Wednesday, 24 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 24.05.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 May 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ मे  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे निकाल जाहीर;ठाण्याची करिश्मा संखे देशात पंचविसावी तर महाराष्ट्रातून प्रथम

·      राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

·      येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्व शासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश

·      दोन हजाराच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात

·      औरंगाबाद इथं मृत सफाई कामगारांच्या कुटूंबाला दहा लाख रुपये मदतीचे धनादेश प्रदान

·      सिंदखेडराजाजवळ काल झालेल्या बस आणि कंटेनर अपघातातील मृतांचा आकडा नऊवर

·      हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे राजेश पाटील विजयी

आणि

·      प्ले- ऑफ फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलच्या अंतिम फेरीत दाखल

 

सविस्तर बातम्या

लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या नागरी सेवा परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये इशिता किशोरनं देशातून प्रथम, गरिमा लोहियानं द्वितीय तर उमा हरातीनं तृतीय क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्रातून करिश्मा संखे हिनं पहिला क्रमांक मिळवला असून, ती देशात पंचविसाव्या क्रमांकावर आहे.

या परीक्षेत एकूण नऊशे तेहतीस उमेदवार उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी तीनशे पंचेचाळीस उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील तर ९९ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आहेत. दोनशे त्रेसष्ट इतर मागासवर्गीय, एकशे चोपन्न अनुसूचित जातीचे आणि बहात्तर उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातले आहेत. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून यशस्वी झालेल्या नऊशे तेहतीस उमेदवारांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तरहून जास्त उमेदवारांचा समावेश आहे.एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी सुमारे बारा टक्के उमेदवार महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील यशस्वी उमेदवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं आहे.

****

राज्यात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या विस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक गुरुबीर पाल सिंग यांनी काल मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लष्करी शिस्त आणि देशप्रेम अंगी बाणवणाऱ्या एनसीसी मध्ये सहभागासाठी राज्यातल्या तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर असतो, असं सांगत, राज्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र एनसीसीची विद्यार्थी संख्या वाढवण्याचं नियोजन आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यातल्या सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट आणि बूट मोजे असा विद्यार्थ्यांचा तर त्याच रंगसंगतीत विद्यार्थिनींचा गणवेश असेल. काही शाळांनी या वर्षी गणवेशाची मागणी कंत्राटदारांकडे नोंदवली असल्याने, अशा शाळांचे विद्यार्थी तीन दिवस शाळेने ठरवलेला तर उर्वरित तीन दिवस राज्य सरकारने ठरवलेला गणवेश घालतील, असं केसरकर यांनी सांगितलं. खासगी शाळांनीही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत विचार करावा, असं आवाहन केसरकर यांनी केलं. ते म्हणाले....

Byte…

खासगी शाळांनी खरं आता  याचा विचार केला पाहिजे की

 आम्ही या खासगी शाळा काढल्या १०० टक्के पगार आपण शासनाकडून घेतो , इतर खरच आपण शासनाकडून घेतो परंतु त्या शासकीय शाळा नसल्यामुळे ती मुलं याच्यापासून वंचित होतात. याचा विचार खासगी शाळांनी कधी तरी केलाच पाहिजे, असं मलं वाटतं. शेवटी शिक्षणासाठी तुम्ही या संस्था स्थापन केलं नं . मग त्या मुलांचा तुम्ही विचार करणार नाहीत का, कारण त्या जर गवरमेंट स्कूल असत्या तर त्या मुलांना सुद्धा युनिफॉर्म मिळणार. त्या मुलांना आपण मोफत पुस्तकं देतो पण युनिफॉर्म देऊ शकत नाही, इतर फॅसिलिटिस त्यांना देऊ शकत नाही, त्यांना लॅबस् देऊ शकत नाही, याच्यासाठी खासगी शाळांचे चालक महाराष्ट्राच्या मुलांचं हिताच्या दृष्टीने पुढे येणार का , ते जर स्वत: हून पुढे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि नाही आले तर मग काय निर्णय घ्यावा लागेल.., शेवटी मुलांचं हित हे शिक्षणा मधे सर्वोच्च असतं.

****

लोकसभेचे माजी अध्यक्ष तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचं, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोशी यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना सोमवारी सायंकाळी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत

****

आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी कार्यरत जी - ट्वेंटी कार्यगटाची दुसरी बैठक कालपासून मुंबईत सुरू झाली. सर्जनशील निधी यंत्रणेची तपासणी करण आणि संधी ओळखून विशिष्ट समुदायांवरील आपत्तीचा प्रभाव कमी करणं, हा या बैठकीचा उद्देश आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी आणि २० देशांतील सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या प्रतिनिधींनी काल सायंकाळी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं.

****

दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला देशभरातल्या बँकांमध्ये कालपासून सुरुवात झाली. बदलल्या जाणाऱ्या नोटांचा दैनंदिन हिशोब ठेवण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं सगळ्या बँकांना दिले आहेत. याशिवाय दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेचा हिशोबही ठेवला जाणार आहे. केंद्र सरकारनं २०१६ मध्ये नोटबंदी केल्यानंतर नव्यानं चलनात आणलेल्या या नोटा, चलनातून मागे घेत असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं गेल्या शुक्रवारी केली होती.

****

महाविकास आघाडीत एकजूट राहील आणि ती कायम असावी, अशीच आपली भूमिका असल्याचंही विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीसंदर्भात बोलताना, सूड भावनेतून तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठीक असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले...

Byte…

माझं याबद्दल एवढच म्हणणं आहे की, द्वेष भावनेतनं राजकीय सूड बुद्धीतनं, काही वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कुणाला बोलवण्यात येऊ नये. काही त्यांना कुठे  एखादा क्ल्यू मिळाला  आणि त्या च्याबद्दल त्यांना काही नोटीस काढावी लागली, तर  तो काढण्याचा त्यांचा अधिकार आहे.

****

पंढरपूर मंदिराच्या ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या तसंच अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या ३६८ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने, राज्यातल्या मोठ्या गर्दीच्या मंदिरांचं डिजिटल मॅपिंग करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

****

यावर्षी ‘हरित वारी स्वच्छ वारी या संकल्पनेवर आषाढी वारीचं नियोजन करण्यात येणार असून, महिला वारकऱ्यांना मूलभूत तसंच आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. पालखी मार्गावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहा हजार वृक्ष लागवड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला वारकऱ्यांना हिरकणी कक्षही उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वामी यांनी यावेळी दिली.

****

अमरावती जिल्ह्यातलं श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथून माता रुक्मिणीची पायदळी वारी पालखी आषाढी एकादशी करता पंढरपूरकडे काल मार्गस्थ झाली. या पालखीचं हे चारशे एकोणतिसावं वर्ष आहे. कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचं माहेर असून पंढरपूरमध्ये या पालखीचा विशेष मान असतो.

****

ड्रेनेज लाईन मधला गाळ कचरा काढण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका आता रोबोटिक स्कॅव्हेंजर इक्विपमेंट हे आधुनिक यंत्र वापरणार आहे. महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्यासमोर काल या यंत्राचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. हे यंत्र ड्रेनेजमधला गाळ काढण्याचं काम मानवविरहित पद्धतीनं करतं, यामुळे ड्रेनेजमधल्या विषारी वायूमुळे होणारी जीवितहानी टाळता येईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. केरळमधल्या चार तरुण अभियंत्यांनी जेन-रोबोटीक्स या त्यांच्या स्टार्टअप उद्योगातून हे यंत्र तयार केलं आहे.

दरम्यान, शहरातल्या सलीम अली सरोवर परिसरात ड्रेनेज पाईप दुरुस्त करताना चार मजुरांचा आठ मे रोजी मृत्यू झाला होता, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम.वेंकटेशन यांनी काल मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वेंकटेशन यांच्या हस्ते त्या कुटुंबांना देण्यात आले.

****

हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर यांची, तर उपसभापती पदासाठी काँग्रेसचे अशोक सिरामे यांची निवड झाली आहे. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात काल ही निवड प्रक्रिया झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जवळाबाजार बाजार समितीच्या सभापतीपदीसाठी शिवसेनेचे शिवाजी आप्पा भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ काल सकाळी झालेल्या बस आणि कंटेनरच्या अपघातातील मृतांचा आकडा नऊवर पोहचला आहे. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, या दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत तसंच जखमी प्रवाशांना शासकीय खर्चानं योग्य ते वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यातल्या वेरूळ इथल्या डमडम तलावामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. संकेत बमणावत आणि आयुष नागलोद अशी या दोघांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात काल एकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. निवळी खुर्द शिवारात झालेल्या या दुर्घटनेत अन्य एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****

ग्रामीण भागात पशुधन विकास अधिकारी पशुधनाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सेवा देत असल्याचं, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशूंचे निदान करण्यासाठी मेटल डिटेक्टर तसंच विविध प्रकारच्या साहित्याचे वाटप काल करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या कार्यक्रमात नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, नायगाव, मुखेड आणि कंधार या सात तालुक्यातल्या ६२ पशुवैद्यकीय दवाखान्यांना मेटल डिटेक्टर तसंच १०१ पशुवैद्यकीय दवाखान्यांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्‍ध करुन देण्यात आलं.

****

इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले- ऑफ फेरीत चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सवर पंधरा धावांनी विजय मिळवत, अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जनं निर्धारित षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. १७३ धावांचं लक्ष्य साधण्यासाठी फलंदाजीला आलेला गुजरात टायटन्सचा संघ अवघ्या १५७ धावात तंबूत परतला.

दरम्यान, प्ले- ऑफ गटात दुसरा सामना आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंटस यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं एम ए चिदंबरम क्रीडासंकुलात संध्याकाळी साडेसात वाजता सामना खेळवला जाईल. या सामन्यातला पराभूत संघ स्पर्धेतून बाद होईल, तर विजेत्या संघाचा परवा शुक्रवारी गुजरात टायटन्ससोबत सामना होणार आहे.

****

७१ व्या महाराष्ट्र वरिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेच्या काल अखेरच्या दिवशी नाशिकचा सर्वेश कुशरे आणि पुण्याची अवंतिका नराळे यांनी सर्वोत्कृष्ट धावपटूचा मान पटकावला. पुणे जिल्हा संघाने पुरुष आणि महिला गटात अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. म्हाळुंगे बालेवाडीच्या श्री छत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र ॲथलेटिक संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसं देण्यात आली. ओडिशामध्ये येत्या १५ ते १८ जून दरम्यान आंतर-राज्य वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी काल झालेल्या स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथे ‘वंडर केव्ह्स या कार्यक्रमाचं येत्या सत्तावीस तारखेला आयोजन करण्यात आलं आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीनं साजरा होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव, या अंतर्गत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हेरिटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला शिबीर, पोवाडा गायन, प्रश्नमंजुषा आणि नृत्यनाटिका असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

दुर्गम भागासह खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचाव्यात यासाठी शासनानं हाती घेतलेल्या “शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यात येत्या एक जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...