Tuesday, 3 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ जानेवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

शतकोत्तर आठव्या भारतीय विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विज्ञान - तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित आहेत. यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना ‘महिलांच्या सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ अशी आहे.

****

भारताच्या पहिल्या शिक्षिका आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

चालू आर्थिक वर्षात गेल्या महिन्यापर्यंत रेल्वेनं माल वाहतुकीद्वारे सुमारे एक लाख २० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. रेल्वेनं ईझ ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सातत्यानं वाढ केली आहे तसंच अतिशय स्पर्धात्मक दरांमध्ये सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे ग्राहक केंद्री दृष्टिकोनातून व्यापार विकास केंद्रांच्या साहाय्यानं हे शक्य झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया प्रजासत्ताक, थायलंड आणि जपानमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल स्वयंघोषणा पत्राद्वारे नोंदवण्यासाठी एअर सुविधा पोर्टल कार्यान्वित करावं अशी विनंती आरोग्य मंत्रालयानं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला केली आहे. यासंदर्भातलं पत्र मंत्रालयानं काल जारी केलं.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या काल प्रिटोरिया इथं झालेल्या चौथ्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर चार गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघानं दिलेलं ८७ धावांचं लक्ष्य भारतानं १४ षटकं आणि चार चेंडूंमध्ये पूर्ण केलं. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.

//*********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...