Saturday, 1 February 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.02.2020.....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 February 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०१ सकाळी ७.१० मि.

****

·      आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर होणार.

·      विकासाचा दर साडे सहा टक्क्यांपर्यंत राहण्याचा आर्थिक सर्वेक्षणाचा अंदाज. 

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्रकारितेतून सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव - ‘मूकनायक’ शताब्दी परिसंवादात विचारवंतांचं मत.

आणि

·      भारताचा न्यूझीलंडवर सलग दुसऱ्या रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हर जिंकून विजय.

****

आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी अकरा वाजता लोकसभेत सादर करतील. काल त्यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासाचा दर सध्याच्या पाच टक्क्यांवरून साडे सहा टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट औद्योगिक क्षेत्राच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचं, या सर्वेक्षणा अहवालात म्हटलं आहे. खातेधारकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रशासकीय कामकाजात सुधारणा तसंच कर भरणा, मालमत्ता नोंदणी, नवीन व्यवसाय उभारणी आदी व्यवहार अधिकाधिक सुलभ करण्याची आवश्यकता या अहवालातून मांडण्यात आली आहे.

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासह केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांचा राष्ट्रपतींनी आढावा घेतला. राष्ट्रपतींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करताच, विरोधी पक्षांच्या खासदारांनी याविरोधात घोषणाबाजी केली.

काँग्रेस पक्षानं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टीका केली आहे. या अभिभाषणात महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचा उल्लेख नसल्याचं, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

****

दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चार दोषींच्या डेथ वॉरंट म्हणजे मृत्यू निर्देशाला दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे या चौघा दोषींना आज होणारी फाशी, पुढचे आदेश येईपर्यंत लांबणीवर गेली आहे. या चौघा दोषींपैकी काही जणांचे माफीचे पर्याय खुले असल्यानं, फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी या दोषींच्या वकिलानं न्यायालयाकडे केली होती.

****

समान काम - समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं कालपासून दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. याअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांसह विभागीय ग्रामीण बँकांच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी काल ठिकठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद शहरात अदालत रस्त्यावर महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर निदर्शनं करण्यात आली. या दोन दिवसीय या संपात जिल्ह्यातले तीन हजाराहून अधिक अधिकारी कर्मचारी सहभागी झाले असल्याचं बँक संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं.

लातूर इथंही बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखे समोर धरणे आंदोलन केलं. या आंदोलनाला कॉंग्रेस तसंच शेकापच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत.

****

मराठवाडा वाटरग्रीड योजना तांत्रिक कारण देत, रद्द केल्यास, संपूर्ण मराठवाड्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. ते काल जालना इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून या योजनेच्या कामासाठी एकत्र यावं, असं आवाहन करतानाच लोणीकर यांनी, योजना रद्द केल्यास न्यायालयीन लढा उभारण्याची तयारी असल्याचं सांगितलं आहे.

****

राज्यातल्या ज्या विकास प्रकल्पांना नियोजन आराखड्यातून निधी देता येत नाही त्यांना राज्य शासनाकडून निधी देण्यासाठी, अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. नाशिक विभागातल्या पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजन आराखड्यांचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांशी काल ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या शाळांना वीज दरात सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे, असं ते म्हणाले. राज्यातल्या दोन लाख रूपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात समितीमार्फत अभ्यास सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

****

लोकोपयोगी योजना बंद करणं, हाच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते काल सोलापूर इथं बोलत होते. एखादी योजना बंद करताना त्या योजनेला पर्याय देणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.

****

मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर उपाय योजना करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उद्या रविवारी औरंगाबाद इथं बैठक बोलावण्यात आली आहे. आमदार प्रशांत बंब यांनी काल ही माहिती दिली. मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून सामाजिक विषमतेच्या मुळावर घाव घालण्याचं काम केलं, असं मत काल औरंगाबाद इथं झालेल्या ‘मूकनायक’ शताब्दी परिसंवादात विचारवंतांनी व्यक्त केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातर्फे हा परिसंवाद घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि प्रसिद्ध लेखक डॉ.ऋषीकेश कांबळे यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि सद्यकालीन परिस्थिती’ या विषयावर विचार मांडले.

महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे मूकनायक शताब्दीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित या व्याख्यानमालेत पत्रकार निरंजन टकले यांनी, ‘मतदानाचा अधिकार आणि लोकशाही निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान’ या विषयावर काल पहिलं पुष्प गुंफलं.

****

न्यूझीलंडसोबत सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेत काल चौथ्या रोमहर्षक सामन्यात भारतानं सुपर ओव्हर जिंकून विजय मिळवला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत आठ बाद एकशे पासष्ट धावा केल्या. न्यूझीलंड संघानंही निर्धारित षटकांत सात बाद एकशे पासष्ट धावा केल्यानं, सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

न्यूझीलंड संघानं सुपर ओव्हरमध्ये एक बाद तेरा धावा केल्या, भारतीय संघानं एक बाद चौदा धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामन्याच्या अखेरच्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करून यजमान संघाचे चार गडी तंबूत पाठवणारा शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला. मालिकेतला तिसरा सामनाही भारतानं सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. कालच्या विजयानंतर भारतानं चार शून्य अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेतला पाचवा सामना उद्या रविवारी दोन फेब्रुवारीला होणार आहे.

****

परभणी इथं झालेल्या पोलिस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात लाठी काठी आणि दांडपट्ट्याचं चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या ओंकार तिडके या आठ वर्षीय बालकाचा काल परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी ओंकारच्या साहसी खेळाचं कौतुक केलं.

****

औरंगाबाद -जालना मार्गावर काल झालेल्या अपघातात चार जण ठार तर नऊ जण जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात अन्य एका अपघातात एक जण ठार झाला. कन्नडच्या घाटात एक कंटेनर कारवर आदळून हा अपघात झाला.

****

नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात हिंगोली इथं काल विविध संघटनांनी जेलभरो आंदोलन केलं. इंदिरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रस्त्यात रोखल्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

****

१८ वं राज्यस्तरीय प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलन आजपासून जालना इथं होत आहे. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काल जालना शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतले शालेय विद्यार्थी, तसंच लेझीम पथक हे या ग्रंथदिंडीचं विशेष आकर्षण ठरलं.

****

परभणी जिल्हा परिषदेत सभापती अंजली आनेराव यांना शिक्षण आणि आरोग्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी यांना बांधकाम आणि अर्थखातं तर मीरा टेंगसे यांना कृषी तसंच पशुसंवर्धन खातं देण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत हे खातेवाटप करण्यात आलं. 

****

बीड जिल्ह्यातल्या केज इथं पोलिसांनी काल १५ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. मुजाहीद कुरेशी असं पान मसाला विक्रेत्याचं नाव असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्याच्या दुकानासह गोदामावर छापा मारुन ही कारवाई केली. 

****

मुंबई इथं झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्री उपक्रमात, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या आरसनाळच्या हरिओम महिला स्वयंसहाय्यता समूहानं सर्वोत्कृष्ट विक्रीचा प्रथम क्रमांक पटकावला. डिजीटल व्यवहार, उत्कृष्ट नियोजन आणि विपणन व्यवस्थापनासाठीचा द्वितीय पुरस्कार लातूर जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाला तर आकर्षक स्टॉल मांडणी आणि सजावटीचा  तृतीय क्रमांक लातूर तालुक्यातल्या मुरुडच्या नरेंद्र छाया महिला स्वयंसहाय्यता समुहाला मिळाला. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातून तसंच इतर राज्यातून आलेल्या एकूण ५११ महिला स्वयंसहाय्यता समुहांनी सहभाग नोंदवला होता.

****

जालना इथं महाविद्यालयीन प्रेमीयुगाला मारहाण करत युवतीची छेड काढणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडित युवतीच्या जबाबावरून जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

परभणी शहरात भूमिगत मलनि:सारण योजना राबवावी, अशी मागणी परभणीच्या महापौर अनिता सोनकांबळे यांनी पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे. महापौरांनी काल बनसोडे यांची परभणी इथं भेट घेऊन, ही मागणी केली.

****

लातूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या, राज्यस्तरीय ‘कृषी नवनिर्माण’ या कृषी प्रदर्शनाचा समारोप आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतीचा दवाखाना या उपक्रमाचं उद्घाटन तसंच बळीराजा शिष्यवृत्ती योजनेचं लोकार्पणही राज ठाकरे यांच्या हस्ते यावेळी होणार आहे.

****

No comments: