Sunday, 20 September 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 September 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्ण संख्येच्या तुलनेत अधिक आहे. या संसर्गाचे ९२ हजार ६०५ नवे रुग्ण आढळले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९४ हजार ६१२ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ७९ पूर्णांक ६८ शतांश टक्के झालं आहे. या संसर्गाच्या दहा लाख दहा हजार ८२४ रुग्णांवर देशभर उपचार सुरू असून एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण १८ पूर्णांक ७२ शतांश टक्के आहे. मृत्यू दर एक पूर्णांक ६१ शतांश टक्के असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

पुण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटच्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ससून रुग्णालयानं दिली आहे. या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ज्या स्वयंसेवकांना चाचणीत सहभागी व्हायचं आहे, त्यांनी नावनोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. `कोविशिल्ड` चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात दीड हजार स्वयंसेवकांना सहभागी केलं जाणार आहे. ससून रुग्णालयामधे साधारण दीडशे स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून काही स्वयंसेवक पुढे आले असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी दिली आहे.

****

मुंबईत सुमारे चोवीस तासात कोरोना विषाणुच्या दोन हजार २११ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ८२ हजार ७७ झाली आहे. यापैकी एक लाख ४२ हजार सातशे एकोणसत्तर रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. मुंबईत या संसर्गामुळे आठ हजार ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांना प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेनं विविध ठिकाणी ‘जम्बो कोविड केंद्र’ सुरू केली आहेत. अकरा खासगी रुग्‍णांलयामध्‍ये कार्यरत ३५ तज्‍ज्ञ डॉक्‍टर त्यांच्या सेवा दूरध्‍वनीद्वारे महापालिकेच्‍या केंद्रांनाही उपलब्‍ध करुन देणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांना कोरोना विषाणुची लागण झाली असल्याचं आज स्पष्ट झालं.

****

ठाणे जिल्ह्यामधे कोरोना विषाणू संसर्गाचे नवे एक हजार ७८८ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात या विषाणुच्या रुग्णांची संख्या एक लाख ५६ हजार ९२२ झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात काल या विषाणू संसर्गामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकूण मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या चार हजार ११६ झाली आहे. कल्याण शहरामधे सर्वाधिक ४७० नवे रुग्ण आढळले असून नवी मुंबईत ४०८ तर ठाणे शहरात ३९५ रुग्ण आढळल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

****

अहमदनगर जिल्ह्यातले एक हजार ५५ रुग्ण काल कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातली एकूण संख्या ३१ हजार १९१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं जिल्ह्यातलं प्रमाण ८६ पूर्णांक ३७ टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यात या संसर्गाचे ७०३ नवे रुग्ण आढळले असून सध्या चार हजार ३३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यात परवा, शुक्रवारपासून येत्या बावीस तारखेपर्यंत जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चिखली वगळता इतर तालुक्यातले व्यापारी या संचारबंदीत सहभागी आहेत.

****

सांगली जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी भागात काल रात्री सलग तीन तास झालेल्या मोठ्या पावसामुळे कोरडा नदीला तीन दशकांत प्रथमच पूर आला आहे. या पुरामुळे सांगली जिल्ह्यातल्या जत आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातले ओढे - नाले भरून वाहू लागले आहेत.

****

धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणाची तीन दारं आज अर्धा मीटरनं उघडण्यात आली असून पांझरा नदी पात्रात तीन हजार २०० घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक इथं मराठा आरक्षण तसंच नोकर भरतीला स्थगितीच्या मागणीसाठी उपोषण करण्याच्या तयारीत असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी आज ताब्यात घेतलं. दरम्यान, मुंबईतल्या लालबाग, विलेपार्ले, दादर प्लाझा या भागात मराठा क्राती मोर्चाच्या वतीनंही या मागणीसाठी आंदोलन सुरू झालं आहे.

//*************//

 

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...