Thursday, 3 December 2020

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०३ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या परवा झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी औरंगाबाद इथल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत होत असून, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मतमोजणीसंदर्भात मार्गदर्शन केलं. विभागातल्या आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवाद अमरीश पटेल यांनी विजय मिळवला आहे.  पटेल यांना ३३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली.

****

जागतिक दिव्यांग दिन आज पाळण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात, दिव्यांग व्यक्तींची सहनशीलता आपल्याला प्रेरणा देत असल्याचं म्हटलं आहे. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचं, पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

नवभारताच्या निर्माणात दिव्यांगांचं महत्वपूर्ण योगदान असावं, यासाठी सरकार दिव्यांगांना कौशल्य विकास प्रशिक्षण देत असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

****

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती. यानिमित्त पंतप्रधानांनी राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन केलं आहे. स्वातंत्र्य संग्राम आणि संविधान निर्माण कार्यात राजेंद्र प्रसाद यांनी अतुलनीय भूमिका बजावली, साधे जीवन, उच्च विचार या सिद्धांतावर आधारित त्यांचं जीवन देशवासियांना सदैव प्रेरित करत राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

भोपाळ वायू दुर्घटनेला आज ३६ वर्ष पूर्ण झाली. १९८४ साली दोन आणि तीन डिसेंबरच्या रात्री झालेल्या या औद्योगिक दुर्घटनेत हजारो नागरीकांचा मृत्यू झाला होता. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना अभिवादन करण्यासाठी आज भोपाळ इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

मातृभाषेत तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्यासाठी रुपरेषा तयार करण्यासाठी एका कृती दलाची सथापना केल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. उच्च शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन हा कृतीदल एका महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करणार आहे.

//************//

 

 

 

No comments: