Friday, 16 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीनं वाढ, भरपाईच्या क्षेत्रातही तीन हेक्टरपर्यंत वाढ

·      प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रलंबित ४४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वितरित करण्याचे कृषी मंत्र्यांचे पीक विमा कंपन्यांना निर्देश

·      जी २० च्या विकास कार्य समूहाच्या पहिल्या बैठकीत भारतानं मांडलेल्या संकल्पनांना सहभागी देशांकडून चांगला प्रतिसाद

·      आंतरजातीय आंतरधर्मिय विवाह परिवार समन्वय समिती आता फक्त आंतरधर्मिय विवाहांसाठीच काम करणार

·      राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबल्या, तिथून पुढे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

·      अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेचं दोन्ही सत्राचं वेळापत्रक जाहीर

·      राज्यात पोलिभरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

आणि

·      भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात बांगलादेशवर फॉलोऑनची छाया

****

राज्य सरकारनं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीनं संच भरपाईच्या क्षेत्रातही वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्य सरकारने काल यासंदर्भातला अध्यादेश जारी केला. जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना प्रती हेक्टर सहा हजार ८०० रुपयांऐवजी १३ हजार ६०० रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर ऐवजी २७ हजार प्रतिहेक्टर मदत देण्यात येणार आहे. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार प्रती हेक्टर ऐवजी ३६ हजार रुपये प्रती हेक्टर मदत देण्यात येणार आहेत.

****

खरीप हंगाम २०२२ मधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रलंबित ४४७ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ वितरित करण्याचे निर्देश, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांना दिले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या आढावा संदर्भात काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून एक हजार ९०२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याची माहिती सत्तार यांनी दिली. या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना कृषीमंत्री सत्तार म्हणाले....

 ‘‘आपल्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जामध्ये सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर या छाननीनुसार पिक विमा कंपनीला आम्ही जो आदेश दिला होता, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दोन हजार ३१३ कोटी रुपये त्यांना नुकसान भरपाई देण्याचं निश्चित केलेलं आहे. त्याचे सर्व पंचनामे होऊन, त्यांची सर्व फॉर्मेलिटी होऊन त्यांनी आतापर्यंत जे वाटप केलेलं आहे, ते १९०२ कोटी इतकं केलेलं आहे. आणि प्रलंबित जे आहेत ते ४११ कोटी रुपये राहीलेले आहेत.’’

दरम्यान, येत्या एक ते पाच जानेवारी दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं राज्यस्तरीय कृषि महोत्सव होणार असल्याची माहिती सत्तार यांनी यावेळी दिली. राज्यातल्या चार कृषी विद्यापीठांनी केलेली संशोधनं, कृषी विभागाची प्रात्यक्षिकं, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हिंदुजा उद्योग समूहानं काल राज्यात विविध ११ क्षेत्रांमध्ये सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार केला. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करुन त्याचे आदानप्रदान करण्यात आले.

****

जी २० च्या विकास कार्य समूहाच्या पहिल्या बैठकीत भारतानं मांडलेल्या संकल्पनांना सहभागी देशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ही अतिशय चांगली सुरुवात आहे, सं भारताचे जी २० सहसचिव नागराज नायडू काकानुर यांनी म्हटलं आहे. जी-20 च्या पहिल्या विकास कार्यगटाच्या तीन दिवसीय बैठकीची काल मुंबईत सांगता झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या बैठकीत सध्याच्या जागतिक परिस्थितीचा पुरवठा साखळीवर झालेला परिणाम, डिजिटल बदल, विकासासाठी डाटाचे महत्त्व, महिलांना केंद्र स्थानी ठेवून विकास, पर्यावरण अनुकूल जीवनशैली यासारख्या विषयांवर चर्चा झाल्याचं ते म्हणाले. आता या मुद्द्यावर सर्व देश अंतर्गत पातळीवर विस्तारानं चर्चा करतील आणि त्यानंतर मंत्रिस्तरीय बैठकीत यावर एकमत होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं काल नवा शासनादेश जारी करुन आंतरजातीय आंतरधर्मिय विवाह परिवार समन्वय समितीच्या कार्यकक्षेत बदल केला आहे. ही समिती आता फक्त आंतरधर्मिय विवाहांसाठीच काम करणार आहे. समितीनं मदतवाहिनीची देखील घोषणा केली आहे. यापूर्वी १३ डिसेंबर रोजी समितीची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली होती. त्यानंतर हा बदल करण्यात आला.

दरम्यान, समितीचे सदस्य योगेश देशपांडे यांनी समितीमध्ये काम करण्यास नकार दिल्यामुळे इरफान अली पिरजादे या नव्या सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

****

राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबल्या आहेत, तिथून पुढे त्या घेण्यासाठी त्वरित सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोग आणि सरकारला दिले आहेत. नांदेड जिल्हा शिक्षण विभागातल्या कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांनी खंडपीठात याचिका दाखल करुन शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य शासनाला शपथपत्र दाखल करण्यास देखील सांगितलं आहे.

****

महाविकास आघाडीतर्फे उद्या मुंबईत राज्य सरकारविरोधी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे तसंच काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य विरोधी पक्ष नेत्यांसह यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले:

‘‘महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य, गरळ ओकण्याचं काम, अपशब्द वापरण्याचं काम, हे काही थांबायला तयार नाही. आणि त्यांना कुणी आवर पण घालत नाही. आणि त्याच्यामुळे लोकांच्यामध्ये अतिशय असंतोष आहे. त्याकरता हा मोर्चा १७ तारखेला निघणारच आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे विषय हेच आहे, सीमाप्रश्न, युगपुरुष शिवाजी महाराज, आणि फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही अपशब्द वापरले गेले आहेत, त्या गोष्टीचा धिक्कार करण्याकरता, या लोकांना बाजुला करण्याकरता, अशा प्रकारचा हा मोर्चा काढला जाणार आहे. आणि महागाई आणि बरोजगारी आणि सीमाप्रश्न हे प्रमुख मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत.’’

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विनियोजन बिलासंदर्भात बैठक झाल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत फडणवीस यांना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत काय ठरलं याची विचारणा केल्याचं ते म्हणाले.

****

शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह वापराबाबत निवडणुक आयोगाकडून लावण्यात आलेली बंदी हटवण्यासाठी, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय, दिल्ली उच्च न्यायालयानं काल राखून ठेवला. यापूर्वी निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठानं फेटाळून लावली होती. या नवीन याचिकेत त्यांनी खंडपिठाच्या या आदेशाला आव्हान दिलं आहे.

****

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातल्या पक्षांना बोलावून बैठक घेतली पाहिजे, असं मत भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदनयराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीनंतर काल त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्तेत असलेल्या पक्षानांच नव्हे तर त्या त्या राज्यातल्या वेगवेगळ्या सर्व प्रमुख पक्षांना बैठकीस निमंत्रित केलं पाहिजे, असं ते म्हणाले. सीमा भागातल्या लोकांचा, त्यांच्या विकासाचा विचार करणं आवश्यक आहे, या लोकांची कोणतीही चूक नसतांना त्यांना या वातावरणात राहावं लागतं, त्यांच्या माणुसकीचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचं उदनयराजे यांनी म्हटलं आहे.

****

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा- जेईई मुख्य परि क्षेच्या दोन्ही सत्राचं वेळापत्रक राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल जारी केलं. २४, २५, २८, ३० आणि ३१ जानेवारी २०२३ ला ही परिक्षा होणार असून, यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दुसर्या सत्राची परिक्षा एप्रिल २०२३ मध्ये होणार आहे.

****

फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द केल्यामुळे निर्माण झालेला वाद अद्यापही कायम आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ प्रसाद कुलकर्णी आणि डॉ. संतोष खेडलेकर यांनी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे सुहास पळशीकर यांनीही राज्याच्या भाषा सल्लागार समितीच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे.

****

शिर्डी इथल्या साईबाबा मंदीराला उच्च दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. या मंदीराला केंद्रीय पोलिस राखीव दल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्यामार्फत सुरक्षा देण्यासंदर्भात प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांनी अहवाल सादर केला होता, त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. कोपरगाव इथले सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी यासंदर्भात जनहीत याचिका दाखल केली होती.

****

राज्यात १८ हजार ३३१ पोलिसांची भरती करण्यात येत असून या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या मोहिमेत आतापर्यंत १४ लाख ४७ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

****

औरंगाबाद इथं आयोजित पद्म महोत्सवाचं उद्घाटन, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल झालं. येत्या १९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एक पद्मविभूषण, दोन पद्मभूषण आणि आठ पद्मश्री असे ११ पद्म पुरस्कार विजेते सहभागी होणार आहेत. क्षेपणास्त्र वैज्ञानिक प्रल्हाद रामाराव, राष्ट्रकुल पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, अहमदनगरच्या बीजमाता राहीबाई पोपेरे, बीडचे गो-सेवक सय्यद शब्बीर, काश्मीरचे हस्तकला तज्ज्ञ फैय्याज अहमद, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर अशा विविध क्षेत्रातल्या पद्म पुरस्कार विजेत्यांची व्याख्यानं होणार आहेत.

****

युनिसेफ आणि राज्य शासन संयुक्तपणे राबवत असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचं संवर्धन करणं तसंच पाणी बचत उपक्रमासाठी, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यामध्ये राज्याल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासोबत इतर चार विद्यापीठांचा समावेश करण्यात आला असून, या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या उपक्रमाचे नोडल ऑफीसर म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वंजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय स्पर्धेत लातूर-नांदेड केंद्रातून परभणी इथलं दानव आणि लातूरचं अबीर गुलाल या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. गोपाळ फाऊंडेशनच्या दानवला प्रथम तर शकुंतलादेवी सामाजिक सेवाभावी संस्थेच्या अबीर गुलालला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. परभणीच्या क्रांती हुतात्मा संस्थेच्या सृजन्मय सभा नाटकास तृतीय पारितोषिक मिळालं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहिमेच्या पहिल्या फेरीला काल प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत २५ डिसेंबरपर्यंत लसीकरण केलं जाणार आहे. गोवर रुबेला लसीची चुकलेली मात्रा या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये अवश्य घ्या, असं आवाहन भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे यांनी केलं आहे. या मोहिमेची उस्मानाबाद जिल्हास्तरीय सुरुवात उस्मानाबाद तालुक्यातील सांजा इथल्या आरोग्य वर्धीनी केंद्रात काल झाली.

****

विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर यांनी हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या रामेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला काल भेट दिली. त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आनंद घेतला. 

****

बांगलादेश संघ भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी आठ बाद १३३ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात करेल. सध्या हा संघ फॉलोऑनच्या छायेखाली आहे. तत्पूर्वी काल भारताचा संघ पहिल्या डावात ४०४ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशच्या संघानं काल आपल्या पहिल्या डावात ८ बाद १३३ धावा केल्या आहेत. कुलदीपनं चार तर मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करत बांगलादेश संघाच्या पहिल्या डावाची दाणादाण उडवली. बांगलादेश संघ सध्या पहिल्या डावात २७१ धावांनी पिछाडीवर आहे.

****

चला जाणु या नदीलाअभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीची निवड झाली असून, मांजरा नदी प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या अभियानाला जिल्ह्यात येत्या आठ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.

या अभियानांतर्गत आयोजित मांजरा नदीच्या जलसंवाद यात्रेला येत्या १ जानेवारीपासून बीड जिल्ह्यातून सुरुवात होणार आहे. आठ जानेवारी रोजी ही यात्रा लातूर जिल्ह्यात पोहोचणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मांजरा नदी अभियानाच्या धर्तीवर जिल्ह्यातल्या लेंडी, मन्याड, तावरजा आणि तेरणा नदीसाठी अभियान राबवण्यात येणार असून यासाठी संबधित उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या स्तरावर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व संवर्धन दिन, आरोग्यवर्धिनी मातृत्व दिन तसंच ग्राम मातृत्वदिन, अशा प्रकारे विविध दिनांचं आयोजन करुन, गर्भवतींच्या नोंदणी पासून सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागात आरोग्य संस्थेत होणाऱ्या प्रसुतिचं प्रमाण वाढल्याचं, जिल्हा प्रजनन आणि बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितलं. गरोदर मातांना सर्व स्तरावर चांगल्या सेवा उपलब्ध करुन दिल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये आरोग्य विभागाबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. परिणामी आरोग्य संस्थेत होणाऱ्या प्रसुतिच्या प्रमाणात वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...