आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जी २० च्या विकास कार्य समुहाच्या मुंबईत सुरु असलेल्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी औपचारिक आणि गोपनीय
बैठकीला सुरुवात होईल. यात सदस्य देशांच्या विकासाच्या मुद्द्यासह विविध विषयांवर चर्चा
होणार आहे. काल संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देशी-विदेशी
पाहुण्यांना राज्यातल्या कला-संस्कृतीची ओळख करुन देण्यात आली.
****
आकाशवाणीची स्थानिक प्रसारण केंद्रं बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी काल लोकसभेत
सांगितलं. ‘एक राष्ट्र एक प्रसारण सेवा’
असं केंद्र सरकारचं कोणतंही धोरण नाही, असंही त्यांनी
स्पष्ट केलं.
****
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३-२४ पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य
सरकारने घेतला आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरु करताना आणखी नवसंकल्पनांचा
समावेश करण्यात यावा, यामध्ये राज्यातल्या उच्चशिक्षण-संशोधनात कार्यरत संस्थांचाही सहभाग घेण्यात यावा, अशा
सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
****
राज्यातल्या फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य
क्रीडा विभाग आणि जर्मनीतल्या एफसी बायर्न यांच्यात सामंजस्य
करार करण्यात आला. हा सामंजस्य करार जी - ट्वेंटी देशांमधलं सहकार्य
वाढीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं.
****
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ११ पोलिस
कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. पोलीस संरक्षण
असतानाही हा प्रकार घडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती, मात्र
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले.
****
राज्यात कोविडच्या दैनंदिन रूग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, उपचाराधीन रूग्णांची संख्या आता २०० च्या खाली आली आहे. २८ नोव्हेंबर ते ११
डिसेंबर या काळात रूग्ण संख्येत सुमारे २८ टक्के घट झाली. चाचणीत रुग्ण बाधित आढळण्याचं
प्रमाण तीन दशांश टक्क्यावर आलं आहे.
//*********//
No comments:
Post a Comment