Friday, 2 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जी 20 या आंतरराष्ट्रीय मंचाचं अध्यक्षपद काल भारताकडे औपचारिकरित्या सोपवण्यात आलं. नवी दिल्ली मध्ये झालेल्या कार्यक्रमात परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर तसंच केंद्र सरकारचे प्रमुख सचिव पी के मिश्रा उपस्थित होते.

दरम्यान, भारताला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ लेणी आणि दौलताबाद किल्ल्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या शंभर इमारती आणि स्मारकांवर जी 20 च्या बोधचिन्हासह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

****

राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव आहे; या व्यवसायातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत व्यक्त केली. कोळशाच्या खाणींचा लिलाव आणि खाण क्षेत्रातील संधी या विषयावरील गुंतवणूकदारांच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्र अतिशय समृद्ध असून राज्याच्या सकल उत्पन्नात मोलाची भर घालण्याची क्षमता या क्षेत्रात आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

महाराष्ट्राचा 'महासंकल्प' या कार्यक्रमाअंतर्गत विविध विभागातल्या एक हजार ३२ अभियंत्यांना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामं करावीत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयाचा इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत सरकारी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना वस्तू आणि सेवा कर विभागाच्या औरंगाबाद शाखेनं ताब्यात घेतलं. फरहत इंटरप्राईजेस या कंपनीनं अस्तित्वात नसलेल्या ३५ हून अधिक आस्थापनांच्या नावाने ५०० कोटीहून अधिक रकमेची बनावट देयके सादर करुन त्याद्वारे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत असल्याची माहिती जीएसटी पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

बुलडाणा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत संपूर्ण जिल्हाभरात नऊ रुग्ण आढळले आहेत. खामगाव शहरात स्वाइन फ्ल्यू चे सर्वाधिक रुग्ण आढळले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...