Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
मुंबईतला कांजूर मेट्रो कारशेडचा प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या चर्चेतून
सुटू शकतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
·
मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
मध्यस्थी करणार
·
पर्यटनस्थळांच्या प्रवेशसंख्येची मर्यादा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून
शिथील
·
राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात आगामी सहा महिन्यात १५०
इलेक्ट्रीक बस दाखल होणार
·
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात
आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची
केंद्रीय पथक पाहणी करणार
·
उत्तरेकडील शीत वाऱ्याचा जोर वाढल्यानं, राज्यात थंडीचा कडाका
आणि
· राज्यात तीन हजार
८११ नवीन कोविड बाधित रुग्ण, मराठवाड्यात आठ बाधितांचा मृत्यू
****
मुंबईतला कांजूर मेट्रो कारशेडचा प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारच्या चर्चेतून
सुटू शकतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांतून राज्यातल्या जनतेशी बोलत होते. राज्याच्या
निर्णया विरोधात केंद्र सरकार न्यायालयात गेले असल्याचं सांगत दोघांनी एकत्रित
बसून हा वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. याचे त्यांना श्रेय
द्यायला आपण तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न असल्याचं ठाकरे म्हणाले. राज्याच्या
विकास प्रकल्पांमध्ये केंद्राकडून अडवणुकीची भुमिका घेतली जात असल्याचा आरोपही
त्यांनी यावेळी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न श्रेयाचा
नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम
करणे हा आपल्या पक्षाचा स्वभाव नसल्याचं ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं.
दरम्यान, मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या या वादात राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक
यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे.
गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील,
असं मलिक यांनी सांगितलं.
****
राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत घाई करणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी काल
स्पष्ट केलं. युरोपात शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं, याकडे त्यांनी लक्ष
वेधलं. कोविड प्रादुर्भावाचा जोर आणखी कमी झाला, तर शाळा सुरू करण्याचा निर्णय लवकर
घेता येईल, मात्र नागरिकांनी यासाठी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून सहकार्य
करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...
परदेशांमध्ये
शाळेय विद्यार्थ्यांना सुद्धा कोरोना झाला आहे. आणि म्हणून आपण थोडसं धिम्या गतीनं
त्याच्याकडे जातो आहोत. लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे पण याच्यासाठी मला
आपलीच मदत लागणार आहे. आपण कोरोनाचा जो जोर आहे. तो आपण खाली जसा आता खाली आणला आहे
तसाच तो ठेवला किंवा आणखी खाली आणू शकलो. तर शाळा सुद्धा आपल्याला बिनधोक पणाने लवकर
उघडता येतील.
अनेक तज्ज्ञांनी राज्यात पुन्हा टाळेबंदी लावण्याचा सल्ला
दिला, काही जणांनी रात्रीची संचारबंदी लावण्याची सूचना केली, मात्र
असा निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगतानाच, पुन्हा
टाळेबंदी लावण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली...
काही
जणांनी तर मला सांगितलेलं आहे की नवीन वर्षाच्या सुमारास नाईट कर्फ्यू जाहीर करा. काही
जणांनी सांगितलंय की पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करा. नाईट कर्फ्यू कायद्याने लावू शकतो.
लॉकडाऊन कायद्यानं लावायचा लावू शकतो. पण मला नाही वाटत करण्याची गरज आहे.याचं कारण
म्हणजे अनुभवातून शहाणपण आलेलं आहे.
कोरोना विषाणूवर लस आल्यानंतरही पुढचे
सहा महिने मास्क लावणं सुरू ठेवावं, राज्यातले सत्तर
ते पंच्च्याहत्तर टक्के लोक मास्क घालत आहेत पण अजूनही जे लोक नियमांचं पालन करत नाहीत,
त्यांनी मास्क लावून समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं,
असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं...
वॅक्सीन
येईल तेंव्हा येईल.आल्यानंतर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल तेंव्हा पोहोचेल. परंतू ते
घेतलं तरी देखील मास्क लावणे हे बंधनकारक माझ्यामते किमान पुढचे सहा महिने तरी आहे.
किमान सहा महिने सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकं तरी चेहऱ्यावरती तोंडावरती मास्क घालून
फिरत असतात.पण उरलेले जे आहेत त्यांना मात्र मी सूचना देतोय की कृपा करुन आपण ही बंधनं
पाळा.
****
नियंत्रक संस्थांनी सुरक्षा आणि गुणवत्ता या निकषांवर कोरोना
विषाणू संसर्गावरील लसीला मान्यता दिल्यानंतरच देशात ही लस उपलब्ध करून देण्यात येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आरोग्य
मंत्रालयानं या लसीकरणाबाबत सातत्यानं विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना
ही बाब नमूद केली. देशात या लसीकरणाचं वेळापत्रक ठरवण्यात आलं
असून, एकच लस वापरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या
लसी एकाचवेळी वापरल्या जाणार नाहीत; असंही आरोग्य मंत्रालयानं
स्पष्ट केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन मुंबईतले आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे.
****
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं आपल्या पर्यटनस्थळांच्या प्रवेशसंख्येची मर्यादा
शिथील केली आहे. दररोज भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या,
संबंधित पुरातत्व अधीक्षक, संबंधित जिल्हाधिकारी
यांच्या परवानगीनं निश्चित करता येणार आहे. `क्यूआर कोड`
आणि नेटवर्क यामध्ये जिथं समस्या येत असतील, तिथं
प्रत्यक्षरित्या तिकीट विक्रीला मान्यता देण्यात आली आहे. गृह
मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि सांस्कृतिक
मंत्रालयानं तसंच राज्य तसंच जिल्हा प्रशासनानं जारी केलेल्या कोरोना विषाणू संसर्ग
संबंधित नियमांचं पालन करणं पर्यटक तसंच स्थानिक व्यवस्थापनाला बंधनकारक राहील,
असं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं म्हटलं आहे.
****
मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी
प्रज्ञासिंह ठाकूर या गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. या
नंतर या प्रकरणातल्या सर्व आरोपींनी येत्या चार जानेवारीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर
राहावं असे निर्देश न्यायमूर्ती पी. आर. सित्रे यांनी दिले आहेत. आपण
आजारी असल्यानं शुक्रवारी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल झालो असल्यानं सुनावणीवेळी उपस्थित राहू शकत नसल्याचं प्रज्ञासिंह
यांनी न्यायालयाला कळवलं होतं.
****
राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात आगामी सहा महिन्यात १५०
इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत, तसंच इंधनाच्या दरवाढीमुळे आता तीन हजार डिझेल बस लिक्विफाईड नॅचरल गॅस - एलएनजी मध्ये रुपांतरीत केल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी काल ही
माहिती दिली. कोविड प्रादुर्भावानंतर आगामी काळात प्रवासी सेवा
वाढवण्याच्या दृष्टीने चन्ने यांनी काल औरंगाबाद इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
****
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक काल दुपारी औरंगाबादमध्ये
दाखल झालं. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या
सभागृहात काल एका बैठकीत पथकातल्या अधिकाऱ्यांनी नुकसानाचा सविस्तर आढावा घेतला. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अतिवृष्टी
आणि पुरपरिस्थीतीमुळे झालेल्या पिकं आणि इतर नुकसानीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती
दिली. दरम्यान, केंद्रीय पथकातले सदस्य आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हयात अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार आहे. औरंगाबाद तालुक्यातल्या निपाणी, पिंपळगाव पांढरी,
पैठण तालुक्यातील शेकटा, गाजीपूर, निलजगाव, गंगापूर तालुक्यातील ढोरगाव, मुरमी, वरखेड इथं हे पथक पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
उस्मानाबाद जिल्हयात उस्मानाबाद तालुक्यात केशेगाव, पातोडा, लोहारा तालुक्यात
सास्तूर, राजेगाव आणि तुळजापूर तालुक्यात काकरंबा, आपसिंगा आणि कातरी या गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन हे पथक शेतकऱ्यांशी संवाद साधणार
आहे. येत्या २६ डिसेंबर
पर्यंत हे पथक राज्यात सोलापूर, पुणे, नागपूर,
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा
या जिल्ह्यांचाही दौरा करणार आहे.
****
उत्तरेकडील शीत वाऱ्याचा जोर वाढल्यानं, राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या
दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल सर्वात कमी
सात अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. रब्बी पिकांसाठी
हे तापमान पोषक असून, पुढील काही दिवस तापमानात घट राहील,
अशी शक्यता वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागानं
व्यक्त केली आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याचं तापमान आता
किमान दहा ते १४ अंशांपर्यंत, तर कमाल २८ ते ३० अंशापर्यंत घसरलं
आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
राज्यात काल तीन हजार ८११ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली
आहे. काल ९८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ७४६ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक
५७ शतांश टक्के इतका आहे. काल दोन हजार ६४ रुग्ण बरे झाल्यानं
त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८३ हजार
९०५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ०६ दशांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ६२ हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा
मृत्यू झाला, तर नव्या २४७ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात तीन, बीड दोन, तर जालना, नांदेड आणि
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ६३ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ४५, बीड ४४, नांदेड ३९, जालना २६, उस्मानाबाद
१६, परभणी १४, तर हिंगोली जिल्ह्यात काल
कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
वारकरी साहित्य परिषदेतर्फे आजपासून मुंबईत दोन दिवस नववं अखिल भारतीय मराठी संत
साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाचं
उद्घाटन उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. आज सकाळी आठ वाजता दिंडी
सोहळ्यानं या संमेलनाची सुरूवात होईल. उदघाटन सोहळ्यानंतर मावळते
संमेलनाध्यक्ष अमृतमहाराज जोशी यांच्याकडून नवे संमेलनाध्यक्ष चकोर महाराज बावीसकर
हे संमेलनाची सूत्रं स्विकारतील. संमेलनात दिवसभर विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष
माजी आमदार श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड
झाली आहे. पुणे इथं महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या २०२० ते २०२४ या
वर्षासाठी झालेल्या निवडणूकीत संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. पंकज
भारसाखळे यांची सहसचिवपदी आणि प्राध्यापक फुलचंद सलामपुरे यांची राज्य कार्यकारिणीच्या
सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथले आमदार संभाजी पाटील
निलंगेकर यांनी केलं आहे.
****
आज २१ डिसेंबरच्या रात्री आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहाची युती पहायला मिळणार आहे.
शनी आणि गुरू हे दोन्ही ग्रह दर २० वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात,
यंदा मात्र आज रात्री
या दोन्ही ग्रहातलं अंतर गेल्या आठशे वर्षांतलं सर्वात कमी अंतर
असणार आहे. कालही सूर्यास्तानंतर पश्चिमेस नुसत्या डोळ्यांनी तासभर दिसलेल्या
या दृश्याचा खगोलप्रेमींनी आनंद घेतला. परवा २३
तारखेपर्यंत दररोज सूर्यास्तानंतर तासभर पश्चिम क्षितीजावर हे तीन ग्रह पाहता येणार
आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या सातारा इथल्या खंडोबा मंदिरात
कालपासून खंडोबा उत्सवाला सुरूवात झाली आहे. कोरोना
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली असून मंदिरात
कोरोना विषाणू प्रतिबंधाचे नियम पाळूनच भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येत आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या ज्या गावात पाणी पुरवठ्याच्या योजना
पूर्ण झाल्या असून वैयक्तिक नळ जोडणी देण्याचं काम सुरु आहे, तिथं
प्राधान्यानं दलितवस्ती, शाळा आणि अंगणवाडींमध्ये नळ जोडणी देण्याचे निर्देश नांदेड
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे
यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या गट विकास अधिकारी, उप
अभियंता, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक यांची आढावा
बैठक नुकतीच घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
****
लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेतली विद्यार्थीनी
डॉ. नागझीन खान हीनं कोविड बाधित रुग्णांवर
उपचार सुरु ठेवत एमडी आणि सुपरस्पेशालिटीच्या परिक्षेत यश संपादन केलं आहे.
नागजीननं एमडीच्या परिक्षेत आरोग्य विज्ञान विद्यापीठात १७वा क्रमांक
मिळवला असून, नीट परिक्षेमध्येही ती पात्र ठरली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात लातूर जिल्हा प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनानं
चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यानं काम करण्यात अडचण आली नाही, असं डॉ. नागझीन यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात अत्याधुनिक टेक्निकल एक्सलन्स
केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांच्या हस्ते काल
दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून या केंद्राचं उद्घाटन झालं.
//**********//
No comments:
Post a Comment