Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२३ सायंकाळी
६.१०
****
· ६३वा
महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा; मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमातून
हुतात्म्यांना अभिवादन.
· पती-पत्नीच्या
नात्यात सुधारणेची शक्यता नसेल तर घटस्फोटासाठी सहा महिने थांबण्याची गरज नसल्याचा
सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.
· मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं
उद्घाटन.
आणि
· हिंदूहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ.
****
६३
वा महाराष्ट्र दिन आज उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त
राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी
महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अद्वितीय व्यक्तिमत्वांची जन्मभूमी-
कर्मभूमी आहे, तसंच ही संतांची, शूरवीरांची, कलाकार आणि विविध क्षेत्रात भरीव योगदान
देणाऱ्या व्यक्तीमत्वांची भूमी आहे असं त्यांनी आपल्या संदेशात नमूद केलं.
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांनीही राज्यातल्या जनतेला स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र
हे सामाजिक चळवळींचं माहेरघर असून, राज्यातल्या नागरिकांचं देशाच्या प्रगतीत मोलाचं
योगदान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र हे महान
संस्कृती आणि मेहनती लोकांचं राज्य असून, इथल्या जनतेनं विविध क्षेत्रांमध्ये देशाच्या
प्रगतीत भरीव योगदान दिल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
महाराष्ट्र
दिनाचं मुख्य ध्वजारोहण मुंबई इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झालं. राज्यपाल
बैस यांनी मराठी जनतेला मन:पूर्वक शुभेच्छा देत, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान
दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
दरम्यान,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईत हुतात्मा स्मारकावर जाऊन महाराष्ट्राच्या
निमिर्तीसाठी प्राण अर्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री फडणवीस
यांच्या हस्ते नागपूर इथं शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं.
मुंबईत
विधान भवन इथं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आलं.
विधान
परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून आदरांजली
अर्पण केली. हुतात्मा स्मारकाचं टपाल तिकीट जारी करण्यासाठी आणि मराठी भाषेला अभिजात
भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं डॉ गोऱ्हे यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री संदिपान भुमरे
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण
विकास आणि कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचं सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यात
‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, या माध्यमातून जिल्ह्यातल्या
७५ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती भुमरे
यांनी दिली. यावेळी भुमरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि विविध विभागाच्या
१७ उमेदावारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
****
बीड
इथे सहकार मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात
आलं. पोलिस दलाच्या वतीनं पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी पथसंचलनाचं
निरीक्षण केलं. विशेष पुरस्कार विजेते पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा पालकमंत्र्यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला. विविध पुरस्कारांचं वितरणही पालकमंत्री सावे यांच्या हस्ते
करण्यात आलं.
****
उस्मानाबाद
इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्र्यांनी
हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून महाराष्ट्राच्या स्थापनेकरता बलिदान देणाऱ्या
हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
नांदेड
इथं छत्रपती शिवाजी महाराज पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांनी पोलिस संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना
स्वीकारली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं, महाजन
यांनी सांगितलं. ते म्हणाले –
खरं
म्हणजे गेल्या महिनाभरामध्ये निसर्गाची खूप अवकृपा झालेली आहे. शेतकरी अडचणीत आहे.
गारपीट चाललेली आहे, वादळ चाललंय. पाऊस चालला आहे. दररोज कुठे न कुठे काही ना काही
घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पण निश्चित सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभं आहे. आम्ही सगळे मंत्री बांधावर जाऊन, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सगळी
पाहणी करतोय. आपण बघितलं असेल गेल्या महिन्यात मी नांदेडला, लातूरला आलो होतो. त्याची
मदत जवळपास अकरा कोटी रूपये हे सगळे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेले आहेत. त्यांनी सगळ्या
शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ती रक्कम टाकलेली आहे. काही अंशी काही राहिलेले असतील, मला
वाटतंय दोन-चार-पाच दिवसांमध्ये ती रक्कम जाईल.
****
हिंगोली
इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र
दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हिंगोली जिल्ह्याच्या विकासात शासन स्तरावरून
सातत्याने उपाययोजना केल्या जात असून, विकास कामांमध्ये कुठलाही गतिरोध येऊ देणार नाही,
असं आश्वासन सत्तार यांनी यावेळी दिलं.
****
जालना
इथे पोलिस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते, परभणी इथे प्रियदर्शनी
इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते,
तर लातूर इथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
पती-पत्नीच्या
नात्यात सुधारणेची शक्यता नसेल तर घटस्फोटासाठी सहा महिने थांबण्याची गरज नसल्याचं
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. घटस्फोटासंदर्भात दाखल एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान
न्यायालयाच्या घटनापीठाने, संविधानाच्या अनुच्छेद १४२ च्या तरतुदींचा वापर करून सर्वोच्च न्यायालय ही मुदत
आपल्या अधिकारात माफ करू शकत असल्याचं सांगितलं. सध्याच्या कायद्यानुसार,
पती-पत्नीला घटस्फोट घ्यायचा असल्यास कौटुंबिक न्यायालयाकडून पुनर्विचारासाठी सहा महिन्यांचा
वेळ दिला जातो.
****
महाराष्ट्र
दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आज ऑनलाईन पद्धतीने राज्यभरात आपला दवाखाना
तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन झालं. राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली, यामध्ये छत्रपती
संभाजीनगर इथले पाच आपले दवाखाने, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.
धाराशिव
जिल्ह्यातही आज आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ झाला. या दवाखान्या मध्ये सर्व उपचार
मोफत मिळणार असून, गर्भवतींसंदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात
प्रत्येक तालुक्यात एक आपला दवाखाना सुरु होत आहे.
जालना
जिल्ह्यात २० शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसंच आठ ‘आपला दवाखाना’ कार्यान्वित करण्यात
येत आहेत.
लातूर
जिल्ह्यात रेणापूर इथं नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राचं उद्घाटन झालं. जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी .पी . यावेळी उपस्थित होते.
****
मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण तसंच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे
स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. प्रसिद्ध मराठी अभिनेते
मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. सध्या मुंबई-ठाणे-पुणे
अशा १०० शिवनेरी ई बस धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. एसटीने जास्तीत जास्त
गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
भिवंडी
इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबाला पंतप्रधान सहायता निधीतून दोन लाख रुपये तर
जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, जखमींच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना
केली.
दरम्यान,
या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता या दुर्घटनेतल्या
मृतांची संख्या ९ झाली असून त्यात सहा पुरुष, दोन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे.
****
जी-ट्वेंटी
परिषदेच्या ‘जागतिक सर्वसमावेशक आरोग्य’ या विषयावरील दोन दिवसीय बैठकीला आज प्रारंभ
झाला. यजमान भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीस लक्षद्वीपच्या बंगारम
बेटावर सकाळी सुरूवात झाली. शेतीची सुधारित पद्धत, पौष्टिक आहार, आरोग्यदायी खाण्याच्या
सवयी आणि पर्यावरणपूरक - शाश्वत अन्न उत्पादनांच्या संधींवर काम करणं, या मुद्यांवर
बैठकीत चर्चा होत आहे. आरोग्याच्या सर्वच बाबी महत्त्वपूर्ण असून शारीरिक, मानसिक आणि
भावनिक आरोग्याच्या परस्परसंबंधांवर चर्चेत प्राधान्य दिलं जाणार आहे.
****
आ.य.पी.एल.
क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांदरम्यान सामना
होणार आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुलावर संध्याकाळी साडेसात वाजता,
सामन्याला सुरुवात होईल.
****
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आजपासून चार दिवस जोराचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका
ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment