Monday, 1 March 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.03.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मार्च २०२१ दुपारी ०१.०० वा.

****

राज्य शासन कर्नाटक - महाराष्ट्र विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत असून, मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या अभिभाषणाला सुरुवात केली. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केलं, करोनासंदर्भात मदतीसाठी कृती दल स्थापन केले, आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल, कोविड चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या, असं त्यांनी नमूद केलं. राज्य शासनाचा माझं कुटुंब माझी जबाबदारीहा देशातलं अभिनव उपक्रम ठरला असल्याचं राज्यपाल म्हणाले. कोरोना विरोधातली लढाई अद्यापही सुरु असून, राज्य सरकारनं मी जबाबदारही योजना सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनासंदर्भातल्या आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज असून, दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल म्हणाले. औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केलं, रोजगार मिळणं सुलभ व्हावं म्हणून महारोजगार आणि महाजॉब्ज पोर्टल सुरु केलं, राज्य सरकारनं आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, असं सांगून राज्यपालांनी सरकारच्या अनेक योजनांची माहिती दिली.

****

विधानसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी वैधानिक विकास मंडळाबाबत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सरकारनं पुरवणी मागण्यांसंदर्भात स्पष्टता आणावी, मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत घोषणा करावी, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील, त्यादिवशी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची घोषणा होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मराठवाडा - विदर्भ विकास मंडळ झालं पाहिजे, हाच महाविकास आघाडी सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. १२ आमदारांसाठी सरकार मराठवाडा, विदर्भाला ओलिस ठेवत असल्याची टीका, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

****

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी अनेक काँग्रेस नेते सायकलवरुन विधीमंडळात पोहोचले. केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या पद्धतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे, त्यामधून सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील केलं असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पटोले यांच्या या आंदोलनावर टीका केली. राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये कर लावला आहे, नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या कराविरोधातच असावं, असं फडणवीस म्हणाले.

****

२१व्या शतकातल्या भारताला कृषी क्षेत्रातल्या प्रगतिबरोबरच, अन्नप्रक्रिया उद्योगातही क्रांतीची आवश्यकता असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदीसंदर्भात आयोजित वेबिनारमध्ये, ते आज बोलत होते.  अन्न, भाज्या, फळे, मत्स्यपालनासह शेतीच्या प्रत्येक जोडधंद्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. गावातच लोकांना शेती संबंधित रोजगार मिळण्यासाठी, गावाजवळच कृषी उद्योग समुहांची संख्या वाढवण्यावर पंतप्रधानांनी भर दिला.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी आज कोविड लसीची पहिली मात्रा घेतली. आजपासून ६० वर्षांवरील नागरीकांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कॉवॅक्सिन लस घेतली. त्यानंतर त्यांनी ट्विट संदेशाद्वारे, जे नागरिक पात्र आहेत त्यांनी लसीकरण करून घ्यावं, एकत्र आपण भारतास कोरोना मुक्त करू, असं आवाहन केलं.

****

देशात काल १५ हजार ५१० नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी दहा लाख ९६ हजार ७३१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५७ हजार १५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार २८८ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सात लाख ८६ हजार ४५७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६८ हजार ६२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत एक कोटी ४३ लाख एक हजार २६६ नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा कर -जीएसटीआर- नऊ आणि जीएसटीआर- नऊ सी वार्षिक आयकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारी ही मुदत होती, ती आता ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...