Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ मे २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्यात ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त
विविध कार्यक्रमांचं आयोजन, एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेच्या समर्थनार्थ देशभरातल्या सर्व राजभवनांमध्ये सर्व राज्यांचे स्थापना दिन साजरे करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
·
राज्यात आजपासून आपला दवाखाना सुरु होणार
·
राज्यातल्या कृषी उत्पन्न
बाजार समित्यांच्या
निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांना
संमिश्र यश
·
आकाशवाणीवरील शंभराव्या मन की बातच्या भागाचं श्रवण करणाऱ्या देश- विदेशातील जनतेचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्याकडून
आभार
·
राज्य शासनाच्या वतीनं आजपासून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध
·
मराठवाड्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस
·
महाविकास आघाडीची आज मुंबईत वज्रमूठ सभा
·
आशिया बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीला अजिंक्यपद
आणि
·
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज तसंच मुंबई इंडियन्स संघांचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
****
राज्याचा ६३
वा स्थापना
दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी आज सकाळी मुंबईत हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्मायांना आदरांजली वाहिली.
‘महाराष्ट्र दिना निमित्तानं राज्यभर ध्वजारोहणासह
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा सोहळा
देशभरातल्या राजभवनांमधेही साजरा
केला जाणार आहे. देशातल्या सर्व राज्यांचे स्थापना दिन सर्व राज्यांमधे
साजरे
करावे, असं केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांना सांगितलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेच्या समर्थनार्थ हा निर्णय
घेण्यात
आला असून, २०
राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांनी तो स्वीकारला आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र
आणि गुजरातचा स्थापना दिन आज सर्व
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजभवनांमधे साजरा करण्यात येईल. उभय राज्यातल्या
सोहळ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आज ऑनलाईन पद्धतीनं राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन
होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या, पाच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
आपला दवाखाना, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातही आज आपला दवाखाना
योजनेचा शुभारंभ होणार आहे. या दवाखान्या मध्ये सर्व उपचार मोफत मिळणार असून, गर्भवती
माता संदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. आरोग्य मंत्री. डॉ. तानाजी सावंत
यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात
एक आपला दवाखाना सुरु होणार आहे.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामात बलिदान
दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करून, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती
व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं, आज मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सर्व जिल्ह्यात ध्वजारोहणानंतर
प्रभात फेरी काढून, मुक्तीसंग्राम लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात
येणार आहे.
****
महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून राज्य पर्यटन विकास महामंडळानं, राज्यात ७५ स्थळांच्या
यात्रेची विशेष योजना जाहीर केली आहे. या यात्रेला आजपासून सुरुवात होत असून, राज्यातले
सहा जागतिक वारसा स्थळं, गड किल्ले, व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री तसंच सातपुडा पर्वत रांगा, लोणार सरोवर, कळसूबाई
शिखर, सांदण दरी, अजिंठा आणि वेरुळ लेण्या
आदी स्थळांची सफारी करता येणार आहे. या योजनेत पर्यटकांना निवास, भोजन आणि मूलभूत सुविधा प्राप्त होणार
आहेत.
****
राज्यातल्या निवडणूक झालेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा
निकाल काल जाहीर झाला, तर काही ठिकाणी मतदान झालं. निकाल लागलेल्या बाजार समित्यांमध्ये सर्व प्रमुख राजकीय
पक्षांनी संमिश्र यश संपादन केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
फुलंब्री, लासूर, गंगापूर बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीचा विजय झाला.
फुलंब्री बाजार समितीत भाजप शिंदे गटानं १८ पैकी १४ जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीला
एक जागा जिंकता आली. लासूर स्टेशन बाजार समितीत आमदार प्रशांत बंब आणि रमेश बोरनारे
यांच्या शेतकरी बळीराजा विकास पॅनलचे १४, तर शिवसेना ठाकरे गटाचे दोन उमेदवार विजयी
झाले. गंगापूर बाजार समितीतही शेतकरी बळीराजा विकास पॅनलनं १८ पैकी १३ जागांवर विजय
मिळवला.
जिल्ह्यात पैठण
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल ९४ पूर्णांक ८९ शतांश टक्के, तर पाचोड बाजार
समितीसाठी सुमारे ९४ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. याठिकाणी
आज मतमोजणी होणार आहे.
जालना
जिल्ह्यातल्या अंबड, आष्टी बाजार समितीवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. अंबडमध्ये आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्त्वात
भाजपाचे १८ पैकी १५ उमेदवार विजयी झाले. आष्टी बाजार समितीवर भाजपाचे १८ पैकी १६
उमेवार विजयी झाले. परतूर बाजार समितीवर भाजपानं आमदार बबनराव लोणीकर यांच्या
नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत महाविकास
आघाडी करत विजय मिळवला आहे. घनसावंगी बाजार समितीत आमदार
राजेश टोपे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले. मंठा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे १२ तर भाजपा
आणि शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार विजयी झाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास
परिवर्तन पॅनलनं १६, तर शेतकरी विकास पॅनलनं दोन जागा
जिंकल्या. कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलनं १२ जागा
जिंकल्या.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी आणि
सोनपेठ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा विजय झाला.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव बाजार
समितीत आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाने विजय मिळवला. पाटोदा बाजार समितीनं सुरेश
धस गटानं १७ पैकी १२ जागांवर, तर आमदार बाळासाहेब आजबे गटानं पाच जागांवर विजय मिळवला.
लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी
पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं, तर पाच बाजार समित्यांवर भाजपनं विजय मिळवला. निलंगा बाजार समितीत भाजप - शिवसेना युतीनं सर्व
१८ जागा जिंकल्या. देवणी इथं १८ पैकी १६ जागांवर भाजप शिवसेना युतीनं, तर दोन जागांवर
महाविकास आघाडीनं विजय मिळवला. औराद शहाजनी बाजार समिती भाजप महायुतीनं १८ पैकी १६
जागा जिंकल्या. रेणापूर बाजार समितीत महाविकास आघाडीनं सर्व १७ जागा जिंकल्या. जळकोट
बाजार समितीत महाविकास आघाडीनं १८ पैकी १५ जागांवर, तर अहमदपूर बाजार समितीत १८ पैकी
१३ जागांवर विजय मिळवला.
नांदेड जिल्ह्यात नांदेड कृषी
उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीनं १७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली.
****
आकाशवाणीवरील मन की बात च्या शंभराव्या भागाचं श्रवण करणाऱ्या देश- विदेशातील जनतेचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. जनतेनं दाखवलेल्या उत्साहामुळे
आपण भारावून गेल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. कार्यक्रम
ऐकतांनाची आपली छायाचित्र नमो ॲप किंवा एमकेबी हंड्रेड डॉट नरेंद्र मोदी डॉट इन या
लिंकवर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
दरम्यान, काल मोदी यांनी आपल्या
मन की बात या जनतेसोबतच्या विशेष संवाद कार्यक्रमाच्या १०० भागात देशवासियांनी केलेल्या
सेवेचा आणि त्यांच्या सामर्थ्याबाबत माहिती दिली. मन की बातच्या, आतापर्यंतच्या
भागात संवाद साधलेल्या काही नागरिकांशी, पंतप्रधानांनी या भागातही
संवाद साधत, सेल्फी विथ डॉटर, स्वच्छ भारत
अभियान, हर घर तिरंगा, आदी विषयांवर चर्चा
केली.
देशभरात ठिकठिकाणी सार्वजनिक
स्वरुपात लोकांनी मोठ्या संख्येनं, मन की बातचा कालचा शंभरावा भाग ऐकला. मुंबईत विलेपार्ले इथं केंद्रीय सहकार
आणि गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी, मन की बातचा शंभरावा भाग ऐकला.
स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत
शिकागो इथल्या विश्वधर्म संमेलनातल्या भाषणातून, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन
बदलला होता; त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे गौरवोद्गार,
राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. मुंबईत राजभवनात झालेल्या मन की बात सार्वजनिक श्रवण
कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार,
'डिक्की'चे संस्थापक मिलिंद कांबळे, राज्यातले पद्म पुरस्कार विजेते, मन की बात कार्यक्रमामध्ये
पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातले युवक, विद्यार्थी तसंच नागरिक हे विशेष निमंत्रित
म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधानांनी मन की बातच्या
माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रयोगशील लोकांना समोर आणून इतरांना प्रेरणा देण्याचं
काम केलं, अशी प्रतिक्रिया डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली. ते म्हणाले…
‘‘आज राजभवनमध्ये प्रधानमंत्री
यांच्या मन की बात चा जो शंभरावा कार्यक्रम आहे, तो ऐकण्याचा योग आला. त्या कार्यक्रमामध्ये
त्यांनी शंभराव्या एपिसोडचा प्रवास सगळा सांगितला. या कार्यक्रमामधून प्रधानमंत्री
यांनी ग्रामीण भागातील जे अतिशय चांगले प्रयोग करणारे जे लोक आहेत, इनोव्हेटर्स आहेत,
किंवा ज्यांना अनसंग हिरोज् असं म्हटलं जातं, अशा सगळ्यांना जनतेच्या समोर त्यांच्या
कार्याला आणणं, त्यातून लोकांना प्रेरणा देणं, हे खूप मोठं काम या मन की बात मधून सुरू
आहे.’’
मन की बातमध्ये हिवरे बाजारच्या पाणी व्यवस्थापनाची गाथा पंतप्रधानांनी
सांगितली, याबद्दल या गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी या शब्दांत आपल्या भावना
व्यक्त केल्या….
१६ एप्रिल २०१६ ला हिवरे
बाजारच्या पाणी व्यवस्थापनावर लोकसहभाची चर्चा त्यांनी मन की बात मध्ये केली होती.
खरं म्हणजे आज राष्ट्र उभारणीमध्ये छोटी छोटी माणसं जे गावामध्ये, शहरांमध्ये आपापल्या
क्षेत्रात काम करतात, त्यांच्या कामावर जर चर्चा झाली, तर एक मोठी चळवळ निर्माण होऊ
शकते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय
जनता पक्षाच्या वतीनं तीनशे एक्कावन्न ठिकाणी, मन की बातचा शंभरावा भाग सार्वजनिकरित्या
ऐकवण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते. सहकारमंत्री अतुल सावे यांनी, पूर्वांचल वसतीगृह इथं हा भाग ऐकला. गरवारे
कम्युनिटी सेंटर इथं, अनेक नागरिकांनी मन की बातचा शंभरावा भाग सामुहिकपणे ऐकला.
जालना शहरात गोपीकिशननगर आणि
मुक्तेश्वरद्वार सभागृहात, मन की बातचं थेट प्रसारण करण्यात आलं. रेल्वेराज्यमंत्री
रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद
साधतात, ही भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण
झाल्याचं, दानवे म्हणाले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतल्या विजेत्यांना,
दानवे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं.
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात भारतीय
जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे माजी राज्य अध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे यांनी, तर आकाशवाणी
उस्मानाबाद केंद्रात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी, मन की बातचा शंभरावा भाग ऐकला.
या भागानिमित्त धाराशिव जिल्ह्यात येडशी
इथं १०० गायींचं पूजन तसंच मन बात कार्यक्रमाच्या सार्वजनिक श्रवण कार्यक्रमाला नागरिकांचा
चांगला प्रतिसाद मिळाला.
नांदेड जिल्ह्यात मन की बात कार्यक्रमाचं
एक हजार ठिकाणी सार्वजनिक प्रसारण करण्यात आलं. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी
पावडेवाडीत जनसमुदायासमवेत हा भाग ऐकला.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं खोलेश्वर माध्यमिक
शाळेत, आमदार नमिता मुंदडा, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत, मन की
बातचा शंभरावा भाग ऐकण्यात आला.
****
राज्य शासनाच्या वतीने आजपासून
सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातल्या
श्रीरामपूर तालुक्याच्या नायगाव इथं, राज्यातल्या पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वाळू विक्री ऑनलाइन प्रणालीचं लोकार्पण
होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी
सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
****
मराठवाड्यात कालही अनेक भागात
अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात सिल्लोड, गंगापूर, सोयगाव परिसरात
जोरदार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर
इथं काल मेघगर्जनेसह पाऊस पडला. हिंगोली शहरासह जिल्ह्यात काल पाऊस झाला. कनेरगाव नाका
परिसरात गारपीट झाली.
दरम्यान, मराठवाड्यात चार मे
पर्यंत अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे.
मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल मैदानाबर सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे.
****
भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक
साईराज रंकीरेड्डी या बॅडमिंटन पटूंच्या जोडीने आशिया बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद
पटकावलं आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या जोडीचा १६-२१, २१-१७, आणि
२१-१९ असा पराभव केला.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई
सुपर किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. चेन्नई संघानं प्रथम फलंदाजी करत चार गडी
गमावत दोनशे धावा केल्या, पंजाब संघानं सहा गडी गमावत अखेरच्या चेंडूवर हे लक्ष्य साध्य
केलं.
या
स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात, मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्स संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्स संघानं निर्धारित २० षटकात सात बाद २१२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत मुंबई इंडियन्स संघानं २० षटकात तिसऱ्या चेंडूवर २१४ धावा
करुन विजय मिळवला.
****
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी
शासन स्तरावरून सर्वोतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. औसा तालुक्यात टेंबी इथं वीज कोसळून मरण पावलेले
शौकत इस्माईल यांच्या कुटुंबाची महाजन यांनी काल भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जालना
जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या कोल्हापूर इथं अवकाळी पावसामुळे नुकसान
झालेल्या पिकांची पाहणी केली.
****
No comments:
Post a Comment