Wednesday, 22 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक : 22.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date :  22 March 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २२ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सीजीएचएस - केंद्र सरकारी आरोग्य केंद्राचं उद्धाटन मांडवीय यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. सी जी एच एसद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा वाढवण्यासाठी आरोग्य मंत्रालय सतत प्रयत्नरत असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, खासदार इम्तियाज जली आणि सहकारमंत्री अतुल सावे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. देशातल्या सर्व सीजीएचएसचं डिजिटायझेशन करुन ही केंद्रं कागदविरहित करण्याचं काम आरोग्य मंत्रालय करत आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या या केंद्रासह देशात आता ॲलोपॅथिक सीजीएचएसची संख्या ३३६ झाली असल्याची माहिती भारती पवार यांनी यावेळी दिली. या आरोग्य केंद्रात छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या जिल्ह्यातल्या केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि माजी संसद सदस्यांना विविध प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहेत.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पद्म सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. सहा पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री सन्मान प्रदान केले जातील. ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, साहित्यिक सुधा मूर्ती यांच्यासह विविध मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.

****

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - पीएम-किसान या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांना, दोन लाख ४१ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकंदर सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातात, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात अवकाळी पावसामुळे आतापर्यंत ८० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक प्रभावित झालं आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू असून, आठवडाभरात पंचनामे पूर्ण होणं अपेक्षित आहे. मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. हवामान खात्याने २५ मार्च रोजी पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे.

****

मनुष्य आणि जंगलातील प्राणी यांच्या संघर्षाबाबत चौदा मार्गदर्शक नियमावलींचं प्रकाशन केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी काल केलं. मनुष्य आणि जंगलातील प्राणी यांच्यातला संघर्ष कमी करण्याबाबत कोणत्या गोष्टी उपयुक्त आणि परिणामकारकर होऊ शकतात, याबाबत विविध भागधारकांना माहिती व्हावी या उद्देशानं या मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आल्या आहेत. याचबरोबरच वनं आणि प्रसारमाध्यम क्षेत्र यांच्यातील सहकार्य, आरोग्यविषयक आणीबाणीबाबत करायच्या कृती आणि संभाव्य आरोग्यविषयक जोखीम यांच्यासह इतर विषयांवरही नियमावली तयार करण्यात आल्या आहेत.

****

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त, चैतन्याचा उत्सव, चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आज साजरा होत आहे. घरोघरी गुढ्या उभारुन नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत असून, ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे आणि डोंबिवली इथं शोभायात्रेत सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर इथं घरोघरी नागरिकांनी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं. पैठण इथंही शालिवाहनाच्या तीर्थस्तंभ परिसरात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था -सरो येत्या रविवारी २६ तारखेला वनवेब इंडिया-2 ही मोहीम सुरू करणार आहे. न्यू-स्पेस इंडिया लिमिटेड या कंपनीशी केलेल्या कराराअंतर्गत ब्रिटनचे ३६ व्यवसायविषयक उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. न्यू-स्पेस इंडिया ही इसरोची वाणिज्य विषयक शाखा आहे.

****

भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ या योजनेअंतर्गत अग्नीवीर म्हणून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदाच्या परिक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातल्या इच्छुक सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी येत्या एकतीस मार्चपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन नांदेड जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज चेन्नई इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.

//***********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...