Saturday, 3 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त आज दिल्लीमध्ये विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ति, संघटना, स्वयंसेवी संस्था, राज्यं आणि जिल्ह्यांना वार्षिक राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. २०२१-२२ साठीचे हे पुरस्कार आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांचं साहस आणि यश याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. केंद्रसरकारनं दिव्यांगांच्या प्रगतीसाठी तसंच त्यांना सक्षम बनवण्यासाठी अनेक पावलं उचलली असून यामुळे दिव्यांगांना अनेक संधी उपलब्ध होत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या यासंदर्भातल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. दिव्यांगांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष सक्रीय असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. नव्या संधींची दिव्यांगांना उपलब्धता व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत सरकार, आपला मुख्य कार्यक्रम आणि नव्या पिढीच्या आधारभूत आराखड्याला साकार करत असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज औरंगाबाद इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, घाटीत द हाऊस ऑफ होप या स्वयंसेवी संस्थेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. रक्तदान शिबीर, दिव्यांगांना गरजेचं साहित्यवाटप, सर्वांसाठी मोफत रुग्णवाहिका लोकार्पण आणि घाटीतल्या रक्तपेढीसाठी, रक्तदात्यांकरिता खाटा देणं या उपक्रमांचा यात समावेश आहे.

****

दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या विशाखापट्टणम इथे नौदल दिनाचा मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी भारतीय नौदलाच्या वतीनं, त्यांच्या कार्यान्वयाच्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नौदलाचं युद्धकौशल्य आणि क्षमतांचं दर्शन घडवलं जाईल. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून, प्रात्यक्षिकांसाठी नौदल सज्ज झालं आहे.

 राष्ट्रपती आणि सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

****

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण न केलेल्या, मात्र कामाबाबतचा आदेश निघालेल्या कामांना शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर, ग्रामविकास विभागानं १९ अणि २५ जुलै रोजी स्थगिती दिली होती. सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.  संबंधित कामांसाठी निधी मंजूर असताना आणि सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली असताना अशी कामं थांबवता येणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

१ एप्रिल २०२१ पासून मंजूर झालेली कामं यामुळे रखडणार होती. त्यामुळे या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. येत्या १२ डिसेंबर ला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, नगर दक्षिणचे माजी खासदार तुकाराम गडाख यांचं काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झालं ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी १२ वाजता, नेवासामधल्या पानसवाडीच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

सुमारे दोन वर्षापूर्वी बंद करण्यात आलेली पुणे-लातूर-अमरावती ही रेल्वे गाडी  आता आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. आठवड्यातल्या  शुक्रवार आणि रविवारी ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी निघून  लातूरला दुसऱ्या दिवशी पहाटे साडे ५ वाजता पोहचेल. परतीच्या  प्रवासात रविवारी आणि मंगळवारी अमरावती इथून लातूर मार्गे पुणेकडे जाईल. परतीच्या  प्रवासात ही गाडी अमरावतीवरून रात्री ७ वाजून ५० मिनिटानी निघून लातूरला दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून ३५ मिनिटानी पोहचेल. तर पुणे शहरात दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पोहचेल.

****

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यातही १० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी ५१ जणांनी तर ८३ सदस्यपदांसाठी ३०२ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

****

भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात सरांडी बुजरुक या गावात एका लग्नसोहळ्यासाठी आलेल्या २०० जणांना काल अन्नातून विषबाधा झाली. यात लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...