Monday, 20 February 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र 20 फेब्रुवारी 2023 सकाळी 11.00 वाजता

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. आज सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण उपस्थित केलं जाईल, असं आमदार अनिल परब यांनी काल सांगितलं. जुन्या याचिकांमध्ये नव्या याचिकेचाही समावेश केला जावा, अशी विनंती देखिल न्यायालयाला केली जाईल, असंही परब यांनी सांगितलं.

****

रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला २०२३-२४ या वर्षात तब्बल १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून राज्यातील १२३ रेल्वे स्टेशनचा अमृत स्टेशन म्हणून विकास केला जाईल. तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, ठाणे रेल्वे स्थानकांसह विविध स्थानकांचा चार हजार ९६२ कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

****

दरम्यान, रेल्वेनं महिनाभर चालणाऱ्या विशेष सुरक्षा अभियानाला काल सुरूवात केली. रुळावरून रेल्वे घसरणं, धोक्याच्या ठिकाणी सिग्नल मोडणं या आणि इतर स्वरुपातल्या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या घटना टाळण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत रेल्वे कार्यप्रणालीशी संबंधीत सर्व ठिकाणांच्या कार्यपद्धतींचा आढावा घेऊन, सुरक्षित कार्यपद्धती आणि सुरक्षेसाठीच्या देखभालीची सुनिश्चिती केली जाणार आहे.

****

कोलकत्त्यात ईडन गार्डन इथं झालेल्या रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल सौराष्ट्रनं पश्चिम बंगालचा नऊ गडी आणि एक दिवस राखून पराभव करत विजेतपद पटकावलं. दुसऱ्या डावात सहा तर सामन्यात ९ गडी बाद केलेल्या जयदेव उनाडकट याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. तर या हंगामात धावांची लयलूट केलेल्या सौराष्ट्रच्या अर्पित वसवदा याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

****

औरंगाबाद इथल्या सिध्दार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातून काल दोन वाघ आणि सहा काळवीट अहमदाबाद इथल्या कमला नेहरु प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले. यात दोन मादी वाघ तर, दोन नर आणि चार मादी काळविटांचा समावेश आहे.

//**************//

 


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...