Thursday, 22 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.12.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 22 December 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      कोविडच्या नव्या उत्परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण -उत्सव काळात अधिक सतर्क राहण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं सर्व राज्यांना आवाहन

·      राज्यात वैद्यकीय यंत्रणा सज्ज असल्यानं घाबरून जाण्याचं कारण नाही- आरोग्य मंत्री तानाजी सावंत

·      कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करण्याची विधानसभेत विरोधी पक्षाची मागणी

·      राज्यात जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करता येणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण

·      अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा उल्लेख आल्याचा खासदार राहुल शेवाळे यांचा आरोप

·      किल्लारी भूकंपातल्या वंचित सर्व पात्र बाधितांचं पुनर्वसन करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

आणि

·      भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपासून दुसरा कसोटी क्रिकेट सामना

सविस्तर बातम्या

कोविडच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर आगामी सण -उत्सव काळात अधिक सतर्क राहण्याचं आवाहन, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. जगभरात चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत वाढत्या कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, काल दिल्लीत मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोविडची सद्यस्थिती, त्याच्या प्रसाराला प्रतिबंध, आणि कोविड व्यवस्थापन याबाबत चर्चा झाली. चीनमध्ये सध्या झालेल्या संसर्गाला, ओमायक्रॉनचा नवा अत्यधिक संसर्गजन्य अवतार बी एफ सेवन हा कारणीभूत असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं. देशात कोविड संक्रमित रुग्णांचे नमुने दररोज जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्याची सूचनाही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली. नवीन व्हेरियंट तयार झाला, तर त्याचा माग काढण्यासाठी ही तपासणी सहायक ठरेल, असं मांडवीय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित 'भारत जोडो यात्रेत कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असं देखील मांडवीय यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

****

दरम्यान, राज्यात कोविडच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण अद्याप सापडलेला नाही, तसंच वैद्यकीय यंत्रणा सज्ज असल्यानं घाबरून जाण्याचं कारण नाही, असा दिलासा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिला आहे. काल त्यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेऊन यंत्रणेचा आढावा घेतला, त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले...

 

जे काही सोशल मिडीयावर किंवा कुठल्या न्युज मध्ये दाखवत असेल की महाराष्ट्रामध्ये असा कोविडचा काही पेशंट सापडले, नवीन व्हेरीयंटचे, तर आत्तापर्यंत तसं आमच्या ऑफिशियली रेकॉर्डवरती कुठेही महाराष्ट्रामध्ये असा पेशंट सापडलेला नाहीये. आणि आता यावेळेस तसं घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. कारण कोविडचा डोस वन, डोस टू आणि त्याच्यानंतर साठ वर्षांवरील जो बुस्टर डोस आहे, तोसुद्धा आपण जवळपास साठ ते ६५ टक्के लोकांना दिलेला आहे. आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज्‌ असतील, मेडिसीन्स असतील, आणि आपल्या टीम्स असतील, त्या सगळ्या त्या त्या ठिकाणी तयारीत आहेत. आणि आज त्याचीच एक आढावा बैठक घेतली. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे लॅक्युना असतील, तेही त्यांना सांगितलं की दोन दिवसांमध्ये तुम्ही आमच्याशी कम्युनिकेट करा. त्या त्या ठिकाणी ते इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलीटी आम्ही ते प्रोव्हाईड करू.

****

दरम्यान, कोविडच्या जागतिक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन करण्याची सूचना, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल सदनात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या या सूचनेचं स्वागत करत, अशी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं. विधानसभेत या संदर्भात या दोन्ही सदस्यांमध्ये झालेल्या चर्चेचा हा संक्षिप्त अंश...

आज चायनामध्ये लॉकडाऊन करावं लागलंय. आता चीन असेल, अध्यक्ष महोदय जपान असेल, कोरिया, ब्राझील, या देशात नवीन व्हॅरियंट सापडतोय. चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हाय पॉवर कमिटी किंवा टास्क फोर्स आणि जगभरात काय काय केलं जातंय, याचा अभ्यास करण्यासाठी आपण काही समिती नेमणार आहे का?  एकंदरीतच कोविडच्या नवीन व्हॅरियंटचा प्रसार होऊ नये म्हणून आपण सगळेजण पक्ष बाजुला ठेवून, सर्वांनी एकत्र येऊन, विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

सन्माननीय विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा याठिकाणी मांडलेला आहे. जरूर या संदर्भात केंद्र सरकारशी समन्वय करण्यात येईल आणि आपण सुचवल्याप्रमाणे एखादी कमिटी किंवा टास्क फोर्स हा याठिकाणी तात्काळ आपण गठीत करू. जो बदलत्या परिस्थितीवर नजर ठेवून आपल्याला वेळोवेळी सूचना करेल आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू.

****

नागपूरच्या सुधार प्रन्यासच्या भुखंडप्रकरणी विरोधकांनी कालही गदारोळ करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विधान परिषदेत विरोधकांनी गोंधळ केल्यानं सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकुब करावं लागलं होतं. विधानसभेतही या मुद्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला.

****

राज्यात सर्वच जातींमधल्या सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सफाई कामगारांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसारच नियुक्त्या दिल्या जात आहेत. असं होत नसल्यास, लोकप्रतिनिधींनी ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी मागणी काल विधानसभेत विरोधी पक्षांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमीन इतर राज्यांना देणार नसल्याचा ठराव मांडणार असल्याचं सांगितलं, महाराष्ट्रात राज्य सरकारने असा ठराव केला तर विरोधी पक्ष पाठिंबा देईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं.

****

राज्यात जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करता येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात संजय शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या, आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या, मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक तसंच माध्यमिक शाळांना, सरसकट २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ३५० शाळा होत्या, मात्र अंमलबजावणीची वेळ आली तेव्हा शाळांची संख्या तीन हजार ९०० एवढी असल्याचं समोर आलं. त्यामुळे आर्थिक बोजा वाढल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, यापुढे फक्त स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सुरु करता येतील, अनुदानित शाळांना परवानगी मिळणार नाही, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. इंग्रजी भाषेचा पगडा दूर करुन यापुढे उच्चशिक्षण देखील मराठी माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी क्रमिक पुस्तकेही मराठीत भाषांतरित करण्यात येत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

****

महाविद्यालय परिसरात कॅफेटेरियावरील निर्बंध तसंच शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत दोन सचिवांची समिती तयार करण्यात येईल, असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. काल विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसंच उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर ते बोलत होते. अल्पवयीन मुलांकडून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करणं आवश्यक असून, त्याबाबत सरकारने काही उपाययोजना केल्यात का, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. अकोला, बीड सारख्या जिल्ह्यात महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियामध्ये मुलींसोबत घडलेले प्रकार दानवे यांनी, तर माटुंग्यात घडलेल्या प्रकाराकडे खापरे यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं.

****

अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा उल्लेख आल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. काल लोकसभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत शेवाळे यांनी अधिक माहिती दिली. या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास अहवाल, सीबीआयचा तपास अहवाल तसंच बिहार पोलिसांचा अहवाल यात तफावत आहे, या प्रकरणी सत्य माहिती समोर आणावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याचं शेवाळे यांनी सांगितलं. ते म्हणाले...

रिया चक्रवर्तीला सुशांतच्या मृत्यूपूर्वी जे कॉल आले होते, त्या कॉलच्या संदर्भातला उल्लेख, बिहारच्या जे इन्व्हेस्टिगेशन आहे, त्यामध्ये निदर्शनास आलेले आहेत. आणि ते कॉल एयु या नावाने आलेत. आता रिया चक्रवर्तीचे जी लीगल टीम आहे, त्यांनी एयु चा अर्थ अनन्या उद्‌धव असा सांगितला. परंतु मुंबई पोलिसांनी यासंदर्भातला कुठलाही खुलासा केलेला नाही. बिहार पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्यात एयु म्हणजे आदित्य उद्‌धव ठाकरे असा बिहार पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ होता अशी माहिती मला मिळालेली आहे. आणि अजूनपर्यंत सीबीआय नं या गोष्टीचा कुठलाही माहिती लोकांसमोर आणलेली नाहीये. आणि म्हणून काय माहिती आहे ही लोकांसमोर यावी या दृष्टीकोनातून माननीय गृहमंत्र्यांना मी विनंती केली.

 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, या मुद्यावर काहीही मत व्यक्त करण्यास नकार दिला. ते म्हणाले..

 

मी या व्यक्तीला काडीमात्र किंमत देत नाही. मला याच्यात जायचं नाही. काही काही लोकांबद्दल त्यांच्या पर्सनललाईफ मध्ये मला जायचं नाहीये. कारण माझे संस्कार नाहीत कोणाबद्दल वाईट बोलावं. किंवा कोणाच्याबद्दल असं वाईट पसरावं. म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथल्या शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिलांची छेडछाड केलेली छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांना निलंबित करण्यात येणार असून पोलिस निरीक्षकाची बदली करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

****

किल्लारी भूकंपातल्या सर्व पात्र बाधितांचं पुनर्वसन झालेलं असून, काही पात्र बाधित यापासून वंचित असतील तर त्यांचंही पुनर्वसन केलं जाईल, अशी माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सदस्य अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केलेल्या एका लक्षेवधीला उत्तर देतांना ते बोलत होते. पुनर्वसनासाठी ४५ हजार कोटींचा प्रस्ताव आहे. ७२६ गावांच्या पुनर्वसनासाठी निधी दिला असून पुनर्वसन करुन घरांचं वाटपही करण्यात आलं आहे. त्या गावांतील रस्ते इतर सोयी-सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, किल्लारी तालुका निर्मितीच्या मागणीसाठी काल किल्लारी आणि परिसरातल्या ग्रामस्थांनी लातूर - गुलबर्गा मार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं. तसंच किल्लारी बाजारपेठेत बंद पाळण्यात आला.

****

भारत आणि बांगलादेश यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून ढाका इथं खेळला जाणार आहे. सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या कसोटी मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

 

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवण्यात आली होती. ही योजना राबवण्यात उस्मानाबाद तालुक्याला प्रथम क्रमांक, कळंब तालुक्याला द्वितीय तर भूम आणि उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांना संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. बोडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

****

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी काल यासंदर्भात आढावा बैठक घेतली.

****

२२ व्या राष्ट्रीय वायू जीवशास्त्र परिषदेला हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं कालपासून प्रारंभ झाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या वतीनं ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं. या तीन दिवसीय राष्ट्रीय अॅरोबॉयलॉजी परिषदेत देशाच्या विविध भागातले संशोधक आपलं संशोधन मांडणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात एक जानेवारीपासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला हे अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या मांजरा नदीवर हे अभियान राबवलं जाणार असून, मांजरा नदी ही जवळपास महाराष्ट्रातून ७५० किलो मीटर वाहत जाते. जिल्ह्यात भूम, वाशी आणि कळंब तालुक्यातल्या एकूण ३० गावात हे अभियान राबवलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लातूर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एक जानेवारी पासून प्रायोगिक तत्वावर वाहतूक व्यवस्था बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातल्या प्रत्येक चौकातलं अतिक्रमण काढण्यात येणार असून, रिक्षा थांबे, बाहेर गावी जाणारी खासगी वाहणं, बस वाहतूकीसाठी जागा निश्चित करून देण्याची सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केली आहे.

****

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा तपास बंद करण्यासाठी पोलिसांनी पुण्याच्या न्यायालयात सादर केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं फेटाळून लावला. त्याचबरोबर काही मुद्यावर पुन्हा तपास करण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी करणार्या केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारपर्यंत सुनावणी घेण्याची मुभा उच्च न्यायालयानं दिली आहे. तोपर्यंत देशमुख यांच्या जामिनावर स्थगिती कायम राहणार आहे.

****

औरंगाबाद इथं जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात सेव्हस ईको अचिवर्स प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये स्टेपिंग स्टोन हायस्कूल चा संघ अव्वल ठरला. हा संघ फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईत होणाऱ्या राज्य पातळीवरच्या अंतिम फेरीत औरंगाबादचं प्रतिनिधित्व करेल.‌ या स्पर्धेदरम्यान प्रेक्षकात बसलेले विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनाही अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकांना पारितोषिकं देण्यात आली.

****

औरंगाबाद इथल्या गुजराथी कन्या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल शालेय विद्यार्थिनींसाठी एकपात्री नाट्यउतारा सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली. शहरातल्या वीस शाळांच्या ४० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभागी होऊन विविध नाट्यउतारे सादर केले.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...