Thursday, 3 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकर्यांचं दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार शेतकर्यांसोबत चर्चा करत आहे. या चर्चेचा आज चौथा टप्पा आहे. ३२ शेतकरी संघटनांचे ४० प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत ही बैठक सध्या सुरु आहे.तत्पूर्वी यासंदर्भात आजही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यात बैठक झाली.

देशात नव्यानं लागू करण्यात आलेले कृषी कायदे हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं हित समोर ठेवूनच करण्यात आले असून, त्याचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास केल्यानंतरच ते लागू करण्यात आले असल्याचं कृषी मंत्र्यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. शेतकरी वर्गाला त्याबाबत काहीही शंका, हरकती किंवा विरोध असल्यास सरकार त्याबाबत चर्चा करण्यास तयार आहे, मात्र त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही, असं ते म्हणाले.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे.

****

देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिला आहे. या कार्यालयांमध्ये मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असल्यास संबंधित व्यक्तीला तक्रार करण्याचा हक्क आहे, त्यासाठी सहा महिन्यांपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजही जतन करण्यात यावं, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. या आदेशान्वये आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय, सक्तवसुली संचलनालय - ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेकॉर्डिंग यंत्रं असणं बंधनकारक असेल. सर्वोच्च न्यायालायानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निर्णयाची कशाप्रकारे आणि किती कालावधीत अंमलबजावणी केली जाणार, ही माहिती असलेला कृती आराखडा, सहा आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

****

‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून गुलाटी यांची ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत, हजारच्या वर पुरवठादार आणि चार लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे. गुलाटी यांना भारत सरकारनं २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतला ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुलाटी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

राज्यात पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या परवा झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी, औरंगाबाद इथल्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत होत आहे.

****

धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरीश पटेल यांनी विजय मिळवला आहे. पटेल यांना ३३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली.

****

देशात काल दिवसभरात ३६ हजार ५५१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९५ लाख ३४ हजार ९६५ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३८ हजार ६४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४० हजार ७२६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८९ लाख ७३ हजार ३७३ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार लाख २२ हजार ९४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ११ लाख ११ हजार ६९८ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १४ कोटी ३५ लाख ५७ हजार ६४७ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

जल सुरक्षा आणि जल नियोजनासाठी जल आंदोलनाची गरज असल्याचं, केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटलं आहे. ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे दुसर्‍या ऑनलाईन ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल, यावर विचार करण्याची वेळी आली असून, जल समृद्धीतूनच देशाचा विकास होईल, असं शेखावत यांनी नमूद केलं. 

****

दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद-जयपूर, सिकंदराबाद-शिर्डी, आणि काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच अमरावती-तिरुपती विशेष गाडीला महिनाभर मुदतवाढ देण्यात आली असल्याचं, रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

//***********//

 

No comments: