Sunday, 2 July 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.07.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 July 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०

****

·   महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसरकारला पाठिंबा-अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

·   छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह नऊ जणांचा मंत्रिमंडळात समावेश

· पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढू-अजित पवारांची घोषणा, राज्याला आता ट्रिपल इंजिनचं सरकार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आणि

·    समृद्धी महामार्गावरील बस अपघातातील २५ मृतांवर सामुहिक अंत्यसंस्कार

****

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वातील ४० आमदारांनी आज शिवसेना - भाजपच्या सरकारला आपला पाठिंबा दिला. राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर आठ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. यामध्ये त्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांचा समावेश आहे. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

या शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना, अजित पवार यांनी, ३० जूनला आपण विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.  आपल्याला राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला सक्षमपणे प्रगतीपथापर नेत आहेत. विकासाचा मुद्दा लक्षात घेऊनच या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यापुढील निवडणूक आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या नेतृत्वात लढू असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले…

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब,यांच्या नेतृत्वाखाली गेली नऊ वर्ष जो काही कारभार चाललेला आहे. त्या कारभाराच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर अतिशय मजबुतीनं देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब करत आहेत. आणि असा प्रयत्न करत असतांना डेव्हलपमेंट हा एकमेव विचार करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला. काही जण आता वेगवेगळी टीका टीपण्णी करणार आम्हाला टीका टीपण्णीला उत्तर देण्याचं कारण नाही, आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करणं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणे आणि महाराष्ट्राची जनता समाधानी कशी राहील. याच्यामध्ये सगळा घटक आला. त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. 

 

या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित होते. भुजबळ यांनी यावेळी पंतप्रधान मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेत, येत्या सहा जुलैला आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितलं आहे.

***

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे राज्य सरकारमध्ये आता दोन उपमुख्यमंत्री झाले आहेत. देवेंद्र फडणवीस याआधीच या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये प्रथमच दोन उपमुख्यमंत्री होण्याची घटना घडली आहे. तर अजित पवार हे विधानसभा सदस्यत्त्वाच्या एकाच कार्यकाळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले आहेत.

***

राष्ट्रवादी काँग्रेसवर दोन दिवसांपूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान मोदी यांनी केले होते त्यातून आमच्या काही सहकाऱ्यांची त्यांनी मुक्तता केली, अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या घटनेनंतर दिली. ते म्हणाले ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे. असा जो आरोप केला मला आनंद आहे की, मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ यासंबंधी त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्या वरती त्यांनी आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्यामुळे प्रधानमंत्र्याचा आभारी आहे. 

***

मोठे कर्तृत्व करण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षीय राजकारणात दुय्यम भूमिका दिल्यावर अशा घटना घडल्याचे आपण याआधी महाराष्ट्रात पाहिले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर सांगितले. आमचे सरकार याआधी डबल इंजिनचे होते, त्याला आता तिसरे इंजीन जोडले गेले आहे. त्यामुळे कामे अतिशय वेगाने होतील आणि त्याचा फायदा राज्याच्या जनतेलाच होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले.

 

अजितदादा यांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं आहे. खरं म्हणजे कर्तूत्ववान कार्यकर्त्याला जेंव्हा दुय्यम स्थान दिलं जातं. त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडत असतात. हे आता डबल इंजिनचं सरकार जे आहे त्याला आता ट्रीपल इंजिन जोडलेलं आहे. आणि आता राज्याचा विकास जो आहे. हा बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. या महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल एव्हढचं मी या प्रसंगी सांगतो.

***

राज्याच्या राजकारणात हा कोणताही भूकंप नाही. अनपेक्षित काहीही घडलेले नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. लवकरच एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील. त्यामुळे शिंदे यांचे सरकार अल्पमतात येऊ नये म्हणून भाजपने ही खेळी आहे. महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळतील, असेही भाकित संजय राऊत यांनी केले.

***

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बस दुर्घटनेतील मृत २५ जणांवर आज दुपारी बुलडाणा इथं सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी साडेबारा वाजता बुलडाणा इथं राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातातील फक्त चार मृतदेहांची ओळख पटली, मात्र २१ मृतदेहांची ओळख पटलेली नव्हती, त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांनी सहमती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

***

नवं शिक्षण धोरण हे मराठवडयाच्या विकासासाठी महत्त्वाचं ठरणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं आज  सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित एक दिवसीय शिक्षण परिषदेचं उदघाटन कराड यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर याचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांना प्रांतिक भाषेत शिक्षण उपलब्ध करून आपल्या भाषेत शिक्षण समजून घेणं महत्त्वाचं आहे असं कराड यावेळी म्हणाले. शिक्षण क्षेत्राप्रमाणेच आगामी काळात सिंचन, दळणवळण, आरोग्य या विषयांवरही  परिषद आवश्यक असल्याचं मत कराड यांनी यावेळी व्यक्त केलं.

***

लातूर इथं आज लोकनेते विलासराव देशमुख उद्यानामधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं उद्घाटन महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते झालं. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा, त्यांचं सामाजिक,सांस्कृतिक आणि आरोग्य विषयक हित जपण्याच्या संकल्पनेतून महापालिकेनं हे विरंगुळा केंद्र सुरू केलं आहे. या ठिकाणी वृत्तपत्रं,पुस्तकं यासह बुद्धिबळ-कॅरम,वजन मोजणी यंत्र अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

***

 

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात आज दुपारी दमदार पावसानं हजेरी लावली. आधी सकाळी ऊन  पडलं असतांनाच दुपारी वातावरण बदललं आणि पावसाला सुरवात झाली. दौलताबादसह चापानेर तसंच  जिल्ह्यातल्या गंगापूर, ममदापूर इथं पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.

***

एटीपी वर्ल्ड टूर अर्थात जागतिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचं विजेतेपद भारताच्या युकी भांबरीनं दक्षिण आफ्रिकेचा लॉइस हॅरिस या जोडीदाराच्या साथीनं मिळवलं आहे. स्पेनमध्ये मलोक्रा इथं काल गवती मैदानाव खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं नेदरलँडच्या रॉबिन हेस आणि ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ओसवॉल या जोडीचा ६-३, ६ -४ असा पराभव केला.

//***********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...