Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 24 October 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· दीपावलीतील लक्ष्मीपूजनाचा आज सोहळा, विविध साहित्यानं बाजारपेठा सजल्या, ग्राहकांची
मोठी गर्दी
· परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये
मदत देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी
· आनंदाचा शिधा संचाचं आजपासून ऑफलाईन पद्धतीनं वितरण
· राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला विदेशातून देणगी स्वीकारण्यावर
बंदी
· देशभरातून नैऋत्य मौसमी पावसाची माघार
आणि
· ऑस्ट्रेलियातल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर
शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय
सविस्तर बातम्या
दीपावलीतला सर्वाधिक महत्त्वाचा लक्ष्मीपूजनाचा सोहळा आज साजरा होत आहे. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना
शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा हर्ष आणि उल्हासाचा सण असून, हा सण परस्पर सहकार्य
आणि सौहार्दाची भावना अधिक दृढ करण्याचं एक निमित्त आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या
शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर, दीपावली हे रामराज्याच्या आगमनाचं प्रतीक असून ते
सौम्य, लोकहितकारी शासनाचा आदर्श आहे, असं धनखड यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा
दिल्या आहेत. आनंद, चैतन्य आणि प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान,
संपन्नता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
आहेत –
Byte
दिपोत्सव म्हणजे आपल्या सर्वांची
दिवाळी. आपल्या सर्वांना दिपावलीचा मन:पूर्वक शुभेच्छा. आपल्या सर्वांना निरामय आरोग्य
लाभावं, आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दिपोत्सवाचं हे तेज चैतन्य आणि ऊर्जेचं पर्व घेऊन
येवो, अशी मनोकामना मी करतो. दिपोत्सव पर्वातील प्रत्येक दिवस आपल्याला निसर्ग, आरोग्य,
कुटुंब, समाज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ऊर्मी देतो. यानिमित्तानं परस्परांविषयीचा
आदर वाढतो, सामाजिक बंध आणखी घट्ट होत जातात, हीच ऊर्जा घेऊन आपल्याला निर्सगाचं, पर्यावरण
रक्षणाचं व्रतही जपायचं आहे. त्यामुळे पर्यावरणपुरक सण ही संकल्पना स्वीकारुन पुढे
जाऊया, असं आवाहनही मी यानिमित्तानं करतो.
लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत.
आकाशदिवे, फटाके, फराळाचं साहित्य, रोषणाईच्या विद्युत दिव्यांच्या माळा, लक्ष्मीरुपी
फडे केरसुण्या, लक्ष्मीच्या तसबिरी तसंच मूर्ती, लाह्या बत्तासे, अनेक प्रकारची फुलं
आणि ऊस आवळ्यासह विविध फळं तसंच रांगोळीसह, सजावटीच्या साहित्याची बाजारपेठेत रेलचेल
दिसून येत आहे. कोविड प्रादुर्भावानंतर प्रथमच दिवाळीचा सण निर्बंधमुक्त वातावरणात
साजरा होत असल्यानं, नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. कपडे, गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक
वस्तू, सोन्याचांदीची आभुषणं तसंच वाहन खरेदीसाठी नागरिकांची विशेषत: महिलांची बाजारात
गर्दी दिसून आली.
दरम्यान, आज नरक चतुर्दशीही साजरी होत आहे. या दिवशी सुवासिक तेल उटणं लावून
कढत पाण्याने स्नान करण्याचा प्रघात आहे. आज पहाटे हा अभ्यंगस्नान सोहळा घरोघरी साजरा
झाला.
****
नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारात तख्त स्नानाने दिवाळीची सुरुवात झाली. गोदावरीतून
पाण्याचे घडे भरुन गुरुद्वारा परिसराची स्वच्छता करण्यात आली. या ऐतिहासिक पर्वात सहभागी
होण्यासाठी देश - विदेशातले हजारो भाविक नांदेड इथं दाखल झाले आहेत.
****
भगवान श्रीरामाने दिलेली शिकवण अंगीकारण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी केलं आहे. काल सायंकाळी अयोध्येत दीपोत्सव साजरा केल्यानंतर ते रामकर्था पार्कमध्ये
लोकांना संबोधित करत होते. सबका साथ सबका विकास या आपल्या आदर्श वाक्याचे प्रेरणास्रोत
श्रीराम हेच असल्याचं, पंतप्रधानांनी सांगितलं. यंदाची दिवाळी स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षातली दिवाळी असल्यानं अधिक विशेष असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त
केली.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं ३६ व्यावसायिक उपग्रहाचं काल मध्यरात्री
१२ वाजून ७ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण केलं. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड
आणि इन स्पेस यांचं अभिनंदन केलं आहे.
यावेळी बोलताना इस्रो चे प्रमुख डॉक्टर सोमनाथ यांनी, जून २०२३ मध्ये चांद्रयान
तीन चं प्रक्षेपण करणार असल्याचं सांगितलं. चांद्रयान तीन जवळपास पूर्ण तयार असून,
त्याच्या प्रक्षेपणासंबंधीच्या पूर्व चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचं त्यंनी सांगितलं.
****
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार
रुपये मदत देण्याची मागणी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर
पत्रकार परिषदेत बोलत होते. मदतीची ही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्या मागणीला आपला
पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे उत्सवी सरकार असून त्यांच्याकडे
भावनेचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरे यांनी केली. पंचनामे आणि इतर कार्यवाही होत राहील,
मात्र नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले...
Byte …
हे अस्मानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की, शेतकऱ्याला
उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये. हे उत्सवी सरकार
आहे. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील प्रजा ही समाधानी आहे की नाही? हे पाहणं
हे त्या त्या राज्यकर्त्याचं काम असतं आणि त्या कामामध्ये, त्या कर्तव्यामध्ये हे सरकार
अपयशी ठरतय. पंचनामे होतील तेव्हा होतील ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला
पाहिजे होता पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. माझ्या शेतकऱ्याला
तत्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणताय हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मागणी
त्यांची आहे, आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.
ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यातल्या दहेगाव शिवार इथं पिकांची पाहणी केली. पेंढापूर
इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ओला दुष्काळ
जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं, कृषीमंत्री सांगत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती
पाहण्यासाठी हा आपला प्रतिकात्मक दौरा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मराठवाडा दौरा करण्याचा नैतिक अधिकार नसून, त्यांचा
हा दौरा राजकीय नाटक असल्याची टीका, भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी
यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. मागच्या वर्षी प्रचंड अतिवृष्टी झाली, जनावरे
वाहून गेली, जमिनी खरडून गेल्या तेव्हा ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातले
नुकसानीचे पंचनामे अजूनही धुळखात पडून आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना मदत तर केलीच नाही,
शिवाय एक रुपयाही विमा मिळवून दिला नाही. कालचा दौरा हे त्यांचं नाटक म्हणजे पुतना
मावशीचं प्रेम असल्याची खोचक टीका राम कुलकर्णी यांनी केली आहे.
****
राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान तसंच पीकविमा या दोन्हीही
प्रकारची मदत करण्याची गरज असल्याचं, बीड जिल्ह्यातल्या परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी
म्हटलं आहे. अंबाजोगाई तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर
ते बोलत होते. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसंच कृषी
विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना शेतीच्या बांधावरून थेट फोन करून त्यांनी नुकसानाची
माहिती दिली. शेतकऱ्यांशीही संवाद साधत त्यांना धीर दिला, राज्य सरकारकडे मदतीसाठी
आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात बुट्टे वडगाव इथल्या अतिवृष्टीमुळे बाधित
चव्हाण कुटुंबाला, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीची मदत केली आहे. ऋषिकेश चव्हाण
या चिमुकल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं, सत्तार यांनी त्याची भेट घेऊन,
दिवाळी साठी कपडे, मिठाई, फटाके तसंच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
****
प्राधान्य कुटूंब आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दिवाळीनिमित्त वाटप करण्यात
येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधा संचाचं वितरण आता ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता एक किलो साखर, एक किलो
रवा, एक किलो हरभरा डाळ आणि एक लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील, अशी
माहिती, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. हा शिधा कालपर्यंत
पी ओ एस मशीनद्वारे ऑनलाईन नोंद करून वाटप केला जात होता, मात्र इंटरनेटच्या माध्यमातून
ही प्रक्रिया संथगतीने होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी
घेतला आहे. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या
स्वस्त धान्य दुकानात जाऊन घ्यावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान, आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य
दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदवहीत नोंद घेऊन शिधा
किट वाटप करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात होती.
नांदेड जिल्ह्यातल्या सुमारे दोन हजार स्वस्त धान्य दुकानांद्वारे, पाच लाख
९७ हजार ८१२ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असलयाचं, खासदार प्रतापराव
पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे. नांदेड इथं “आनंदाचा शिधा” वाटपाचा काल प्रातिनिधिक
शुभारंभ करतांना ते बोलत होते. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचवले
जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
राजीव गांधी फाऊंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांचा विदेशी
योगदान नियमन कायद्यांतर्गत परदेशातून देणगी स्वीकारण्याचा परवाना केंद्रीय गृह मंत्रालयानं
रद्द केला आहे. या संस्थांनी परदेशातून येणाऱ्या निधीबाबत नियमांचं उल्लंघन केल्यामुळे
ही कारवाई करण्यात आल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या संस्थेला चीनकडून
मदत मिळत असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. जुलै २०२० मध्ये केंद्रीय
गृह खात्याने स्थापन केलेल्या एका समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. खासदार
सोनिया गांधी या फाउंडेशन च्या अध्यक्ष असून डॉ. मनमोहन सिंह, पी. चिंदबरम, राहुल गांधी
आणि प्रियांका गांधी-वाड्रा या संस्थेचे विश्वस्त आहेत.
****
दहावीची परीक्षा यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार असल्याचं, माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सांगितलं. कोविड काळात झालेल्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमात
मंडळाकडून कपात करण्यात आली होती. यंदा मात्र दहावीच्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के अभ्यासक्रमावर
आधारित असतील. दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला प्रारंभ झाला असून, अर्ज भरण्याची शेवटची
मुदत १० नोव्हेंबरपर्यंत असून, पुनर्परीक्षार्थींसाठी अर्ज भरण्याची मुदत ११ ते २५
नोव्हेंबर अशी आहे. मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.
****
देशभरातल्या विद्यार्थ्यांचं मुख्य प्रवाहातलं शिक्षण व्यावसायिक कौशल्याशी
जोडण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय श्रेयांक आराखडा सादर केला आहे. या आराखड्याअंतर्गत
शालेय शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत श्रेयांक संकल्पना मांडण्यात आली असून,
विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक स्तरापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत श्रेयांक प्राप्त
करता येतील. याबाबतच्या हरकती, सूचना नोंदवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात
आली आहे.
****
मुंबई, पुण्यासह देशाच्या उर्वरित भागातून नैऋत्य मौसमी पावसानं माघार घेतली
आहे. हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी काल ट्विटरवर ही
माहिती दिली. काल राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली, मात्र आज राज्याच्या
सर्व विभागांत हवामान कोरडं राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
****
पावसानं विश्रांती घेतल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून गोदापात्रात
होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अन्य सहा धरणांतून मात्र काही प्रमाणात
विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरण आणि समूह शंभर टक्के भरला आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या
रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम
फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत आठ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंह आणि हार्दिक
पंड्याने प्रत्येकी तीन तीन तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी
घेतला.
पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची
सुरूवात अडखळत झाली. सलामीवीर के एल राहुल आणि कर्णधार रोहीत शर्मा प्रत्येकी चार धावांवर
बाद झाले. सूर्यकुमार यादवही १५ धावांवर बाद झाल्यावर, विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या
साथीने भारताचा डाव सावरत, धावसंख्येला आकार दिला. हार्दिक चाळीस धावांवर आणि त्यानंतर
आलेला दिनेश कार्तिक एका धावेवर तंबूत परतला. रविचंद्रन अश्विनने अखेरच्या चेंडूवर
अखेरची विजयी एक धाव काढली. ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं, ८२ धावांची
नाबाद झंझावाती खेळी करून, रोमहर्षक विजय खेचून आणणारा विराट कोहली, सामनावीर पुरस्काराचा
मानकरी ठरला.
दरम्यान विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा
नऊ गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी नेदरलंडसोबत
होणार आहे.
****
आयुर्वेद दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. नवी दिल्ली इथं काल झालेल्या सातव्या
आयुर्वेद दिन समारोहात बोलताना केंद्रीय आयुषमंत्री
सर्बानंद सोनोवाल यांनी, देशातल्या नागरिकांनी हजारो वर्षांपासूनच्या आयुर्वेद उपचार
पद्धतीचं महत्व समजून घ्यावं, असं आवाहन केलं.
हिंगोलीमध्ये यानिमित्तानं निमा या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे निमा वॉकेथॉन घेण्यात
आली. त्याआधी धन्वंतरी पूजन करण्यात आलं.
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा सामान्य रुग्णालय तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व
अधिकारी आणि आरोग्यवर्धनी योग शिक्षक संघटनेचे योगशिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभाग
नोंदवला होता .
****
दक्षिण मध्य रेल्वेनं आज सिंकदराबाद - नांदेड ही विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय
घेतला आहे. दिवाळी सणामुळे प्रवाशांची होणारी गर्दी पाहता ही विशेष रेल्वे सोडण्यात
येत आहे. ही रेल्वे सिकंदराबादहून सकाळी पावणे आठ वाजता सुटणार असून नांदेडला दुपारी
तीन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे.
****
No comments:
Post a Comment