Saturday, 1 July 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.07.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 July 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०

****

·      समृद्धी महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून उपाययोजना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      मृतांच्या कुटूंबांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख तर पंतप्रधानांकडून दोन लाख रुपये मदत जाहीर.

·      संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै पासून सुरु होणार.

आणि

·      माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून सर्वत्र साजरी.

****

समृद्धी महामार्गावरचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल, तसंच त्यांच्या सूचनेनुसार उपाययोजना करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अपघातस्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली, त्यानंतर ही घोषणा केली.

समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना झोपेची डुलकी अशा मानवी कारणांमुळे घडतात, असे अपघात घडू नये यासाठी ज्या ज्या उपायोजना करणे गरजेचं आहे, त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक आणि प्राधान्यानं करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित असून महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची तपासणी केली जात असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

या महामार्गावर सिंदखेडराजा जवळ काल रात्री खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने अपघातानंतर पेट घेतला, या दुर्घटनेत सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.

या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. राज्यपाल रमेश बैस, विधान सभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अपघातासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. या अपघातातून बचावलेले बसचालक आणि सहचालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. बस दुभाजकाला धडकून उलटताच हे दोघेही बसच्या काचा फोडून पळाल्याचं या अपघातात बचावलेल्या प्रवाशांनी सांगितलं.

****

दरम्यान, या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरच्या वेग मर्यादेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महामार्गांवरील वाढते अपघात टाळण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती तयार करून संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी तसंच, अपघाताची कारणं शोधून काढावी, अशी सूचना पवार यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी, शिंदे फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या महामार्गावर सुरक्षेच्यादृष्टीने उपाय योजना करून त्रुटी दूर करणे गरजेचं असल्याचं मत पटोले यांनी व्यक्त केलं. रस्ता संमोहनामुळे अपघात होत असल्याच्या तज्ज्ञांच्या मताचा विचार करून योग्य त्या उपाययोजना करण्याची गरजही पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.

****

पुण्यात झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तीन युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीनं पंधरा लाख रुपयांची बक्षीसं देण्यात आली. पीडित तरुणीलाही पाच लाख रूपये तर तिला मदत करणाऱ्या तिच्या मित्राला पंचवीस हजार रूपये देण्यात आले, तरुणीच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

****

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मुंबई महापालिकेतल्या कथित घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली.

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. कनाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झाले.

****

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या अंमलबजावणीचा सहावा वर्धापन दिन आज मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या महिन्यात गेल्या वर्षींपेक्षा १२ टक्क्यांनी अधिक म्हणजेच एक लाख ६१ हजार ४९७ कोटी रूपये इतक्या रकमेची कर संकलन झाले असून एक कोटी पन्नास लाख व्यवसायिकांनी नोंदणी केली असल्याचं बैस यांनी सांगितलं.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै पासून सुरु होणार असून, ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ही माहिती दिली.

****

राज्याच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांना अभिवादन केलं असून, शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवन परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त राजेश आडपावार यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

****

शेतीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी गावातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून सेवा प्रदान कराव्या असं आवाहन महाराष्ट्र राज्य वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्राध्यापक जयसिंग जाधव यांनी केलं. अकोला इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे कृषी महाविद्यालयात वसंतराव नाईक यांच्या एकशे दहाव्या जयंतीनिमित्त कृषि दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. राज्यातील कृषी विद्यापीठांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या चतु:सूत्रीचा वापर केला असल्याचं मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

महाराष्ट्राच्या मातीला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी कृषी शिक्षण आणि तंत्रज्ञानाची जोड देण्याची दूरदृष्टी वसंतराव नाईक यांच्याकडे होती, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.अशोक ढवण यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती तथा कृषी दिनानिमित्त आज झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी डॉ. ढवण आणि कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीनं आज वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित नलावडे यांनी प्रतिमा पूजन करून त्यांच्या कार्या विषयी सविस्तर माहिती दिली.

****

नंदुरबार जिल्हा स्थापनेला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवानिमित्ताने वनविभागाच्या २५ हजार झाडे लावण्याच्या मोहिमेचा नवापूर तालुक्यातील खांडबारा गावालगत पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रितिनिधी तसंच प्रमुख प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

पालघर जिल्ह्यातल्या मोडगाव इथं उधवा - मोडगाव - धुंदलवाडी या रस्त्यावर आज चार चाकी वाहनानं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला. ११ वर्षीय प्रीती मालकरी आणि ८ वर्षीय शाहिद मालकरी अशी या भावंडांची नावं आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयं त्यास जबाबदार राहील, असं कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितलं आहे. पूर्णवेळ प्राचार्य, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांच्या कोर्सेसची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली असून, काही कोर्सेसची क्षमता घटवण्याचा निर्णय कुलगुरुंनी घेतला आहे. पदवी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयांची मान्यताप्राप्त संख्या पाहूनच प्रवेश घ्यावा, असं आवाहन शैक्षणिक विभागानं केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...