Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 January
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ जानेवारी २०२३ सकाळी
७.१० मि.
****
·
केंद्र सरकारचा विमुद्रीकरणाचा निर्णय योग्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
·
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांसाठी केंद्र सरकारकडून नियमावली जारी
·
शतकोत्तर आठव्या भारतीय विज्ञान परिषदेला आजपासून नागपूर इथं प्रारंभ
·
समाजाच्या शेवटच्या पायरीवरील व्यक्तीला सक्षम करण्याचं उद्दीष्ट-भाजप अध्यक्ष
जे पी नड्डा
·
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनानंतरही मार्ड संघटना संपाच्या निर्णयावर कायम
·
मराठवाड्यात आयटी पार्क वाढवण्याबाबत सरकारने विचार करावा-विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांची मागणी
·
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना
अभिवादन
आणि
·
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा २५ वर्षांसाठी भैरवनाथ समुहाकडे
****
केंद्र सरकारने घेतलेला विमुद्रीकरण
अर्थात नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा, सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
यासंदर्भात दाखल विविध ५८ याचिकांच्या सुनावणीनंतर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने राखून
ठेवलेला निर्णय काल सुनावला, त्यावेळी या सर्व ५८ याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या.
न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर, न्यायमूर्ती बी आर
गवई, ए एस बोपण्णा, व्ही राम सुब्रमण्यम
यांनी विमुद्रीकरणाचा निर्णय वैध ठरवला, तर न्यायमूर्ती बी
व्ही नागरत्ना यांनी मात्र असहमतीचा निकाल
दिला. बहुमताचा निकाल वाचताना न्यायमूर्ती गवई यांनी,
काळाबाजार नष्ट करणं आणि दहशतवाद्यांना होणारा आर्थिक
पुरवठा रोखणं, यामुळे हा निर्णय घेतल्याचं नमूद केलं. या निर्णयापूर्वी सरकारची भारतीय रिझर्व्ह बँकेशी चर्चा झाली होती, तसंच विमुद्रीकरणाच्या
अधिसूचनेत कोणतीही त्रुटी आढळून आली नसून, रद्द नोटा आरबीआय
चलनात आणू शकत नाही, असं मतही न्यायालयानं व्यक्त केलं आहे.
****
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांसाठी केंद्र
सरकारने नियमावली जारी केली आहे. या कंपन्यांनी स्वयंनियामक तंत्र, खेळाडूंचं सत्यापन,
तसंच भारतातला कायमस्वरूपी पत्ता देण्याचा नियम बंधनकारक केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती
दिली. इंटरनेटच्या सुरक्षित आणि विश्वसनीय वापरासाठी अशा नियमांच्या आवश्यकतेवर त्यांनी
भर दिला.
****
शतकोत्तर आठव्या
भारतीय विज्ञान परिषदेला आजपासून नागपूरच्या राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज विद्यापीठात प्रारंभ होत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज सकाळी साडे दहा वाजता दूरदृश्य संवाद पद्धतीनं या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. ‘महिला
सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही
या वर्षीच्या भारतीय विज्ञान परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. महिलांना विज्ञान,
तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयात
शिक्षण आणि संशोधनाच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीनं या परिषदेत विचारमंथन
केलं जाणार आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं
केंद्र सरकार देशाच्या विकासाची नवीन गाथा लिहित असल्याचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद
इथं नड्डा यांच्या हस्ते प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या व्यक्तीला सक्षम करणं हा आपला उद्देश असल्याचं त्यांनी
सांगितलं. प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजनेमुळे देशातल्या अतिगरीबांचं प्रमाण एका
टक्क्यापेक्षा कमी झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं ते म्हणाले...
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ
भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी
यावेळी उपस्थित होते.
****
तत्पूर्वी चंद्रपूर इथंही नड्डा
यांनी जाहीर सभा घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेने मंदीच्या काळातही ब्रिटनला मागे टाकून
जागतिक क्र्मवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात
नवीन सरकार आल्यानंतर तीन लाख कोटीहून अधिक रुपयांची परदेशी थेट गुंतवणूक झाल्याचं
नड्डा यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल
केलेल्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा काल भारतीय जनता पक्षाच्या
वतीनं राज्यभरातून निषेध करण्यात आला. सिंधुदूर्ग, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, बारामती
आदी ठिकाणी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
****
आपल्या विविध मागण्यासाठी निवासी
डॉक्टरांची संघटना मार्डने कालपासून संप पुकारला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार
करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं,
निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. मोडकळीस आलेल्या वसतीगृहांची दुरुस्ती, वरिष्ठ
निवासी डॉक्टरांच्या तसंच इतर रिक्त जागांची भर्ती, तसंच महागाई भत्ता तत्काळ अदा करण्यात
यावा, आदी मागण्यांसाठी संप करण्यात आल्याचं संघटनेकडून कळवण्यात आलं आहे.
दरम्यान, संघटनेच्या विविध मागण्यांवर
राज्य सरकार सकारात्मक असून, अनेक मागण्या तत्काळ मंजूर करत असल्याचं वैद्यकीय शिक्षण
मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. संघटनेनं फार ताणून धरु नये, असं आवाहन करताना,
ते म्हणाले...
‘‘तुमच्या अर्ध्या मागण्या तर मी आत्ता मंजूर करतोय, तात्काळ मंजूर करतोय. हॉस्टेलचा
विषय आणि पाचशे कोटी रुपयांसाठी मी उद्या परवाच केंद्राकडे जातोय. दुरुस्तीसाठी बारा
कोटी रूपये आम्ही पी डब्ल्यू डी कडे दिलेले आहेत. त्याचंही चार आठ दिवसामध्ये टेंडर
निघेल दुरुस्तीचं. आम्ही सगळ्या गोष्टीसाठी पॉझिटीव्ह आहोत. परंतु फार आपणही ताणू नका.
काय असेल आमच्याशी बोला आणि विषय संपवा.’’
महाजन यांच्या आवाहनानंतरही मार्ड
संघटनेनं आपल्या भूमिकेवर ठाम राहत, संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल सायंकाळी
जारी केलेल्या पत्रात संघटनेनं आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचं
स्पष्ट केलं. औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत काल सकाळपासून
डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे.
****
मराठवाड्यात माहिती तंत्रज्ञान
- आयटी पार्क वाढवण्याबाबत सरकारने विचार करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सुक्ष्म,
मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्रात विदर्भ आणि मराठवाडा अतिशय मागे असल्याकडे त्यांनी
लक्ष वेधलं. मराठवाड्यातल्या प्रश्नांवर विधान परिषदेत आक्रमकपणे भूमिका मांडून जनतेला
न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचा दावाही दानवे यांनी यावेळी केला.
****
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील
मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याची निर्दोष मुक्ततेची मागणी करणारी याचिका
मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. २००८ मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा
मृत्यू झाला होता, तर शंभरावर लोक जखमी झाले होते. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती
प्रकाश नाईक यांच्या पीठासमोर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं याचिका फेटाळून लावली.
****
शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वातंत्र्यसेनानी
केशवराव धोंडगे यांच्या पार्थिव देहावर काल नांदेड जिल्ह्यात बहाद्दरपुरा इथं शासकीय
इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शासनाच्यावतीने
पुष्पचक्र अर्पण करून धोंडगे यांना श्रद्धांजली वाहिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाभरातले विद्यमान तसंच माजी लोकप्रतिनिधी
आणि नागरिकांनी उपस्थित राहून या ज्येष्ठ नेत्याला अखेरचा निरोप दिला.
****
सैन्य
दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच
राज्याच्या पोलीसांप्रति देखील आहे, असं राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन
दिनानिमित्त ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. पोलिसांनी
कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून,
राज्य तसंच देश अधिक सुरक्षित करावा, असं आवाहन राज्यपालांनी
यावेळी केलं.
राज्यात येत्या आठ तारखेपर्यंत
पोलीस दलाच्या वतीनं, पोलीस वर्धापन दिन कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने
उस्मानाबाद इथं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हा
पोलीस दलामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात पोलिस भरती प्रक्रिया
कालपासून सुरु झाली.
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस शिपाई
भरतीला काल औरंगाबाद इथं सुरुवात झाली. ३९ जागांसाठी पाच हजार ७२५ उमेदवारांनी अर्ज
केले आहेत. काल पाचशे उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलं होतं, १६७ उमेदवारांनी
मैदानी परीक्षा दिली.
परभणी जिल्हा
पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया
होत आहे. या जागांसाठी चार हजार ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
हिंगोली जिल्हा पोलिस दलातल्या
२१ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला काल सुरुवात झाली. काल सकाळी सात वाजल्यापासून
उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या ठिकाणी हजेरी लावली होती.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ साली झालेल्या अटकेच्या निषेधार्थ, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी
बीड जिल्ह्यातल्या परळी-गंगाखेड रस्त्यावरच्या धर्मापुरी फाटा इथं, राज्य मार्ग परिवहन
एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी आता राज ठाकरे यांना परळी न्यायालयाने
समन्स बजावलं असून, येत्या १२ जानेवारीला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती
आज साजरी होत आहे. यानिमित्तानं शैक्षणिक संस्थासह विविध संस्था संघटनांमधून विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
हिंगोली इथं मराठा सेवा संघ आणि
संलग्लित कक्षाच्या वतीने सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त
आजपासून राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेला सुरुवात होणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या सावित्रीबाई
फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे दिले जाणारे सेवा पुरस्कार काल प्रदान करण्यात आले.
डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार मुंबई इथले रविंद्र गोळे यांना, तर डॉ. रखमाबाई
राऊत सेवा पुरस्कार परभणी इथल्या श्रीलेखा वझे यांना, ज्येष्ठ प्रचारक शरदराव ढोले
आणि उद्योजक पुखराज पगारिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ढोकी
इथल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा जिल्हा मध्यवर्ती बँकेने २५ वर्षांसाठी
भैरवनाथ समुहाकडे दिला आहे. भैरवनाथ समूहाचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत आणि जिल्हा बँकेच्या
अधिकाऱ्यांनी काल कारखानास्थळी जाऊन ही कार्यवाही पूर्ण केली. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून
या कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देणार असल्याचा विश्वास शिवाजीराव सावंत यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
'हर घर नर्सरी' उपक्रमात सर्व
नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं
आहे. मराठवाड्यावर हरित आच्छादन वाढवण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या
संकल्पनेतून राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते काल
प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. येत्या पावसाळ्यात लोकसहभागातून मोठ्या
प्रमाणावर जिल्ह्यात वृक्षलागवड करण्याचा मानस असल्याचं, त्या म्हणाल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवी मंदीरात शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या काल चौथ्या दिवशी देवीची
सिंहासनावर मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली होती. तसंच काल
जलयात्रा सोहळा देखील पार पडला.
****
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत
काल नांदेड इथं हेल्मेट घातलेले दुचाकीस्वार तसंच सीटबेल्ट लावलेल्या चारचाकी चालकांचा
गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर-जज
यांच्या हस्ते या वाहनचालकांना सन्मानित करण्यात आलं.
****
बीड तालुक्यात झालेल्या १३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी झालेल्या
दैनंदिन खर्चाचे हिशोब उमेदवारांनी बीड तहसील कार्यालयातल्या खर्च पथकाकडे सादर करावेत,
अशा सूचना बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहेत.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन
टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाहिला सामना आज मुंबईत खेळला जाणार आहे.
संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment