Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 15 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
शिवसेना
पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यावर
निवडणूक आयोगानं घातलेली बंदी उठवण्याच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं आदेश राखून ठेवला
आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठानं निवडणूक
आयोगाच्या अंतरिम आदेशाविरोधात उद्धव ठाकरे यांचा अर्ज फेटाळला आहे. या नव्या याचिकेत
त्यांनी एकल खंडपीठाच्या आदेशाला आव्हान दिलं आहे.
****
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी
बैठक घेतली, यावेळी ठरल्याप्रमाणे कृती व्हायला हवी, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते
अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री
बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं नसतं,
तर हा वाद वाढला नसता. त्यांच्या वक्तव्यामुळे
राज्याच्या अस्मितेला धक्का लागला, त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं,
असं पवार म्हणाले. दोन्ही बाजूंनी समजून घेणं गरजेचं असल्याचं
मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
राज्यात
महापुरुषांच्या अवमाननाप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीनं येत्या १७ तारखेला मुंबईत
काढण्यात येणाऱ्या मोर्चाला प्रशासनानं अद्याप परवानगी दिली नसून, ही हुकुमशाही असल्याची
टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
लोकशाहीत लोकशाही मार्गानं केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही.
राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान,
मोर्चाच्या संदर्भात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आज वार्ताहर परिषदेत पुढची भुमिका
मांडणार आहेत.
****
देशाचे
पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज ७२ वी पुण्यतिथी.
त्यानिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट संदेशाद्वारे सरदार वल्लभभाई
पटेल यांना आदरांजली वाहिली आहे.
****
देशात
पॅराग्लायडिंग, स्काय डायविंग यासारख्या हवेतल्या खेळांना अर्थात एरोस्पोर्ट्सना
उत्तम भविष्य आणि क्षमता असल्याचं, नागरी उड्डाण
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज लोकसभेत सांगितलं. प्रश्नोत्तराच्या
तासात ते बोलत होते. सरकारनं एक
एरोस्पोर्ट्स संस्था स्थापन केली असून, या संस्थेचं नंतर राज्यस्तरीय
केंद्र सुरु केले जातील, असं त्यांनी सांगितलं. पश्चिमेकडच्या राष्ट्रांमध्ये एरोस्पोर्ट्स मोठ्या प्रमाणात प्रचलित असून, हे सर्व
खेळ हिवाळ्याच्या काळात भारतात खेळले जाऊ शकतात, असं सिंधिया
म्हणाले.
****
देशात
गेल्या आठ वर्षात शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल
झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.
मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
या काळात देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली असून, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये ८७ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं
त्यांनी सांगितलं. शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधल्यामुळे मुलींचं
शाळा गळतीचं प्रमाणही घटल्याचं मांडविया म्हणाले.
****
राज्यातले गड-किल्ले, मंदिरे आणि महत्वाची संरक्षित स्मारके आदींच्या संवर्धनासाठी
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पुढच्या आर्थिक वर्षापासून पुढील तीन वर्षासाठी तीन टक्के निधीची तरतूद करण्यासाठी
सरकारनं मान्यता दिली आहे. काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयाअंतर्गत तीन वर्षात एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा येत्या एक ते १२ जानेवारी
दरम्यान होणार असल्याचं क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं. काल मुंबईत झालेल्या
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा राज्यस्तर आयोजन समितीच्या
बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनासह स्थळे निश्चित करण्यात आली. पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, नागपूर, अमरावती इथं या स्पर्धा होणार आहेत. कोणत्याही क्रीडापटूच्या ऑलिम्पिक स्वप्नासाठी ही पहिली पायरी असेल,
असं महाजन यावेळी म्हणाले. या स्पर्धा क्रीडा क्षेत्राला
नवीन दिशा देण्याचं काम करतील आणि यामुळे राज्यातल्या खेळाडूंना नवीन स्पर्धा खेळण्याची संधी आणि अनुभव मिळेल,
असं मत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष
अजित पवार यांनी व्यक्त केलं.
****
भारत
आणि बांग्लादेशदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या
दिवसाचा खेळ सुरु असून, भारताचा पहिला डाव ४०४ धावांवर संपुष्टात आला. चेतेश्वर पुजारानं
९०, श्रेयस अय्यरनं ८६, रविचंद्रन अश्विन ५८, ॠषभ पंत ४६, कुलदीप यादवनं ४०, के एल
राहुल २२, तर शुभमन गिलनं २० धावा केल्या. उमेश यादव १५ धावांवर नाबाद राहीला.
//**********//
No comments:
Post a Comment