Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 January
2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
७२वा प्रजासत्ताक
दिन आज देशभरात हर्षोल्हासात साजरा होत आहे. दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यंदा कोविड पार्श्वभूमीवर पथसंचलनाच्या
अंतरात कपात करण्यात आली होती. या पथसंचलनात महाराष्ट्राची संतपरंपरा दर्शवणारा चित्ररथ
सहभागी झाला होता.
मुंबईत शिवाजी
पार्कवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्य शासनानं अतिशय
जबाबदारीनं कोविड विरोधातली लढाई लढत संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केले, असं सांगून
राज्यपालांनी राज्यातल्या सर्व कोविड योद्ध्यांचं कौतुक केलं. गारपीट, निसर्ग चक्रीवादळ
आणि बेमोसमी पाऊस, बर्ड प्ल्यू अशा संकटाच्या मालिकांशी सामना करत आपण पुढे वाटचाल
करत असल्याचं ते म्हणाले. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना
केल्या असून, संकटातून संधी निर्माण करत महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा आपण कायम
राखू, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं.
औरंगाबाद इथं
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात देसाई
यांनी, औरंगाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सातत्यानं वाढवत नेऊन एक आघाडीवरचा
जिल्हा म्हणून स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं सांगितलं. जिल्ह्यातल्या प्रत्येक
घराला नळानं पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ७०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर
झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात राबवण्यात येत
असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
जालना इथं पोलीस
मुख्यालयाच्या मैदानावर आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या
हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करून नागरिकांना
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना काळात राज्यात कोविड योध्यांनी उत्तम
कार्य केलं आहे, आता कोविड परिस्थिती सुधारत असून, राज्यात दिवसाला २८ हजार जणांचं
लसीकरणं केलं जात आहे. प्रत्येकानं आपली वेळ आल्यावर लसीकरण करून घ्यावं असं आवाहन
टोपे यांनी यावेळी केलं.
हिंगोली इथं
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री गायकवाड
यांनी पोलीस पथकाचं निरीक्षण केलं आणि जनतेला शुभेच्छा दिल्या.
बीड इथं पालकमंत्री
धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात मुंडे
यांनी, जिल्ह्यात झालेल्या विकासकामांबात माहिती दिली. बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामा
स्वामी यांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाल्यानं त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. स्वच्छता अभियानात पारितोषिक मिळालेल्या चार ग्रामपंचायतीच्या सरपंचासह
सदस्यांचाही यावेळी गौरवण्यात आलं.
नांदेड इथं छत्रपती
शिवाजी महाराज पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण
झालं. यावेळी त्यांनी पथसंचलनाची पाहणी करुन, नागरीकांना शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबाद इथं
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याला केंद्र
सरकारच्या निती आयोगानं कृषी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तीन कोटी रुपयांचे
पारितोषिक मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं. केंद्र आणि
राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी तसंच जिल्ह्याचा
मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची गडाख यांनी माहिती दिली.
उस्मानाबाद जिल्हा
पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांना उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री यांचं पदक
मिळाल्याबद्दल, त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लातूर इथं पालकमंत्री
अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य
केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करण्यात आला.
परभणी इथं पालकमंत्री
नवाब मालिक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
****
राज्यात काल
४७७ केंद्रांवर ३५ हजार ८१६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आलं. उस्मानाबाद
जिल्ह्यांत शंभर टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालं. कालपासून लसीकरण सत्राला सुरवात
झाली. आजचा दिवस वगळता लसीकरण सत्र होईल. ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे
कोरोना लसीकरण सत्र होणार नाही. राज्यात आतापर्यंत एकूण एक लाख ३५ हजार ७०१ जणांना
लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी
दिली.
****
शाकंभरी नवरात्र
महोत्सवातली जलयात्रा काल तुळजापूर इथं साजरी झाली. कोविडच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच
सुवासिनी तसंच कुमारिका, डोक्यावरती तांब्याचा कलश घेऊन या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, तुळजाभवानी देवीची काल शेषशायी अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.
****
औरंगाबाद विभागीय
आयुक्तांच्या संकल्पनेतील “माझे कार्यालय, सुंदर कार्यालय” या उपक्रमास अनुसरुन, लातूर
जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अभिलेख कक्षाचं अद्ययावतीकरणासह सुशोभीकरण पूर्ण झालं
आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या कक्षाचं उद्घाटन झालं.
***///***
No comments:
Post a Comment