्याज दरात कपात केली होती, आता या दरावर निर्बंध लावण्याचा बॅंकेचा निर्णयही योग्यच आहे असं दास यांनी नमूद केलं.

****

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या विविध घटकांशी एका बैठकीत चर्चा करत आहेत. वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर, वित्त सचिव आर्थिक कार्य सचिव माहिती आणि तंत्रज्ञान सचिव मुख्य आर्थिक सल्लागार आदी मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत.

****

या महिनाअखेरपर्यंत आधार आणि पॅन नंबर संलग्न करणं अनिवार्य असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आयकर सेवांचा लाभ मिळणार असल्याचंही विभागाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीनं आधार आणि पॅन नंबर जोडण्याची मुदत ३१ सप्टेंबरवरुन ३१ डिसेंबर केली आहे. 

****

कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२१ व्या जयंती निमित्त अकोला इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर येत्या २७ ते २९ डिसेंबर पर्यंत तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात नवीन तंत्रज्ञान, संशोधन, आदीसह आधुनिक शेती विषयावर शेतकऱ्यांसाठी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.



****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...