Tuesday, 20 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 20 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २० डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातली कामं सरकारनं रोखल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आज विधानसभेत गदारोळ केला. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसर्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाच कामं रोखली होती, असा आरोप केला. आम्ही सूडाचं राजकारण करत नाही, विरोधकांवर अन्याय करणार नाही, आवश्यक ती कामं सुरू झाली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या मुद्यावरुन प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांनी व्यत्यय आणला, त्यामुळे सभागृहाचं कामकाज दोन वेळा स्थगित झालं होतं.

****

नागपूर सुधार प्रण्यासची साडेचार हेक्टर जागेचं मूल्यांकन ८३ कोटी असतांना नगरविकास विभागाने केवळ दीड कोटी रुपयात १६ जणांना ही जागा भाडेतत्वावर दिल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना सरकार न्यायालयीन कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे गोंधळ झाल्यानं विधानपरिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकुब झालं होतं.

****

दरम्यान, आज सकाळी विधिमंडळातल्या काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचा नेते आणि आमदार यावेळी उपस्थित होते.

****

नागपूर इथं विधानसभवनात राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यास वर्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. विधिमंडळ हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. विधिमंडळात विविध आयुधांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते. लोकहितासाठी विधिमंडळात कायदे केले जातात, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

****

राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या परवा झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. काही ठिकाणचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या १८ पैकी १४ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली असून, भाजपनं चार जागा जिंकल्या आहेत. तालुक्यातल्या कासोद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय याकडे, बोरगांव बाजार - सत्तार बागवान, सारोळा मोहन गायकवाड, खुल्लोड स्वाती बोराडे, रेलगांव - पंकज जैस्वाल, जलकी बाजार - ज्ञानेश्वर दांडगे, धोत्रा पद्माबाई जाधव, मोढा खुर्द लक्ष्मण कल्याणकर, बोरगाव कासारी - मीनाबाई जाधव, पिंपळगाव पेठ - दीलिप जाधव, पिंपलदरी पूजा मोहोर, तर जांभई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई शिंदे यांची निवड झाली आहे.

औरंगाबाद तालुक्यातल्या जांभळी ग्रामपंचायीत सरपंचपदी शिंदे गटाच्या शारदा कळसकर, हिरापूर शिंदे गटाच्या शारदा राठोड, तर बोकुड जळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिराबाई तरमळे यांचा विजय झाला आहे.

गंगापूर तालुक्यात पेंडापुर ग्रामपंचायतीत सरपंचपदी आरंभसिंग बैनाडे, बुट्टेवाडगाव- ज्ञानेश्वर तिवाडे, गवळी शिवरा- यमुनाबाई गवळी, सुलतानाबाद- अनिता गायके, शंकरपुर- करुणा पोळ, शिरसगाव- ज्ञानेश्वर शिंदे, तर मुद्देश वाडगावच्या सरपंचपदी  योगेश तारू यांची निवड झाली आहे.

बिडकीनच्या सरपंचपदी ठाकरे गटाचे अशोक धर्मे विजयी झाले.

बीड जिलह्यातल्या सुगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू शिंदे, सेलू आंबा मध्ये ललिताबाई औताडे, तर वाघाळा ग्रामपंचायतीत भाजपच्या सविता भगत सरपंचपदी विजयी झाले.

जालना जिल्ह्यातही निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून, तहसील कार्यालयासमोर विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत.

****

परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रशिक्षणा दरम्यान गैरहजर राहिलेल्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या तेरा जणांची मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतू काही कर्मचारी दोन वेळा प्रशिक्षण घेऊन शनिवारी निवडणूक कर्तव्यावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचं तहसिलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिलाक्रिकेट संघादरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला शेवटचा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत तीन - एक अशी विजयी आघाडी घेतली आहे .

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...