Sunday, 9 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.02.2020 11.00AM

आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०९ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 राज्यात कोरोनाचे संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहा जणांपैकी कुणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या एका चीनी नागरिकाचाही समावेश आहे. राज्यातील ३० रुग्णांच्या चाचणीचे निष्कर्ष आले असून एकालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इतर पाच जणांच्या चाचणीचे निष्कर्ष अजून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडून प्राप्त झाले नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

 दरम्यान, पंधरा जानेवारी नंतर चीनला भेट दिलेल्या विदेशी नागरिकांना भारतात प्रवेश दिला जाणार नसल्याचं उड्डाण नियामक, नागरी उड्डाण महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या भारतीय कंपन्यांनी चीनला ये-जा करणारी  उड्डाणं रद्द केली आहे. केरळमधल्या तीन नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं यापुर्वी स्पष्ट झालं आहे.
****

 आज देशभर संत रविदास जयंती साजरी केली जात आहे. संत रविदास यांचा जन्म चौदाव्या शतकात झाला होता. ते उत्तर भारतातील भक्ती चळवळीचे संस्थापक होते. त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आज वाराणसीच्या सर गोवर्धनपूर येथील श्री गुरु रविदास जन्मस्थान मंदिरात लाखो भाविक दाखल झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना जयंतीदिनी अभिवादन केलं आहे.
****

 सांगली जिल्ह्यात मालगाव इथं साडेपाचशे वर्षापूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत. भगवान महावीर मंदिर जीर्णोद्धारासाठी पाया खोदण्यात येत असताना इथं पंधरा मुर्ती सापडल्या आहेत.
****

 सातारा शहराजवळील कोडोली परिसरात कृष्णा नदी पात्रात कपड़े धुन्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे दोघं कर्नाटकमधील होते, अशी माहिती सातारा शहर पोलीसांनी दिली आहे.
****

 दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील विश्र्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे. भारत या स्पर्धेचा माजी विजेता असून बांगलादेशानं प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे.
****  
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...