Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 July 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२
जुलै
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे.
तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार असल्याची भूमिका स्पष्ट करणारी केंद्र सरकारची
पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
·
गेल्या सहा वर्षांत डिजिटल इंडियामुळे नागरीकांच्या जीवनात मोठा बदल- पंतप्रधान
नरेंद्र मोदी.
·
शेतीत धाडसानं पाऊल टाकणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची ग्वाही.
·
राज्यात नऊ हजार १९५ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात ०९ जणांचा मृत्यू तर ३२४
बाधित.
आणि
·
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी देण्याचं सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं आश्वासन.
****
राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार असल्याची भूमिका स्पष्ट करणारी तसंच १०२ व्या
घटना दुरुस्तीचा पुनर्विचार करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली केंद्र सरकारची
याचिका काल न्यायालयानं फेटाळून लावली. यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार
केंद्र सरकारला असल्याचं स्पष्ट झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र
सरकारनं केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयानं ५ मे रोजी रद्द केला होता, न्यायालयानं
या निकालाचा फेरविचार करावा, मराठा आरक्षण प्रकरणी १०२ व्या घटना दुरुस्तीचा फेरआढावा
घेण्याची मागणी करणारी ही याचिका केंद्र सरकारनं दाखल केली होती. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या
मागास असलेल्यांना आरक्षण देण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारला आहेत, ही भूमिका न्यायालयानं
कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वात पाड न्यायाधीशांच्या खंडपीठानं
ही याचिका फेटाळत याचिकेतील मुद्यांमध्ये फारसे तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, ही याचिका फेटाळल्यामुळे मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा
धक्का बसला असल्याचं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी
म्हटलं आहे. केंद्रानं घटना दुरुस्ती करुन राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल
करावे तसंच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करणं आवश्यक असल्याचं चव्हाण म्हणाले.
खासदार छत्रपती संभाजी राजेभोसले यांनी आता केंद्र सरकारला अध्यादेश काढून घटना
दुरुस्ती करावी लागेल असं म्हटलं आहे. ३३८ कलम ब नुसार मागासवर्ग आयोग स्थापन करुन
गायकवाड अहवालातील त्रुटीही दूर कराव्या लागतील असं या निकालावर प्रतिक्रिया देतांना
ते म्हणाले.
****
देशात गेल्या सहा वर्षांत डिजिटल इंडियामुळे नागरीकांच्या जीवनात मोठा बदल झाला
असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला काल सहा
वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी, ‘डिजिटल इंडिया’च्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. देशातल्या सर्वात मोठ्या
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणारं कोविन ॲप, हे देशाच्या तांत्रिक
कौशल्याचं उत्तम उदाहरण असून, अनेक देशांनी या ॲपमध्ये रुची दर्शवली असल्याचं पंतप्रधान
म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले शेतकरी प्रल्हाद बोरघड यांच्याशी पंतप्रधानांनी
संवाद साधत, ई-नाम प्रणालीमुळे झालेल्या लाभांबाबत माहिती जाणून घेतली. ई-नामच्या माध्यमातून
पिकाला किंमतही चांगली मिळते, या ऑनलाइन माध्यमामुळे टाळेबंदी काळातही माल विकण्यात
अडचण आली नाही, असं बोरघड यांनी सांगितलं. पंतप्रधानांसोबत झालेल्या संवादाबाबत सांगताना,
प्रल्हाद बोरघड म्हणाले –
खूप मनातून आनंद होतोय की, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढा मोठा सन्मान मिळाला.
अतिशय मनाला प्रेरणा देणार होतं. आणि येत्या भविष्य काळामध्ये आणखी कसं चांगलं काम
करता येईल याच्या संदर्भामध्ये आम्हाला एक उर्जा देऊन गेले ते शब्द आणि पुढे नक्कीच
याचा फायदा येत्या भविष्य काळामध्ये शेतकरी वर्गाला आम्ही मिळवून देऊ.
****
शेती व्यवसायातली अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या शेतकऱ्याच्या
पाठीशी उभं राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कृषी विभागातर्फे
राबवण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा काल समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत
होते. शेतकरी हे महाराष्ट्राचं वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय
घेतले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्याचं हरित वैभव वाढण्यासाठी
राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषीदिनानिमित्त शुभेच्छा देतानाच राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा
उल्लेख करून, कोविड काळात शेतकरी आणि डॉक्टर यांनी केलेल्या कामाकडे लक्ष वेधत, हे
दोन्ही अन्नदाते आणि जीवनदाते असल्याचे गौरवोद्गार काढले.
रब्बी हंगाम २०२०च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याची भेट
मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ
ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राज्यात काल नऊ हजार १९५ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६० लाख ७०हजार ५९९ झाली आहे. काल २५२ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २२ हजार
१९७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक शतांश टक्के झाला आहे. काल ८ हजार ६३४ रुग्ण
या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख २८ हजार ५३५ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात एक लाख १६ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर ०९ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, जालना, आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येकी
दोन आणि लातूर तसंच हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १०३ रुग्ण आढळले. औरंगाबाद ९३, उस्मानाबाद
५२, लातूर ३५, परभणी २०, जालना १०, नांदेड सात, तर हिंगोली जिल्ह्यात ०४ नवे रुग्ण
आढळून आले.
****
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांच्या कामासाठी राज्यशासन भरीव निधी
देईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील
विविध रस्ते विकास कामासंदर्भात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत सह्याद्री
अतिथीगृहात बैठक झाली, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, बांधकाम विभागाचे उच्चपदस्थ
अधिकारी या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यातल्या विविध
रस्तेकामांबाबत या बैठकीत चर्चा झाली. लातूर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या नवीन चारपदरी
रिंगरोडचे काम आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची
सूचला चव्हाण यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कडदोरा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक
शाळेतले शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर
झाला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या NCERT च्या वतीने २०१८ चे राष्ट्रीय
आयसीटी पुरस्कार देशातल्या २५ शिक्षकांना जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या
तीन शिक्षकांचा समावेश असून, त्यापैकी मराठवाड्यातून उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान
मिळाला आहे. खोसे यांच्या शैक्षणिक कार्याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर
–
ग्रामीण भागात तांड्यावरच्या मुलांना ऑफलाईन शिकता यावं, अध्ययन मनोरंजक व्हावं,
यासाठी खोसे यांनी ५१ ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली आहे. मुलांच्या सहाय्यानं चित्रफिती
तयार करून मुलांना स्वयंअध्ययनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तांड्यावरच्या मुलांना
त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण मिळावं यासाठी बंजारा बोलीभाषेत पहिलीचं पुस्तक अनुवादित
करून डिजीटल साहित्य निर्माण केलं आहे. ग्राम पंचायत एकल संस्था तसंच लोकसहभागाच्या
माध्यमातून शाळा डिजीटल करण्यात आली आहे. शाळेची स्वतःची वेबसाईट तयार केली आहे. या
आणि अन्य कामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
जीवनात शिक्षणा सोबतच संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत, हे संस्कार आजच्या
पिढीला देण्याचे मोलाचे कार्य भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतून होत असल्याचे गौरवोद्गार
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले आहेत. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई
इथल्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं उदघाटन मुंडे यांच्या हस्ते
काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
प्रभारी कुलगुरू बिसेन, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा फक्त उच्चशिक्षित नसून
स्वयंपूर्ण असावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच संस्थेच्या पुढील वाटचालीस मुंडे यांनी
शुभेच्छा दिल्या.
****
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी धरणाचे १४ दरवाजे काल उघडण्यात
आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या निकालानुसार
हे चौदा दरवाजे येत्या २९ आक्टोबरपर्यंत खुले राहणार आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून
कंत्राटी पध्दतीनं भरती करण्यात आलेल्या १ हजार ३ कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी
काल एका आदेशाद्वारे कार्यमुक्त केलं. भविष्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढल्यास
रुग्णालयनिहाय प्रतीक्षा यादी तयार करून गरजेनुसार पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात
येईल, असं याबाबतच्या आदेशात नमूद आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे सेवा समाप्तीचे
आदेश मिळालेल्या या कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
****
कुटुंबाचा आरोग्याचा दर्जा व्यवस्थित राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पोषणाकडे
काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असून यासाठी पोषण बागा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू
शकतात असं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉक्टर देवराव देवसरकर
यांनी म्हटलं आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उस्मानाबाद जिल्हा
परिषद आणि तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पोषण
बाग महत्त्व, विविध प्रकार आणि व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेत ते काल बोलत होते.
गृहविज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञ प्राध्यापक वर्षा मरवाळीकर तसंच उमेद अभियानाचे जिल्हा
कृती संगम समन्वयक गोरक्षनाथ भांगे यांनी पोषण परस बागेचे महत्त्व, विविध प्रकार आणि
व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं या संदर्भात यावेळी तांत्रिक मार्गदर्शन केलं.
****
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित
मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे राज्य
उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांना थकित रक्कम
आणि वेतनश्रेणी देण्यात यावी, महाविद्यालयीन तसंच विद्यापीठातल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी
समान सेवा प्रवेश नियम आणि नागरी सेवा नियम लागू करण्यात यावेत, यासह विविध मागण्या
महासंघाच्या शिष्टमंडळानं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे
सादर करण्यात आल्या असल्याचं पाथ्रीकर यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम तसंच जिंतूर या तालुक्यात संयुक्त
सक्रिय कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध आणि नियमित संनियंत्रण मोहीम राबवली जाणार आहे. कालपासून
या मोहिमेला प्रारंभ झाला, येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहील.
****
राज्यात आज काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.मराठवाडा
आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी,कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी
मेघगर्जनेसह, विजांच्या गडगडाटात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यान व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment