Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेत आज भारत - चीन मुद्यावर गदारोळ झाला. आज सदनाचं
कामकाज सुरु होताच काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलासह इतर विरोधी पक्षांनी या मुद्यावर
चर्चेची मागणी केली. चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नावर विस्तारानं चर्चा झाली पाहिजे,
कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
मात्र या मुद्यावर बोलण्यासाठी कालच वेळ दिला होता, असं उपसभापती हरीवंश यांनी सांगितल्यानंतर
विरोधकांनी सभात्याग केला.
****
सर्व खासदारांनी जी ट्वेंटीशी संबंधित कार्यक्रमात सहभाग
घेतला पाहिजे, कारण हा कार्यक्रम केवळ सरकारचा नसून देशाचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या
बैठकीत ते बोलत होते. जी - 20 शी संबंधित कार्यक्रमांमध्ये नागरीकांचा सहभाग वाढवण्याच्या
दृष्टीनं सर्व खासदारांनी उपाय सुचवावे, असं त्यांनी सांगितलं.
****
जी २० च्या विकास कार्य समुहाच्या मुंबईत सुरु असलेल्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विविध देशांचे प्रतिनिधी शाश्वत विकास
उद्दिष्टांच्या प्रगतीसाठी चर्चा करत आहेत. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांच्या
व्हिडिओ संदेशाने या बैठकीला सुरुवात झाली. उच्च-स्तरीय तत्त्वे,
अन्न, ऊर्जा आणि आर्थिक बाजारपेठेतील सध्याच्या
व्यत्ययांवर बैठकीच्या या सत्रात चर्चा होत आहे. विकसनशील
राष्ट्रांमध्ये सुधारणा करणं, यावर या बैठकीत भर देण्यात आला आहे.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप
करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर
परिषदेत बोलत होते. फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या अनुवादाला मिळालेला पुरस्कार
रद्द केल्याच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं ते म्हणाले. साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार यांची निवड होणार होती, मात्र राजकीय दबावामुळे ही निवड
रोखण्यात आली, असा आरोपही पवार यांनी केला. प्रत्येकाला आपली मतं मांडू द्यायला पाहिजे,
असं त्यांनी नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ डिसेंबरला आकाशवाणीवर्च्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा हा ९६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी
नागरीक आपले विचार किंवा सूचना, नमो अॅपवर आणि माय जीओव्ही फोरमवर तसंच
एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवू शकतात.
****
गोवर-रुबेलावर विशेष लसीकरण मोहीम राज्यात
उद्यापासून २५ तारखेपर्यंत
राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे
वयोगटातल्या मुलांना एमआर-वन आणि एमआर-टू
लसी देण्यात येतील. लसीकरण आवश्यक असलेल्या मुलांचा शोध आशा आणि अंगणवाडी
कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात घेतला जात आहे.
****
परळी वैजनाथ - मिरज एक्सप्रेसच्या वेळेत
बदल करण्यात आला आहे. उद्यापासून ही गाडी परळीहून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि संध्याकाळी
साडेसहा वाजता मिरजला पोहोचेल अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली
आहे.
****
सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय
थकहमीपोटी बँकेस रक्कम देण्याचा निर्णय
राज्य सरकारनं घेतला असून, त्यात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेला तीन कोटी तीन लाख रुपये मिळणार आहेत.
या रकमेमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उर्जितावस्था निर्माण होण्यास मदत होणार
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
साहस आणि धैर्यासमवेत युवकांनी व्यक्तीमत्व
जडण-घडणावर अधिक लक्ष देण्याची गरज, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली आहे. मुगट
इथं माता साहिब गुरूद्वारा परिसरात, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराच्या
समारोप समारंभात काल ते बोलत होते. राष्ट्रीय छात्रसेना ही एकता आणि अनुशासन या ब्रिदवाक्याला
अनुसरून शालेय शिक्षणापासून युवकांसाठी मोलाचं कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात
जबाबदारीची भावना निर्माण करणं, सैन्यदलाविषयी आवड निर्माण करणं,
तसंच साहसी युवक तयार करण्यात छात्रसेनेचा गौरवपूर्ण उल्लेख करावा लागेल
असंही ते म्हणाले.
****
कोलंबियामध्ये बोगोटा इथं आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय
कनिष्ठ विज्ञान ऑलंपियाडमधे भारतानं सहा सुवर्णपदक जिंकत अग्रस्थान
पटकावलं आहे. भारताच्या अरित्रा मल्होत्रा, राजदीप मिश्रा,
देवेश पंकज भैय्या, बनिब्रत माजी आणि अवनीश बन्सल
या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. प्रयोगिक स्पर्धेत अरित्रा, अवनीश आणि राजदीप या तिघांच्या संघानं दुसऱ्या संघासोबत संयुक्तरित्या रौप्यपदक
पटकावलं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी
क्रिकेट मालिकेतला पहिला सामना चट्टग्राम इथं सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त
हाती आलं तेव्हा भारताच्या ४१ षटकात चार बाद १३४ धावा झाल्या होत्या.
//**********//
No comments:
Post a Comment