Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· नागपूर सुधार प्रन्यास भूखंड विक्री प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी;
विधान परिषद तहकूब तर विधान सभेतून विरोधकांचा सभात्याग.
· ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सर्वाधिक जागा जिंकल्याचा
दावा.
· औरंगाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी ईश्वर चिठ्ठीने निकाल; परतूर तालुक्यात दोन ठिकाणी
फेरमोजणी; परभणीत दगडफेकीत चार जण जखमी.
आणि
· ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ या योजनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील
‘अटल इनक्युबेशन सेंटर’चा समावेश
****
नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड विक्री प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ८३ कोटी रुपयांचे भूखंड अवघ्या २ कोटी रुपयांना
बिल्डरला वाटल्याबद्दल न्यायप्रशासनातील कामात हस्तक्षेप केल्याचा ठपका मुंबई उच्च
न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठेवल्याचा
आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणाचा पूर्ण
निकाल लागेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी
मागणी दानवे यांनी केली.
मात्र मुख्यमंत्र्यांनी असा कोणताही हस्तक्षेप केला नसून, न्यायालयानंही असा ठपका
ठेवलेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायालयाने या प्रकरणात
सरकारला बाजू मांडण्यास सांगितलं असून, सरकारने हे उत्तर न्यायालयात सादर केलं असल्याचं
फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले –
हे जे १६ भूखंड
आहेत, याचं नियमितीकरण हे १६ तारखेला रद्द करून तशा प्रकारचा रिपोर्ट देखील सबमिट झालेला
आहे. कोर्टानी ताशेरे ओढलेले नाहीयेत. ऑन रेकॉर्ड गिलानी कमिटीचा रिपोर्ट असतांना,
जर तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी हा निर्णय केला असता, तर ती चूक असती. ही केस सुरू
आहे. या ऑनगोईंग केसवर या ठिकाणी चर्चा होऊ शकते का? होऊ शकत नाही. तरीही सन्माननीय
विरोधी पक्ष नेत्यांनी चुकीच्या फॅक्टस् मांडल्यामुळे या ठिकाणी सगळ्या फॅक्टस् मांडलेल्या
आहेत. आणि कोर्टानी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातली कारवाई ही सरकारने पूर्ण केलेली
आहे.
मात्र या उत्तरानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं, उपसभापती नीलम गोऱ्हे
यांनी परिषदेचं कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित केलं.
विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित करत, माहितीच्या
मुद्याद्वारे उत्तर देण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी या विषयी उत्तर देण्यावर
विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेल्या उत्तरात आपल्यावरचे
सगळे आरोप फेटाळून लावत, आपण अधिकाराचा गैरवापर किंवा न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप
केलेला नाही, असं सांगितलं. ते म्हणाले –
सदर भूखंड ई डब्ल्यू
एस साठी राखीव ठेवावा अशी गिलानी समितीची शिफारस आहे. ही शिफारस न्यायालयाच्या विचाराधीन
आहे. न्यायालयाने अद्याप कुठलाही निर्णय दिलेला नाही. परंतू जेव्हा आमच्या लक्षात बाजू
आली, की गिलानी समिती आहे याच्यात, तिच्याही काहीतरी फाइंडींग आहेत, त्याचं काहीतरी
ऑब्जर्वेशन आहे, त्यांचे काहीतरी ओपिनियन आहेत, आणि म्हणून आम्ही एन आय टी च्या सभापतींच्या
शिफारसीप्रमाणे काम केलं. आणि एकनाथ शिंदे असं खोटं काम करणार नाही, बिलकुल करणार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर समाधान न झाल्यानं, विरोधी पक्षांचे नाना पटोले
यांच्यासह अनेकांनी हा मुद्दा लावून धरला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, विधीमंडळात त्यावर चर्चा होऊ शकत नाही, मात्र भुजबळांसारख्या
ज्येष्ठ सदस्याने मुद्दा मांडल्यामुळे हे स्पष्टीकरण दिल्याचं सांगितलं. त्यानंतरही
विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी अध्यक्षांनी फेटाळून लावत कामकाज पुढे चालू ठेवलं,
त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
****
विधानसभेचं कामकाज आज सकाळी दोन वेळा स्थगित करावं लागलं. विरोधी पक्षनेते अजित
पवार यांनी सरकारनं विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातली कामं रोखल्याचा आरोप
केला. या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केल्यानं, सभागृहाचं कामकाज दोन वेळा स्थगित
करण्यात आलं होत.
****
सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासंदर्भात तत्काळ बैठक घेऊन आवश्यक तेवढा
निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं.
पुण्यात भिडे वाडा या ठिकाणी हे स्मारक उभारण्याबाबत विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी
सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता.
दरम्यान, भिडे वाड्याची सध्या दुरावस्था झाली आहे, या वास्तूचं जतन करून राष्ट्रीय
स्मारक झालं पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केली आहे.
या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आढाव यांनी भिडे वाड्यासमोर उपोषण सुरू केलं आहे.
****
राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या परवा झालेल्या मतदानाची आज मोजणी झाली.
काही जागांचे निकाल अद्याप हाती येत आहेत. मात्र या निकालात भाजप आणि बाळासाहेबांच्या
शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी केला
आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते आज नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांसाठी
सरकारने गेल्या काही महिन्यात जे काम केलं, हा विजय त्याची पोचपावती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निकालाबद्दल मतदारांप्रती आभार
व्यक्त केले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या १८ पैकी १४ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने
बाजी मारली असून, भाजपनं चार जागा जिंकल्या आहेत. औरंगाबाद तालुक्यातल्या जांभळी ग्रामपंचायीत
सरपंचपदी शिंदे गटाच्या शारदा कळसकर, हिरापूर शिंदे गटाच्या शारदा राठोड, तर बोकुड
जळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिराबाई तरमळे यांचा विजय
झाला आहे.
आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले आणि बिडकीनच्या सरपंचपदी
ठाकरे गटाचे अशोक धर्मे विजयी झाले आहेत. जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गराडा, औरंगाबाद
तालुक्यात नायगाव तसंच पिंपळगाव पांढरी या तीन ठिकाणी उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने,
ईश्वरचिठ्ठीने निकाल काढण्यात आला.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने ४९ ग्रामपंचायतींवर
विजय मिळवला आहे. सुगाव इथं बंडू मारुती शिंदे, सेलू आंबा- ललिताबाई भगवान औताडे, वाघाळा
इथं भाजपच्या सविता भगत, येलडा इथं राजुबाई भानुदास करणल, नवाबवाडी इथं भाजपच्या कल्पना
गोदाम विजयी झाल्या.
उस्मानाबाद जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतींपैकी तुळजापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर
भारतीय जनता पक्षाचे तर उस्मानाबाद तालुक्यात संमिश्र पक्षीय उमेदवार निवडून आले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर आणि येडशी आंबेजवळगा इथं भाजपचे उमेदवार विजयी झाले. ढोकी
इथं काँग्रेस आणि उपळा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तर कावळेवाडी इथं
आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले.
जालना जिल्ह्यात भोकदरन, जाफ्राबाद, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या बहुतांश ग्रामपंचायतींवर
भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. घनसावंगी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना
ठाकरे गट तर जालना तालुक्यात शिवसेना शिंदे गट, बदनापूर आणि अंबड तालुक्यात भाजपा आणि
शिवसेना शिंदे गट, जवखेडा बुद्रूक आणि लोणी इथं भाजपचे उमेदवार विजयी झाले.
दरम्यान, परतूर तालुक्यातल्या वरफळ आणि देवळा इथं विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या
मतसंख्येत केवळ एका मताचा फरक असल्यामुळे या ठिकाणची परत मोतमोजणी करण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी इथं नवा मोंढा परिसरात मतमोजणीनंतर दगडफेक झाली. वाडी दमाई ग्रामपंचायतीच्या
मतमोजणीवरून हा प्रकार घडल्याचं सहायक पोलिस निरीक्षक बी बी पूंड यांनी सांगितलं. या
दगडफेकीत चार जण जखमी झाले असून, नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
****
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ या योजनेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘अटल इनक्युबेशन सेंटर’चा समावेश करण्यात
आला आहे. केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं याची घोषणा केली
असल्याची माहिती या केंद्राचे संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत
नवउद्योजकांना २० लाख रुपयांपर्यंत अनुदान किंवा ५० लाख रुपयापर्यंत गहाण विरहित कर्ज
दिलं जाईल अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
****
अमृतसर-नांदेड -अमृतसर या विशेष रेल्वे गाडीच्या २२ ते २४ डिसेंबर दरम्यान चार
फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. २२ आणि २३ डिसेंबरला ही रेल्वे गाडी अमृतसर स्थानकावरुन
सकाळी चार वाजून २५ मिनिटांनी सुटून नांदेड इथं दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून २०
मिनिटांनी पोहचेल. तर २३ आणि २४ डिसेंबर ला नांदेड स्थानकावरुन रात्री ११ वाजून १०
मिनिटांनी सुटेल आणि अमृतसर इथं तिसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहचेल.
****
No comments:
Post a Comment