Monday, 7 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०७ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त शेतकरी आघाडीनं उद्या आठ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सक्रीय पाठिंबा दिला आहे.

राज्यातल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे माथाडी कामगार आणि व्यापारी या संपात सामील होणार असल्याचं, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस, माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आणि व्यापारी असोसिएशनने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

शेतकरी कामगार पक्षानंही या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****

देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ३७ शंतांश टक्के झाला आहे. काल सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक होती.

****

राज्यात वीज पुरवठ्याचं देयक भरण्यासाठी जिल्हा परिषद शाळांकडे निधीच नसल्यानं दहा हजार ७७१ शाळांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. मात्र आता शासनानं हे देयक भरण्यासाठी पाच कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे पुढील काळात या शाळांमध्ये वीज पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

****

खोटी देयकं सादर करून वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळवणाऱ्या औरंगाबाद इथल्या भंगार माल विकणाऱ्या दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांना वस्तू आणि सेवा कर विषयक गुप्तचर विभाग - डी जी जी आय नं अटक केली. या कंपन्यांनी कोणताही पुरवठा न करता सुमारे अठरा कोटी सहासष्ट लाख रुपयांचा वस्तू आणि सेवा कर परतावा मिळवल्याचं निदर्शनास आलं आहे. या कंपन्यांच्या प्रवर्तकांना अटक करण्यात आली असून, त्यांना १९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

****

दक्षिण रेल्वेतर्फे आजपासून येत्या एक जानेवारीपर्यंत बंगळुरू-नांदेड-बंगळुरू ही उत्सव रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे. ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकातून सकाळी सहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बंगळुरूला पोहोचेल तर तिथून रात्री दहा वाजता निघून दुसऱ्या दिवशी रात्री साडे दहा वाजता नांदेडला पोहोचेल. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 19 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...