Sunday, 24 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.01.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

आज राष्ट्रीय बालिका दिवस साजरा होत आहे. बालिकांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी हा या दिवसाचा उद्देश असून या अनुषंगानं, २०१५ पासून `बेटी बचाओ, बेटी पढाओ` हे अभियान राबवण्यास सुरुवात झाली.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवन इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राचं अनावरण केलं.

****

राज्यात आरोग्य तसंच पोलिस विभागात रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोग्य विभागातल्या साडे आठ हजार तसंच पोलिस विभागातल्या पाच हजार तीनशे पदांसाठी काल जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

****

राज्याच्या उत्तर आणि पूर्व सीमेवरील जिल्ह्यांमध्ये गेल्या शुक्रवारी कमी झालेल्या किमान तापमानात काल पुन्हा वाढ झाली. राज्यात सर्वत्रच काल कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं तसंच परभणीमध्ये नोंदवलं गेलेलं साडे पस्तीस अंश सेल्सीअस कमाल तापमान देशात सर्वाधिक होतं.

****

नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस येत्या बुधवार पासून पुन्हा सुरू होणार आहे. आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच या गाडीतून प्रवास करता येणार आहे.

****

आदिलाबाद-तिरुपती-आदिलाबाद विशेष गाडीही येत्या बुधवारपासून सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी पूर्ण आरक्षित असेल, अनारक्षित तिकीटधारक प्रवाशांना या गाडीत प्रवेश करता येणार नाही.

****

बीड जिल्ह्यात पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरु करण्यापूर्वी काल ८८२ शिक्षकांची कोरोना विषाणू संसर्गासाठी तपासणी करण्यात आली. यापैकी १८ शिक्षक संसर्ग बाधित आढळले असून १५२ अहवाल प्रलंबित असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. 

****

गोव्यात १६ जानेवारीला सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फिचा आज समारोप होत आहे. काल भारतीय पॅनोरमा फिचर फिल्म विभागा अंतर्गत ‘प्रवास’ हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला.

****

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या पाचगाव येथे भेट दिली तसंच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या ‘समर्थ’ योजनेअंतर्गत सुरू झालेल्या हातमाग समूहाला भेट देत प्रकल्पांचा आढावा घेतला.

****

No comments: