Sunday, 21 November 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 November 2021 Time 7.10 AM to 7.25 AM

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 November 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ नोव्हेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

 

** बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात प्रारंभ; प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ इअर - २०२१ पुरस्कारानं सन्मानित

**  मध्यप्रदेशातलं इंदूर पाचव्यांदा ला सगळ्यात स्वच्छ शहर, १० ते ४० लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये नवी मुंबई प्रथम क्रमांकावर

** परभणी,  औरंगाबाद, लातूर महानगरपालिका तसंच घनसावंगी, हिंगोली, जाफ्राबाद, मानवत, नायगाव, पाथ्री, सेलू, उस्मानाबाद,  सिल्लोड नगरपरिषदांनाही पुरस्कार

** शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी आता ७५ आणि ८० टक्के अनुदान मिळणार

** राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन चर्चेला येण्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांचं आवाहन

** राज्यात ८३३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, मराठवाड्यात चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू तर ५४ बाधित

आणि

** वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्त वसुली संचालनालयाचं पुन्हा समन्स  

****

बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल गोव्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालं. हॉलीवुडचे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक  मार्टिन स्कॉर्सेस आणि हंगरीचे दिग्दर्शक इस्तवान स्ज़ाबो यांना सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तर प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ इअर - २०२१ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

महोत्सवातल्या आंतरराष्ट्रीय विभागात ७३ देशांमधले १४८ चित्रपट दाखवले जातील. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधून १८ खास चित्रफिती दाखवल्या जाणार आहेत. यावेळच्या महोत्सवात प्रथमच नेटफ्लिक्स, अमेझॉन, झी फाईव्ह आणि वायकॉम सारखी ओ टी टी व्यासपीठंही सहभागी झाली आहेत. या चित्रपट महोत्सवात इंडिया अॅट सेव्हन्टी फाईव्ह या विशेष विभागाअंतर्गत देशभरातले एकूण १८ निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली परंपरेचं स्मरण तसंच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त यावर्षी या विशेष विभागाअंतर्गत चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात राजेश पिंजानी दिग्दर्शित बाबू बँड बाजा आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित कासव या दोन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच सत्यजित रे दिग्दर्शित अगंतुक, एस.एस.वासन यांचा चंद्रलेखा, विजय आनंद यांचा गाईड, तपन सिन्हा दिग्दर्शित काबुलीवाला, डॉ राजकुमार दिग्दर्शित संध्या राग, राज कपूर यांनी दिग्दर्शन केलेला श्री चारसौ बीस, हे चित्रपटही दाखवले जाणार आहेत. गोव्याचे राज्यपाल एस. श्रीधर पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, श्रीपाद नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि चित्रपट सृष्टीतले अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.

****

स्वच्छ देशाची प्रतिमा भारतातल्या पर्यटनाला चालना देईल, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या पुरस्कारार्थींचा नवी दिल्लीत सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. देशवासियांच्या मानसिकतेत झालेला बदल हे स्वच्छ भारत अभियानाचं सर्वात मोठं यश असल्याचं ते म्हणाले.

गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते कचरामुक्त शहरांच्या यादीत स्टार रेटिंग प्रोटोकॉल प्रमाणित शहरांचाही गौरव झाला. स्वच्छता मित्र सुरक्षा मोहिमेअंतर्गत स्वच्छता कामगारांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

छत्तीसगड हे देशातलं सगळ्यात स्वच्छ राज्य ठरलं आहे तर सलग पाचव्यांदा मध्य प्रदेशातल्या इंदूरला सगळ्यात स्वच्छ शहरचा मान मिळाला आहे.

महाराष्ट्रात नवी मुंबई शहराला १० ते ४० लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाचा तर राज्यातही प्रथम क्रमांकाचा सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला आहे. यासोबतच 'सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज' अभियानातही नवी मुंबई, देशातील व्दितीय क्रमांकाचं मानांकीत शहर, कचरामुक्त शहरांमध्ये 'फाईव्ह स्टार मानांकन', हगणदारीमुक्त शहरांच्या श्रेणीत 'वॉटर प्लस' शहर ठरलं आहे. परभणी महानगरपालिकेला देशात ३९ वा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. लातूर महानगरपालिका तसंच घनसावंगी, हिंगोली, जाफ्राबाद, मानवत, नायगाव, पाथ्री, सेलू, सिल्लोड या नगरपरिषदांना कचरामुक्त शहराच्या प्रमाणित थ्री स्टार मानांकन गटात पुरस्कार मिळाला आहे.

एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमधे महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या विटा गावाला पहिला तर पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा शहराला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

या सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिकेनं देशात बाविसावा तर राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. उस्मानाबाद नगरपालिका देशपातळीवर ८७ व्या स्थानी तर  राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. ठाणे जिल्ह्यानं देशात चौदावा तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचं हे सहावं वर्ष असून हे जगातलं सर्वात मोठं शहर स्वच्छता सर्वेक्षण आहे.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी आता ७५ आणि ८० टक्के अनुदान मिळणार आहे.  कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी काल ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान कमाल पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत दिले जात होते. यात केंद्राचा वाटा ६० टक्के तर राज्याचा हिस्सा ४० टक्के होता. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक आणि तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान तसंच इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान देण्यासाठी शासनानं मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य सरकार उचलणार आहे. आधी २४६ तालुक्यांना याचा लाभ मिळत होता. आता मात्र राज्य शासनाच्या निर्णयानंतर राज्यातल्या सर्वच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे अशी माहिती भुसे यांनी दिली.

****

राज्य मार्ग परिवहन - एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी काल परीवहन मंत्री अनिल परब यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र या चर्चेतूनही कोणताच मार्ग निघाला नाही. विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असं परब यांनी यावेळी सांगितलं.

महामंडळानं आतापर्यंत दोन हजार ९३७ कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं आहे तर काल ३८० रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. आतापर्यंत सात हजार ३१५ कर्मचारी कामावर रूजू झाले असून काल दिवसभरात १४३ बसेस विविध मार्गावर धावल्याचं महामंडळाकडून सांगण्यात आलं.

एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असून कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि चर्चेला यावं असं आवाहन परिवहन मंत्री परब यांनी केलं आहे.

दरम्यान, आझाद मैदानात गेल्या १२ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल आक्रमक होत राज्य सरकार आणि परिवहनमंत्री परब यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आझाद मैदान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यावेळी भाजपा नेते, गोपीचंद पडळकर, माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपा नेते किरिट सोमय्या उपस्थित होते.

****

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक असून कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि चर्चेला यावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. उच्च न्यायालयाच्या अहवालानंतर सरकार पुढची दिशा ठरवेल. त्यावर सकारात्मक चर्चा करायची सरकारची तयारी आहे. मात्र कोणताही निर्णय एक दोन दिवसात होत नाही, त्यासाठी वेळ लागतो म्हणून संप मागं घ्यावा, असं ते म्हणाले.

****

राज्यात काल ८३३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख २९ हजार, ५७७ झाली आहे. काल १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ७२२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल दोन हजार २७१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ७४ हजार ९५२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १० हजार २४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन आणि लातूर तसंच बीड जिल्ह्यातीस प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १० नवे रुग्ण आढळले. बीड १३, लातूर १२, परभणी ९,  उस्मानाबाद ८ तर  हिंगोली आणि नांदेड इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जालना जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

वाशिमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्त वसुली संचालनालय- ईडीनं पुन्हा समन्स बजावलं आहे. येत्या २४ तारखेला त्यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. श्री बालाजी पार्टीकल बोर्ड या साखर कारखान्याच्या गैरव्यावहार प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या ज्या नागरिकांची घरं गुंठेवारीत मोडतात, त्यांनी ती नियमित करुन घ्यावी असं आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केलं आहे. पडेगाव मिटमिटा प्रभागातील विविध विकास कामांचं भूमिपूजन दानवे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या गुंठेवारी कायद्यासंदर्भात या भागांमध्ये शिबिरं घेऊन नागरिकांच्या शंकांचं निरसन करण्याच्या  सूचना  दानवे यांनी यावेळी दिल्या.

****

नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना १० नविन  रूग्णवाहिकांचं वितरण पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आलं. त्याचबरोबर मुदखेड, धर्माबाद, कुंडलवाडी, बिलोली, आणि  अर्धापूर या पाच नगर परिषदांना अत्याधुनिक सुसज्ज अशा  अग्निशमन दलाच्या गाड्या देण्यात आल्या. जिल्ह्यात लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना देण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं हाती घेतलेल्या मिशन आपुलकीच्या पोर्टल आणि वेबसाईटचं उद्घाटनही पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

पूर्णा ते अदिलाबाद ही विशेष गाडी कालपासून सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे परळी- अदिलाबाद डेमू ही रेल्वे गाडी रद्द करण्यात आल्याचं नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

****

 थोर स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचा आज स्मृतीदिन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने दिल्या जाणारा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार हिंगोली जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ते जयाजी पूरभाजी पाईकराव यांना आज प्रदान करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरातल्या नागेश्वरवाडीतल्या स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

****

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळांन बाजी मारली आहे. विद्यमान संचालक मंडळाचे तेरा संचालक बहुमताने निवडून आले असून, यात बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदे, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष विश्वासराव शिंदे, बँकेचे माजी चेअरमन वसंतराव नागदे यांचा समावेश आहे.

****

यंदाचा श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथले शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांना तर इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार हिंगोलीच्या सुशीला पाईकराव यांना जाहीर झाला आहे. कोविड काळामध्ये विधवा झालेल्या महिलांच्या प्रश्नावर सध्या कुलकर्णी काम करत आहेत. सुशीलाताई  उगम ग्रामविकास प्रकल्पाद्वारे त्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत.

****

नाशिक इथं होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती, संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिक इथं काल संमेलन स्थळाचं उद्घाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झालं, त्यानंतर भुजबळ बोलत होते. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत, तर समारोपाच्या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित राहणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

//*************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...