Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७
डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या
अन्य नेत्यांकडून महापुरुषांबद्दल कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या
वतीनं आज मुंबईत महामोर्चा सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या
या मोर्चात, महाविकास आघाडीचे इतर ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते सामाजिक
संस्था, संघटना सहभागी झाल्या आहेत. आझाद मैदानापर्यंत
हा मोर्चा जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मोर्चाला संबोधित
करणार आहेत. डाव्या संघटनांनी देखील महाविकास आघाडीच्या महामोर्चाला
पाठिंबा दिला आहे. राजयभरातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी झाले
आहेत.
या महामोर्चासाठी ३१७ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, राज्य पोलिस बल, दंगल नियंत्रण पथक, अश्रुधुर पथक, वॉटर कॅनन, सी.सी.टी.व्ही. व्हॅन, राखीव पथकं अशी मिळूण ३० पथकं तैनात
करण्यात आली आहेत.
****
हिंदू-देवदेवता आणि महापुरूषांविरोधात
अपमानास्पद वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखावल्याचा
आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या
वतीनं आज राज्यभरात माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. तर शिवसेना ठाकरे
गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार केल्या जात असलेल्या हिंदू संत
तसंच देवता यांच्याबद्दलच्या वक्तव्याच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी
संघटनांकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९७ ग्रामपंचायती
करिता उद्या ६३९ केंद्रावर मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकासाठी उद्या होत असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे
पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी काल जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी
केली.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १६६ ग्रामपंचायतींसाठी
उद्या मतदान होणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या ४५, तुळजापूर ४८, उमरगा २३, लोहारा १२, कळंब ३०, वाशी चार, भूम दोन, तर परंडा तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे. यासाठी ६५८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी ३९ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
****
संपूर्ण भारतीय बनावटीची मोर्मुगाव पी
१५ ब ही विशाखापट्टणम श्रेणीतली क्षेपणास्त्र विनाशिका उद्या मुंबईतल्या नॅवल डॉकयार्ड इथं नौदलात
सामील होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
आहेत. माझगाव डॉकमध्ये या युद्धनौकेची निर्मिती केली आहे, तर
भारतीय नौदलाच्या युद्धनौका आरेखन विभागानं या युद्धनौकेचं आरेखन केलं आहे. १६३ मीटर
लांब आणि १७ मीटर रुंद या विनाशिकेचं वजन ७ हजार ४०० किलो आहे. या युद्धनौकेवर अत्याधुनिक
शस्त्रास्त्र बसवण्यात आली आहेत.
****
पुढच्या वर्षी २१ मे ते ३१ मे दरम्यान पदवीसाठी
होणाऱ्या सामायीक विद्यापीठ प्रवेश परिक्षेसाठीची निवेदन प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या
फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष मामिदाला जगदेश
कुमार यांनी आपल्या ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. एकूण विषय आणि परिक्षेची
पद्धती पूर्वी सारखीच असेल. विद्यार्थी दोन भाषा आणि एक सर्वसाधारण चाचणी विषयासोबत अन्य सहा विषयांची निवड
करू शकतात, असंही त्यांनी
या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या चाचण्या इंग्रजी, हिंदी आणि मराठीसह
१३ भाषांमध्ये घेतल्या जातील.
****
माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
केल्याबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीमध्ये
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते हे
दोन्ही पुरस्कार डॉक्टर अशोक नांदापुरकर आणि डॉक्टर अनिरुध्द देशपांडे यांनी स्वीकारले.
या यशाबद्दल पुण्यात आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य
विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात २०१७
पासून आयुष उपचार पद्धतीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ.राज पाटील-गलांडे यांनी दिली आहे. या संस्थेच्या उस्मानाबाद,
तुळजापूर, उमरगा, परंडा,
कंळंब, भूम आणि वाशी इथल्या नागरिकांनी आयुष पॅथीचा
लाभ घ्यावा, असं आवाहन डॉ. गलांडे यांनी
केलं आहे.
****
औरंगाबाद-हैद्राबाद रेल्वेगाडी आजपासून पुढचे काही
दिवस अडीच तास उशीरा सुटणार आहे. दुपारी सव्वा चार वाजता सुटणारी
ही गाडी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल. करमाड ते बदनापूर स्थानकांदरम्यानच्या ट्राफिक ब्लॉकमुळे ही गाडी येत्या सात
जानेवारीपर्यंत दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून
तीन दिवस उशिरा धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
//**********//
No comments:
Post a Comment