Tuesday, 22 November 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  22 November  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ नोव्हेंबर २०२२   सायंकाळी ६.१०

****

·      देशभरात पंचेचाळीस ठिकाणी नवनियुक्त एक्काहत्तर हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रं प्रदान.

·      शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार-प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा.

·      न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना पावसामुळे रद्द;मालिकेत भारत एक शून्यने विजयी.

आणि

·      राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.

****

देशभरात पंचेचाळीस ठिकाणच्या नवनियुक्त एक्काहत्तर हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्ती पत्रं प्रदान केली. नोकऱ्या देण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत असून, विविध राज्यांमध्ये अनेक रोजगार मेळावे घेतले जात आहेत आणि ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. युवाशक्तीची प्रतिभा आणि ऊर्जा वापरण्यास सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी यावेळी ‘कर्मयोगी भारत’ तंत्रज्ञान मंचाचं उद्घाटन केलं. या मंचावर अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम असून, नवीन भरती होणाऱ्यांच्या कारकीर्दीत प्रगतीसाठी ते अभ्यासक्रम सहाय्यक ठरतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

****

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सगळ्या राज्यांतून आलेल्या सूचनांचा समावेश करून सर्वसमावेशक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याची माहिती, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचे सचिव इंदेवर पांडे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या पाच ते सात जानेवारीदरम्यान सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची सातवी राष्ट्रीय परिषद होणार आहे. या परिषदेच्या पूर्वतयारीसंदर्भात आज मुंबईत झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेत पांडे बोलत होते. यावेळी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीच्या विविध उपाययोजनांबाबत सादरीकरण केलं. जानेवारीत होणाऱ्या परिषदेत महाराष्ट्राला मुख्य राज्य तर तामिळनाडूला सह राज्याचा मान मिळाला आहे.

****

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार असल्याचा इशारा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ते आज शेगाव इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या सगळ्या जिल्हा आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयांमध्ये पीक विमा मदत कक्ष स्थापन करण्यात येणार असून, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपलं नाव, मोबाईल क्रमांक आणि पीकविमा भरल्याची पावती या पीकविमा कक्षात जमा करावी, या शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करेल, असं पटोले यांनी सांगितलं. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई दिली नाही तर त्या विमा कंपन्यांना महाराष्ट्रात काम करु दिलं जाणार नाही, असा इशाराही पटोले यांनी यावेळी दिला. दरम्यान, कथित आक्षेपार्ह विधानामुळे भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदावर राहण्याची पात्रता नाही, असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात आणि शिवरायांचं इतिहासातलं महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथे पत्रकारांशी बोलत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे, शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले, असं सांगत, केवळ एखाद्या विधानावरून त्यांना कोंडीत पकडू नये, असं आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केलं.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आज काँग्रेस पक्षानं औरंगाबादमध्ये आंदोलन केलं. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे आणि औरंगाबाद शहर कांग्रेस अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या नेतृत्वात आज दुपारी क्रांती चौकात राज्यपालांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

****

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला होत असलेल्या विलंब प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात येत्या पाच डिसेंबरपासून सलग सुनावणी घेण्यात येणार आहे. विक्रोळीतला गोदरेज कंपनीचा भूखंड वगळता उर्वरित भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या भूखंडासाठी राज्य सरकारनं आधी करार झाल्यानुसार पाचशे बहात्तर कोटी रुपये नुकसान भरपाई न देता दोनशे चौसष्ट कोटी रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला, त्याविरोधात गोदरेज कंपनीनं उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. प्रकल्पाचं महत्त्व लक्षात घेत या प्रकरणाची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केली, त्याला कंपनीच्या वकिलांनीही सहमती दर्शवली, त्यानंतर खंडपीठानं पाच डिसेंबरपासून सलग सुनावणी घेण्याचं मान्य केलं.

****

नोकरीत बढती न दिल्याच्या विरोधात सैन्य दलातील ३४ महिला अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावत दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये दिलेल्या आदेशानुसार, सैन्यात कायमस्वरुपी नियुक्ती झालेल्या महिला अधिकाऱ्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

****

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा संदेश मिळाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ध्वनिसंदेशात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं आहे. २० नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण क्रमांकावर अनुक्रमे ७ ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज तर २१ नोव्हेंबरला १२ ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज मिळाले आहेत. संदेश पाठवणारी व्यक्ती मानसिक आजारामुळे वर्षभरापासून बेरोजगार असल्याचं, तपासातून निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

****

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं एक शून्यने जिंकली आहे. मालिकेतला आजचा तिसरा सामना पावसामुळे अर्ध्यातच सोडून देत पंचांनी अनिर्णित ठरवला. आजचा सामना पावसामुळे उशीरा सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजनेने चार षटकांत १७ धावा देत चार गडी बाद केले. अर्शदीप सिंहने चार षटकांत ३७ धावा देत चार बळी घेतले, तर हर्षल पटेलने एक बळी घेतला. १९ षटकं आणि चार चेंडूत न्यूझीलंडचा संघ १६० धावांत सर्वबाद झाला.

या आव्हानाचा सामना करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही अडखळत झाली. सलामीवीर इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव हे अनुक्रमे १०, ११ आणि तेरा धावा काढून बाद झाले. श्रेयस अय्यर शून्यावर तंबूत परतला. पावसामुळे नवव्या षटकानंतर खेळ थांबला तेव्हा कर्णधार हार्दिक पंड्या ३० तर दीपक हुडा नऊ धावांवर खेळत होते. मालिकेतला पहिला सामनाही पावसामुळे होऊ शकला नव्हता. दुसरा सामना जिंकल्यानं, भारतीय संघ मालिकेत विजयी ठरला. मोहम्मद सिराज सामनावीर तर दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करणारा सूर्यकुमार यादव मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान, शुक्रवारपासून दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे

****

 

उस्मानाबाद इथे सुरू असलेल्या पंचावन्नाव्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशचा २१-९ असा डावानं पराभव केला तर पुरुष गटातही मध्यभारत संघाचा २१-९ असा डावानं पराभव केला. आता उपउपान्त्य फेरीत राज्याच्या पुरुष संघाचा सामना गुजरात संघाशी तर महिला संघाचा सामना आंध्र प्रदेश संघाशी होणार आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज कृत्रिम तारांगणाद्वारे खगोलशास्त्राची माहिती देण्यात आली. शहरातल्या सिल्क मिल्क कॉलनी इथल्या महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिका मसरत सुलताना आणि सय्यद रईसा बेगम यांच्या संकल्पनेद्वारे प्रथमच हा अनोखा असा शैक्षणिक प्रकल्प राबवण्यात आला. यामध्ये ३०० विद्यार्थ्यांना अवकाशातले आकाशगंगा, सूर्य, तारे, ग्रह, चंद्र आणि एकूणच खगोलशास्त्राबाबत माहिती देण्यात आली.

****

कोल्हापूर मार्केट यार्डमधले गुळाचे सौदे शेतकऱ्यांनी आज बंद पाडले. व्यापाऱ्यांनी गुळाचे दर पाडल्याचा आरोप करत, जोपर्यंत गुळाला तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत नाही, तोपर्यंत सौदे बंद पाडू, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...