Tuesday, 20 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या परवा झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. बीड जिलह्यातल्या सुगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू शिंदे, सेलू आंबा मध्ये ललिताबाई औताडे, तर वाघाळा ग्रामपंचायतीत भाजपच्या सविता भगत सरपंचपदी विजयी झाले.

वाशिम जिल्ह्यातल्या २८७ पैकी १८ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यात काँग्रेसनं सात, शिवसेना शिंदे गटानं तीन, तर ठाकरे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. तर पाच ग्रामपंचायती इतर पक्षांनी जिंकल्या.

****

जागतिक कृषी खाद्य प्रणालींना सातत्यानं वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येला अन्न पुरवण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तृणधान्य हा एक परवडणारा आणि पौष्टिक पर्याय आहे. २०२३ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करणारा ठराव संमत केला आहे. त्या पार्श्वभूमीवर तृणधान्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, कृषी मंत्रालयानं आज संसदेत सदस्यांसाठी तृणधान्य खाद्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे. पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर तृणधान्य उत्पादनाचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. तृणधान्य उत्पादन वाढीसाठी तसंच २०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी याचा उपयोग होईल असं कृषीमंत्री म्हणाले.

****

भारत एक मोठी निर्यात अर्थव्यवस्था बनेल आणि खुल्या तसंच कनेक्टेड इंटरनेट सेवेचा भारताला फायदा होईल, असं गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत गुगलच्या एक कार्यक्रमात ते काल बोलत होते. गुगलतर्फे स्टार्ट अप्ससाठी दिल्या जाणाऱ्या तीस कोटी अमेरिकी डॉलर्सपैकी एक चतुर्थांश निधी महिलांच्या नेतृत्वातील संस्थांमध्ये खर्च केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. पिचाई यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

****

अनावश्यक आणि कालबाह्य कायदे रद्द करण्यासाठीचं निरसन आणि सुधारणा विधेयक काल लोकसभेत सादर झालं. विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी हे विधेयक सादर केलं.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...