Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
राज्यात ३४ हजार ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात
विविध १५ कंपन्यांसोबत सामंजस्य करार.
·
औरंगाबाद पदवीधर मतदार संघांसह पाच विधान परिषदेच्या जागांसाठी
येत्या एक डिसेंबरला निवडणूक.
·
मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या
अर्जावर सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय घेणार.
·
राज्यात आणखी चार हजार नऊ कोविड बाधितांची नोंद, १०४ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
·
मराठवाड्यात २० रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ३३५ रुग्णांची नोंद.
आणि
·
औरंगाबादमध्ये महिन्याच्या पहिल्या दिवशी कामाच्या ठिकाणी सायकलवर
जाण्याचं अभियान.
****
राज्यात
विविध १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करण्यासंदर्भातल्या
सामंजस्य करारांवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या.
या गुंतवणुकीमुळे राज्यात जवळपास २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. मॅग्नेटीक
महाराष्ट्र दोन अंतर्गत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि विविध कंपन्यांच्या
प्रतिनिधींनी, या गुंतवणुकीसाठीच्या करारांवर सह्या केल्या. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री
ठाकरे यांनी, मागील सामंजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया
पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. काल करार केलेल्या १५ कंपन्यांमध्ये मित्सुबिशी
इलेक्ट्रीक इंडिया, ओरिएंटल ऍरोमॅटिक्स, अदानी एन्टरप्राइजेस आणि एस्सार इंडिया या
कंपन्यांचा समावेश आहे. राज्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचं
राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. गुंतवणूकदार आणि राज्य शासन या दोघांत एकमेकांवर विश्वास
असून, राज्य या कोविड परिस्थितीत नुसतं बाहेर पडणार नाही, तर अधिक सामर्थ्यानं देशात
आघाडी घेईल, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
****
राज्यातल्या
औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन पदवीधर मतदार संघांची आणि अमरावती तसंच पुणे या दोन
शिक्षक मतदार संघांची विधान परिषद निवडणूक, येत्या एक डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक
आयोगानं या निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर केला. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची
मुदत १२ नोव्हेंबर पर्यंत असून, तेरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
१७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असल्याचं
निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या निवडणुकीची अधिसूचना येत्या गुरुवारी जारी केली जाणार
आहे. या पाचही मतदार संघाच्या प्रतिनिधींचा कार्यकाळ गेल्या १९ जुलै रोजी संपला होता.
मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
****
मराठा
आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरच निर्णय घेण्यात
येईल, असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटल्याची माहिती, राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा
आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या अर्जावर
घटनापीठासमोर तातडीनं सुनावणी आवश्यक असल्याची विनंती राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी
यांनी काल सरन्यायाधीशांना केली. त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याचं चव्हाण यांनी
सांगितलं. राज्य सरकारनं यापूर्वी दोन वेळा या मागणीचा अर्ज सरन्यायाधीशांना सादर केला
होता, त्यानंतर काल पुन्हा याच मागणीचा अर्ज सादर केला, त्यावेळी सरन्यायाधीशांनी हे
सूतोवाच केल्याचं चव्हाण म्हणाले.
****
राज्यात
इयत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग कालपासून ‘ऑनलाईन’ सुरु करण्यात आले आहेत. शालेय
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही
महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतील. राज्य
शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी,
असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे. या वर्गांच्या वेळा विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा
एसएमएसच्या माध्यामातून कळवल्या जातील, तीन पाळ्यांमधे हे वर्ग चालवले जाणार आहेत.
दरदिवशी विविध महाविद्यालयातल्या ५० नोंदणीकृत विद्यार्थ्यांना झूम ऍपच्या माध्यमातून
शिक्षण दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातले
गड-किल्ले आणि स्मारकं यांचं संवर्धन करण्यासाठी पुरातत्व संचालनालयानं संरक्षण आणि
विकास योजना तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या
आहेत. राज्यातल्या गड-किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासंदर्भातली बैठक काल मुंबईत झाली,
त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. हा आराखडा कशा पद्धतीनं कार्यान्वित करण्यात येईल,
या बाबतही अभ्यास करण्याचे निर्देश देशमुख यांनी या बैठकीत दिले.
****
इतर
समाजाचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण देण्यास आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोध
दर्शवला आहे. इतिहासात मराठ्यांचं पानिपत झालं, असं नेहमी बोललं जातं. आता आपण एकत्र
आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मराठा
आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीतर्फे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा
समाजातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची सातारा इथं काल गोलमेज परिषद झाली, त्यावेळी ते
बोलत होते. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली
झालेल्या या परिषदेला खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित होते.
****
कृषी
विद्यापीठांनं नव्यानं संशोधित केलेल्या सुधारीत आणि संकरीत वाणांचा प्रसार व्हावा
यासाठी रब्बी हंगामात ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणं अनुदानावर वाटप करण्यात येणार असल्याची
माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. यासाठी ६२ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद
करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्यानं रब्बी
हंगामासाठी अत्यंत पोषक वातावरण असून विविध योजनांअंतर्गत पीक प्रात्यक्षिकं आणि अनुदानित
दरानं बियाणं पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याचं कृषी मंत्र्यांनी यावेळी
सांगितलं.
****
कोरोना
विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सुरु केलेल्या मोहिमेत सहभागी होत, भारतीय क्रिकेट संघाचे
माजी खेळाडू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं
आहे.
****
टाळेबंदीच्या
कालावधीत जास्तीच्या वीज वापरामुळे आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देण्याबाबत
चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता, ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी
व्यक्त केली आहे. राऊत यांनी काल मुंबईतल्या ट्रॉम्बे इथल्या टाटा औष्णिक वीज निर्मिती
केंद्राला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
****
राज्य
परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘नाथजल’ शुद्ध पेयजल
योजनेचं उद्घाटन, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. या योजनेअंतर्गत
महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचं अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून
देण्यात येणार आहे. टप्याटप्यानं राज्यातल्या सर्व बसस्थानकांवर ते उपलब्ध होणार आहे.
****
राज्यात
काल दिवसभरात आणखी चार हजार नऊ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्णसंख्या १६ लाख ८७ हजार ७८४ झाली आहे. राज्यभरात काल १०४ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४४ हजार १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर काल दहा हजार २२५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
१५ लाख २४ हजार ३०४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख १८ हजार ७७७
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल २० कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३३५ रुग्णांची नोंद झाली.
लातूर
जिल्ह्यात आठ बाधितांचा मृत्यू, तर नवे ४८ रुग्ण, जालना जिल्ह्यात पाच बाधितांचा मृत्यू,
तर नवे ५७ रुग्ण, औरंगाबाद जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ७२ रुग्ण, उस्मानाबाद
जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू, तर नवे ३३ रुग्ण आढळून आले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यात
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, नांदेड जिल्ह्यात २९, तर परभणी जिल्ह्यात नव्या
१४ रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात ४८, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या २५ रुग्णांची
नोंद झाली.
****
मुंबईत
काल आणखी ७०६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ३० जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात
३५७ नवे रुग्ण, तर ३१ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात २३२ रुग्ण आढळले, तर दोन
जणांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात २५१, सोलापूर १४१, अहमदनगर १३२, सांगली १०३,
पालघर ६३, गडचिरोली ६२, बुलडाणा ४८, जळगाव ३४, यवतमाळ २२, सिंधुदुर्ग २१, धुळे १९,
रत्नागिरी आठ, तर वाशिम जिल्ह्यात नव्या सात रुग्णांची नोंद झाली.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. सात दिवसांच्या उपचारांनंतर
काल त्यांना घरी सोडण्यात आलं. पुढचे काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन
कामकाज घरुनच करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधीत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ५९ शतांश टक्के
झालं असून, संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन, हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्तकतेनं
उपाययोजना राबवत असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. ते काल या
संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करत होते. ‘माझं कुंटुंब,
माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत या संसर्गाची लक्षणं असलेल्यांवर प्रामुख्यानं यंत्रणा
लक्ष देत असून, जिल्ह्यात पुरेसे रेमेडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी
यावेळी दिली.
****
५००
जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी, काल औरंगाबाद,
जालना, उस्मानाबाद, हिंगोलीसह विविध ठिकाणी काल आंदोलन करण्यात आलं. मंडप, सजावट संघटनांतर्फे
हे आंदोलन करण्यात आलं. टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप विवाह
सोहळ्याला पूर्ण मोकळीक देण्यात आलेली नाही, त्यामुळे आपल्या व्यवसायावर विपरीत परिणाम
होत असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे.
****
औरंगाबादमध्ये
महिन्याच्या पहिल्या दिवशी कामाच्या ठिकाणी सायकलवर जाण्याचं अभियान, महानगरपालिका
प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या संकल्पनेतून, कालपासून महापालिकेत सुरू झालं.
आयुक्तांसह महापालिकेचे अन्य प्रमुख अधिकारीही काल सायकलवर कार्यालयात आले. सायकल चालवण्याकडे
केवळ क्रीडा म्हणून नव्हे तर दैनंदिन जीवनात वाहन म्हणून उपयोग करण्याची मानसिकता सर्वसामान्यांमध्ये
विकसित होणं गरजेचं असल्याचं, पांडेय यांनी म्हटलं आहे. आरोग्याबरोबर प्रदूषण कमी करायला
या सवयीमुळे फायदा होणार असल्यानं नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन
त्यांनी यावेळी केलं.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकांत सुरक्षित सामाजिक
अंतर राखण्याचं आवाहन परभणीचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे
यांनी केलं आहे.
****
जयपूर
घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीततज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं काल ठाणे जिल्ह्यात
अंबरनाथ इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. शास्त्रीय गायक असलेल्या
पणाशीकरांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातही भूमिका केली होती. आडा चौताला सारख्या
कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या दोनशे बंदीशी हा बहुमूल्य ठेवा मानला जातो. गोवा
कला अकादमीचे ते ‘संगीत विभाग प्रमुख’ होते. गोवा राज्य पुरस्कार, कोलकाता संगीत संशोधन
अकादमी पुरस्कारांसह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत सन्मान आदी पुरस्कारांनी
त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१७ साली केंद्र सरकारच्या
मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे त्यांना पाठ्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती.
****
आगामी
सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं मुंबईला जाण्यासाठी तपोवन तसंच राज्यराणी
या रेल्वे तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघानं केली
आहे. यासंदर्भात एक निवेदन संघटनेनं दक्षिण मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांना पाठवलं
आहे. सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाण्यासाठी एकमात्र नंदिग्राम रेल्वे उपलब्ध असून,
आठवडाभरापूर्वी तिकिट घेतल्यानंतरही प्रतिक्षा यादीत जाते, सचखंड आणि परभणी-हैदराबाद
विशेष रेल्वेबाबतही हाच अनुभव असल्याचं मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघानं म्हटलं आहे.
****
परभणीमध्ये
सेवानिवृत्त नागरिकाकडून त्यांच्या ‘एटीएम कार्ड’ची माहिती घेऊन खात्यातून एक लाख एक
हजार ४१ रुपये काढून घेण्यात आल्या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात
आला आहे. रचना कॉलनीतल्या एका ज्येष्ठ नागरिकाला या प्रकारामध्ये बँक व्यवस्थापक असल्याचं
सांगून भामट्यानं लुबाडलं.
****
जालना
जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या आलमगावच्या तलाठी संगीता हैबते हिला दोन हजार रुपयांची
लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. वडिलोपार्जित जमीन
वारसांच्या नावे करण्यासाठी सात बारावर फेर घेण्याकरता तिनं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment