Friday, 22 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ एप्रिल २०२२ सायंकाळी ६.१०

****

·      नव्या साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा-संशोधनात्मक लेखन वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज, खासदार शरद पवार यांच्याकडून व्यक्त; ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदगीर इथं दिमाखदार सोहळ्यात उद्‌घाटन.

·      कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा.

·      पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी होणार.

आणि

·      उस्मानाबाद जिल्ह्यात तेर ग्रामपंचायतीचा प्रत्येक घरासमोर शुद्ध जल वाहिका उपक्रम.

****

आता सविस्तर बातम्या

****

नव्या साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा जाणवत असून, संशोधनात्मक लेखन वाचकांपर्यंत पोहोचण्याची गरज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज लातूर जिल्ह्यात उदगीर इथं ९५ वाव्या मराठी साहित्य संमेलनाचं उद्‌घाटन केल्यानंतर बोलत होते. साहित्य महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी, अशी सूचनाही पवार यांनी यावेळी केली.

 

ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर आजकाल काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून, साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं, असंही पवार यांनी नमूद केलं.

 

संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

मराठी भाषा बोलणारे देशात दुसऱ्या आणि जगात १०व्या क्रमांकावर असल्याचं सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं. तसंच साहित्य संमेलन इतर राज्यात व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उपयोग कोणाची निंदा नालस्ती करण्यासाठी होऊ नये असं मत संमेलनाचे प्रमुख पाहुणे दामोदर मावजो यांनी व्यक्त केलं. पुढील साहित्य संमेलन गोव्यात भरवावं, कोकणी माणूस त्याला प्रतिसाद देईल असं मावजो म्हणाले.

 

९६ वावं साहित्य संमेलन होण्यापूर्वी केंद्राने मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी अमित देशमुख यांनी यावेळी केली.

 

दरम्यान, ग्रंथदिंडीने या संमेलनाला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीत उदगीर शहर आणि तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विविध पोशाखात सहभागी झाले. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं तयार केलेल्या चित्ररथानं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तीन किलोमीटर अंतराच्या या ग्रंथदिंडीत महिलांची दुचाकी फेरी तसंच विविध पोशाखातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या ग्रंथदिंडीवर प्रत्येक चौकात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.

****

कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात भारनियमन सुरु असतांना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचा हा डाव हाणून पाडणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. सामान्य ग्राहकाचे वीजबिल थकल्यानंतर वीज कापणाऱ्या आणि थकबाकीचे कारण देत भारनियमन लादणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडेच वीजबिलाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी उघड झाली असून राज्य महसूल विभागाने तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन, वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

****

धुळे इथं १ हजार ७९१ कोटी रुपये खर्चाच्या २६१ किलोमीटर लांबीच्या दोन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं लोकार्पण तसंच काही कामांची पायाभरणी केंद्रीय रस्ते आणि वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आली. यावेळी विविध ७ पुलांच्या कामांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पध्दतीने करण्यात आले. तसंच धुळे शहरातील २३ युवकांनी सुरु केलेल्या नवीन उद्योगांच्या उत्पादनाची आणि सेवांची माहिती गडकरी यांनी यावेळी जाणून घेतली.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय - ईडीने केलेल्या कारवाई विरोधात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कुख्यात गूंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंधित सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध आहे, या आरोपावरून ईडीने त्यांना २३ फेब्रुवारीला अटक केली. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान ईडीने मलिक यांच्या विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. एकूणच या सर्व कारवाई विरोधात आणि अंतरिम जामीनासाठी मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्यानं हस्तक्षेप करण्याचं नाकारत, सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांचा अर्ज फेटाळून लावला.

****

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केल्यावरही त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत, मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली. तुरुंगात राहून सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री म्हणून मलिक यांनी नवा विक्रम केला असल्याची टीका उपाध्ये यांनी केली.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत १८७ कोटी २६ लाखांहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. देशात सध्या १४ हजार २४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

****

जम्मू-काश्मीरच्या सुंजवान भागात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या चकमकीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे एक सहाय्यक उपनिरीक्षक हुतात्मा झाले असून सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. या कारवाई दरम्यान दोन ए के ४७ रायफल्स, दारुगोळा, सेटलाइट फोन आणि आक्षेपार्ह साधनसामुग्री जप्त करण्यात आली.

****

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेतली जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. या पार्श्वभूमीवर यंदा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच व्हावी यासाठी परीक्षा परिषदेने आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र टीईटी परीक्षा घोटाळ्यात विनर कंपनीचे नाव आल्यामुळे शासनाने या कंपनीच्या सहकार्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, विनर कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने विनर कंपनीच्या बाजूने निकाल दिला. परिणामी आता विनरच्या सहकार्याने येत्या २० जुलैला शिष्यवृत्ती परीक्षा घ्यावी लागणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातल्या प्रत्येक घरासमोर शुद्ध जल वाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –

काही अडचणींमुळे अनेक नागरिकांना आरओ प्लॅन्ट पर्यंत जाऊन पाणी घेऊन येणे शक्य होत नाही, तसेच आरओ प्लॅन्ट नसलेल्या भागातील नागरिकांना यापासून वंचित राहावं लागतं. अशा नागरिकांना देखील शुद्ध पिण्याचे पाणी कमीत कमी दरात उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक घरासमोर शुद्ध जल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल आहे. अवघ्या १० रुपयात १५ लिटर शुद्ध “आरओ” पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शुध्दजल वितरण व्हॅनला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. "आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर उस्मानाबाद" अभियाना अंतर्गत येणाऱ्या या शुध्द जल व्हॅन उपक्रमामुळे अनेकांना रोजगार देखील मिळणार आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद

****

आज जागतिक वसुंधरा दिन. या निमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले इथल्या बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसनी आज सागरेश्वर, वेंगुर्ला इथल्या समुद्र किनाऱ्याची स्वछता केली. यावेळी किनाऱ्यावरून त्यांनी ३५ पोती प्लास्टिक आणि बाटल्या जमा केल्या.

****

नांदेड जिल्ह्यात आज एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात बाधित रूग्णांची संख्या आता एक लाख, २ हजार, ८०१ झाली आहे.

****

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात दोन दिवस तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...