आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ जानेवारी २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
कथित संभाव्य खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं मध्यरात्रीपासून बहात्तर तासांचा संप
पुकारला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, या संपामुळे औरंगाबाद
जिल्ह्यात लासूर स्टेशन
आणि सिद्धनाथ वडगाव इथला वीजपुरवठा विस्कळीत झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
देशातल्या पायाभूत सुविधा क्षेत्राला चालना देण्यासाठी
केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँकेनं विविध कर्ज करारांवर स्वाक्षऱ्या केल्या
आहेत. महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी सुधारणा, आसाममधील
३०० किलोमीटरहून अधिक रस्ते बांधणीसाठी ३० कोटी अमेरिकी डॉलर्सच्या कर्ज करारांचा यात समावेश आहे.
***
चर्मोद्योग निर्यात परिषदेचे राष्ट्रीय पुरस्कार काल
वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वितरीत करण्यात
आले. पादत्राणे आणि चर्मोद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीचं केंद्र
बनण्याची देशाची क्षमता आहे. सरकार आणि या उद्योग क्षेत्राच्या प्रयत्नांमुळे त्याला चालना मिळेल, असं मत गोयल यांनी व्यक्त केलं.
***
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात राष्ट्रगीत अवमान प्रकरणाची
सुनावणी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी येत्या १२ जानेवारीला न्यायालय
निकाल सुनावण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर असताना
एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असतानाच त्या व्यासपीठ सोडून निघून गेल्याचा आरोप
आहे.
***
यंदाचा आरती प्रभू पुरस्कार पुण्याच्या ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांना जाहीर
झाला आहे. कुडाळचे बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्यातर्फे हा पुरस्कार
दिला जातो. ११ हजार रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या चार फेब्रुवारीला कुडाळ
इथं हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
***
नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज नांदेडहून तिच्या नियमित वेळी सकाळी साडेनऊला
निघण्याऐवजी अडीच तास उशीरा, दुपारी बारा निघणार असल्याची
माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
//*********//
No comments:
Post a Comment