Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
21 March 2021
Time
1.00pm to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २१ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. औरंगाबाद इथं सिडको बसस्थानकाजवळ वसंतराव नाईक चौकातही आंदोलन झालं. खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांच्यासह पक्ष कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. जिल्ह्यातल्या खुल्ताबाद तसंच पंढऱपूर इथंही आंदोलन करण्यात आलं.
उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. नागपूर तसंच सांगली इथंही आंदोलन झालं. दरम्यान, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री देशमुख यांच्या राजिनाम्याची तसंच केंद्र सरकारनं या प्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी केली.
****
राज्यात आतापर्यंत ४३ लाख ३ हजार सत्त्याहत्तर जणांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. काल दिवसभरात २ लाख ५ हजार एकशे एकोणऐंशी जणांना लस देण्यात आली. यात एक लाख ३९ हजार तिनशे पन्नास जणांना `कोवीशिल्ड` ही पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर ६५ हजार ८२९ जणांना `कोव्हॅक्सीन` ही दुसरी मात्रा देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल चार हजार ९०५ जणांनी लस घेतली, बीड सहा हजार १६३, हिंगोली एक हजार ३५८, जालना एक हजार ११, लातूर दोन हजार २०६, उस्मानाबाद एक हजार ८८०, परभणी एक हजार ८४६ तर नांदेड जिल्ह्यात तीन हजार ७९३ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.
****
औरंगाबादमध्ये वाढता कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘सप्ताहांत संपूर्ण टाळेबंदीला’ आजही नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा देणारे, जिल्हा बँक निवडणूक तसंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बाहेर पडलेले उमेदवार वगळता रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचं चित्र दिसून येत आहे. जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. औरंगाबाद शहरात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या एका केंद्रावर कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णानं `पीपीई कीट` परिधान करून परीक्षा दिली.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या अमोल आंधळे यांचा २२३ मतांनी विजय झाला आहे. भाऊसाहेब नाटकर यांना ४२ तर अपक्ष उमेदवार पापा मोदी यांना ९२ तर भारतीय जनता पक्षाच्या धनराज मुंडे यांना नऊ आणि बदामराव पंडित यांना दोन मतं मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. औरंगाबाद तसंच परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजता मतदान सुरू झालं. औरंगाबाद जिल्हा बँकेसाठी दुपारी चार वाजेपर्यंत तर परभणी जिल्हा बँकेसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. औरंगाबाद बँकेचा निकाल उद्या तर परभणी बँकेचा परवा, मंगळवारी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आमदार अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ निवडणूकीसाठीच्या काही मतदान केंद्रावर पाहणी केली. यावेळी ज्या मतदार,उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हेत त्यांना समज देऊन मास्कचं वाटप केले.
****
जालना ते औरंगाबाद रेल्वे मार्गावर बदनापूर ते करमाड रेल्वे स्थानकादरम्यान
सुरू असलेल्या कामामुळे २५ एप्रिलपर्यंत दर रविवारी, मंगळवारी आणि गुरुवारी लाईन ब्लॉक
घेण्यात येणार आहे. यामुळे औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी दोन तास पाच मिनिटे उशीरा,
म्हणजे दुपारी सव्वा चार ऐवजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी वाजता सुटेल.
****
आज जागतिक वन संवर्धन दिन. यानिमित्त सर्व प्रकारच्या वन संवर्धनाच्या महत्वाविषयी जनजागृती निर्माण करून हा दिवस साजरा करूया, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या निमित्त एका शुभेच्छा संदेशाद्वारे केलं आहे. नव्या नगर वन योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०० शहरांमध्ये नगर वन विकसित केलं जाणार असल्याचं केंद्रीय वनंमंत्री प्रकाश जावडेकर यांनी वन संवर्धन दिनानिमित्त म्हटलं आहे.
****
आज `विषुवदिन` स्थिती आहे. दरवर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर हे दोन दिवस `विषुवदिन` म्हणून ओळखले जातात. या दोन्ही दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे पृथ्वीवर दिवस - रात्र कालावधी समान असल्यानं याला मोठं महत्त्व असल्याचं एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी म्हटलं आहे.
//*************//
No comments:
Post a Comment